Exportable Grape : कष्ट अन् प्रयोगशीलता हेच धन

Grape Farming : नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) हे गाव निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे गाव म्हणून नावारूपास आले आहे. येथील ९० टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागायतदार द्राक्षांची परदेशात व देशांतर्गत निर्यात करतात.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Success Story of Grape Farming : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्याच्या पश्‍चिम भागातील काजवा व काजळी नदीच्या संगमावर वसलेले कारसूळ हे गाव आहे. पत्री सरकारच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गावाला भेटी दिल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगतात. गाव तसे छोटे. लोकसंख्या २६१९ इतकी. मात्र शेतीत प्रयोगशील. सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक अशी पार्श्‍वभूमी लाभलेली. पूर्वी पारंपरिक हंगामी पिके गावात होत.

सन १९७३ मध्ये कै. पंढरीनाथ रामचंद्र पगार, त्यानंतर संपतराव रामचंद्र शंकपाळ आदी प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावात द्राक्ष लागवडीचा श्रीगणेशा केला. पारंपरिक पिकांच्या तुलनेत उत्पन्न अधिक मिळत असल्याचे लक्षात येताच अन्य शेतकरी तिकडे वळले. सुरुवातीला अनाबेशाही वाण होता. निफाड तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत मग मंडप, वाय पद्धतीच्य बागा उभारण्यास सुरुवात झाली.

सुरुवातीला अनाबेशाही वाणाच्या काड्या उपलब्ध करून लागवडी केल्या होत्या. बाजारपेठांची मागणी ओळखून टप्प्याटप्प्याने वाण बदल झाले. सुमारे ४० वर्षांपूर्वी अवघ्या १० ते १५ एकरांवर द्राक्ष लागवड होती. आज गावच्या एकूण ७९६ हेक्टर क्षेत्रफळापैकी द्राक्षाखालील क्षेत्र सुमारे ३९७ हेक्टर आहे. यात शेतकऱ्यांची प्रयोगशीलता महत्त्वपूर्ण राहिली आहे.

थॉम्पसन, सुधाकर, एसएसएन, सोनाका, क्लोन, शरद सीडलेस, मामा जम्बो. नानासाहेब पर्पल या वाणांच्या विविधतेसह किंगबेरी, क्रीमसन, आरा आदी नव्या वाणांनाही गावकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Grape Farming
Grape Advisory : द्राक्ष घड जिरण्याच्या विकृतीवरील उपाय

निर्यातक्षम उत्पादन

रासायनिक अवशेषमुक्त द्राक्ष उत्पादनात कारसूळच्या शेतकऱ्यांचा हातखंडा तयार झाला आहे. जैविक पद्धतीने कीड- रोग नियंत्रणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चाचण्या सुरू आहेत. स्वयंचलित हवामान केंद्रे उभारून शेतकऱ्यांना बागेचे काटेकोर व्यवस्थापन करता येत आहे.

एकरी १० ते १२ टन उत्पादन शेतकरी घेतात. एकूण उत्पादनाच्या ८० ते ९० टक्के मालाची निर्यात होते. द्राक्ष शेती नैसर्गिक आपत्ती, दरांतील चढ-उतार या बाबींमुळे अस्थिर झाली आहे. मात्र व्यवस्थापन, उत्पादन, खर्च या बाबी संतुलित ठेवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

कायम शिकण्याची वृत्ती

गावात सध्या द्राक्ष उत्पादकांची तिसरी पिढी कार्यरत असून, बदलत्या काळात आव्हानांवर मात करून नवे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी सज्ज आहे. चर्चासत्रे, परिसंवाद, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आदी ठिकाणी भेट देऊन येथील शेतकरी सतत शिकत असतात. गावात रस्त्यांची अडचण आहे. मात्र शासनाने पक्के रस्ते व सामूहिक सुविधा उभाराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बाजारपेठेत मिळविले नाव

युरोपीय देशांसह रशिया, बांगलादेश येथे गावातील द्राक्षांची निर्यात होते. आयातदार देशांतील सुपर मार्केटचे प्रतिनिधी गावात येऊन बागांची पाहणी करतात. नाशिक जिल्ह्यातील निर्यातदार बांधावर येऊन खरेदी करतात. परिसरातील शीतगृहांमध्ये माल साठवण्याची सुविधा आहे. देशांतर्गत म्हणाल तर मध्य प्रदेश, गुजरात. उत्तर प्रदेश, राजस्थानापर्यंत इथल्या द्राक्षांनी नाव मिळवले आहे.

प्रगती झाली, सधनता आली

कारसूळमधील बहुसंख्य शेतकऱ्यांची जमीनधारणा एक ते पाच एकर दरम्यान आहे. आता हे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत. सामजिक, आर्थिक समृद्धी अनुभवत आहेत. प्रत्येकाचे घर आहे. वाहन, ट्रॅक्टर, अवजारे आहेत. द्राक्ष हंगामात संपूर्ण गाव गजबजलेले असते. गावातील कृषी सेवा केंद्रे, छोटे हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार यांनाही व्यवसायिक संधी मिळतात. हंगामात तीन हजारांहून अधिक मजुरांना गाव रोजगार देत आहे. काही शेतकऱ्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्रे खरेदी करून भाडेतत्त्वावर सेवा पुरवण्याचे व्यवसाय सुरू केले आहेत. मल्हारी बाबा व कादवाशिवार असे आत्मा नोंदणीकृत दोन शेतकरी गट स्थापन झाले आहेत. स्वहिस्सा देऊन अवजारे बँक शेतकऱ्यांनी उभारली आहे.

Grape Farming
Grapes Variety : द्राक्षांच्या नव्या, ‘पेटंटेड’ वाणांकडे वळावेच लागेल

पूरक व्यवसायांना चालना

गावात ११ महिला बचत गटांची उभारणी झाली असून, शेवया, कुरडई, पापड्या, गिरणी आदी उद्योगांना चालना मिळाली आहे. शंभरहून अधिक कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज दोन हजार हजार लिटर दूध उत्पादन होते. पाच संकलन केंद्रे आहेत. गुजरात राज्यातील दूध संघांना दुधाचा पुरवठा होतो.

देवेंद्र काजळे ९९२१४१३७०१ (माजी सरपंच)

माधव पगार ९४०४६८७८८३ (प्रगतिशील द्राक्ष बागायतदार)

कासरूळ गावातील आदर्श गोष्टी

ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या मुख्य भागात चार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित.

शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संकल्पना.

सात वर्षांपूर्वी दुष्काळाची चाहूल ओळखून शेतकऱ्यांकडून दूरदृष्टीने शेततळ्यांची निर्मिती.

सहकारातून समृद्धी आणण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, कादवा पाणी वापर संस्था, मल्हार बाबा पाणी वापर संस्था आदींची स्थापना.

मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आयएसओ मानांकन प्राप्त तसेच ‘युनेस्को’ सदस्यत्व असलेली व पीएमश्री जिल्हा परिषद ‘सेमी इंग्लिश’ प्राथमिक शाळा.

गहिनीनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा, संत सद्‍गुरू मल्हारी बाबा पुण्यस्मरण व जयंती उत्सव, ह.भ.प. पोपट बाबा जयंती व पुण्यस्मरण उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, राम नवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव, श्रीकृष्ण जन्म उत्सव आदी कार्यक्रम उत्साहात साजरे होतात.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कारसूळच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी होते. त्यामुळे द्राक्ष निर्यातीसाठी ''ग्रेपनेट'' प्रणालीत गावातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या वाढती आहे. याशिवाय शेतीशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन होत असल्याने माहितीचे आदान-प्रदान होण्यास मोठा हातभार लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com