Nashik News : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर वाढीव चारी क्रमांक आठ या दोन्ही प्रकल्पांसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने मान्यता दिल्याची माहिती धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
डॉ. भामरे म्हणाले, की तीस वर्षांपासून तालुक्यातील तळवाडे भामेर पोच कालवा, केळझर डावा कालवा चारी क्रमांक आठ हे सिंचन प्रकल्प प्रलंबित होते. या प्रकल्पांच्या पुढील वाढीव काम हे शासकीय मापदंडात बसत नसल्याने या कालव्यांच्या प्रस्तावास शासकीय मंजुरी मिळत नव्हती.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सात-आठ वर्षांपासून तालुक्यातील इतर ४ प्रकल्पांच्या प्रलंबित कामांना मंजुरी घेताना हरणबारी उजव्या कालव्याचे व वाढीव केळझर चारी क्रमांक ८ साठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक बाबी व इतर अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
कोरोना काळातसुद्धा शासन दरबारी कालव्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई येथे आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर या कामाला गती मिळाली. डॉ. भामरे म्हणाले, की सर्वप्रथम कालव्यासाठी पाणी उपलब्ध व्हायला हवे म्हणून वळण बंधारे बांधले गेले.
हरणबारी उजव्या कालव्यासाठी पाणी आरक्षित करून घेण्यात आले. जलवाहिनी आराखडा ‘मेरी’कडून मंजूर करून घेतला. त्या नंतर हा प्रस्ताव तापी महामंडळ जळगाव येथे पाठवला. तापी महामंडळाने अभ्यास करून त्यातील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर प्रकरण जलसंपदा विभागात पाठवले. जलसंपदा विभागाने त्यातील सर्व अडचणी दूर करून ३० ऑक्टोबर रोजी हरणबारी उजवा कालवा प्रकल्पास मान्यता दिली. प्रकल्पाला निधी उपलब्धता व्हावी यासाठी तो अर्थखात्याकडे पाठविण्यात आला.
केळझर वाढीव चारी क्रमांक ८ चा पाइपलाइन प्रस्ताव आता ‘मेरी’कडे अंतिम मंजुरीस गेला आहे. लवकरच सर्व परवानगी मिळवून काम सुरू होईल, असा आशावादही डॉ. भामरे यांनी व्यक्त केला. या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.
या गावांना होणार फायदा
मुळाणे, भाक्षी, चौगाव, अजमेर सौंदाणे, कन्हे, देवळाणे, सुराने, वायगाव, जामोटी, दगडपाडा, मुल्हेर, मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाने, ताहराबाद, पारनेर, बिजोटे, निताने, आखतवाडे, गोराने, फोफिर, कोटबेल, खिरमानी, नळकस, कुपखेडा, सारदे, वायगाव, जुने रातीर, रामतीर, देवळाणे, सुराने, सातमाने या गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.