Hapus Mango : उन्हात भाजतोय हापूस

Summer Heat : कोकणात जाणवत असलेल्या प्रखर उन्हाचा तडाखा हापूसला बसत आहे. कातळावरील आंबा बागांमध्ये तयार झालेला आंबा उन्हामुळे भाजून गळून पडत आहे.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकणात जाणवत असलेल्या प्रखर उन्हाचा तडाखा हापूसला बसत आहे. कातळावरील आंबा बागांमध्ये तयार झालेला आंबा उन्हामुळे भाजून गळून पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादन वाया गेल्यामुळे बागायतदारांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. एका बागेमधून सुमारे दोन ते तीन क्रेट आंबा वाया जात असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात पोहोचला असतानाच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उत्पादनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वातावरणातील बदलांचा तडाखा दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला बसला असून, त्यामधून किती उत्पादन मिळेल यावर हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रखर उन्ह मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हवामान विभागाकडूनही पुढील चार दिवसांत उष्मा वाढेल अशी शक्यता वर्तविली आहे. या उष्म्याचा परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहे.

Hapus Mango
Mango Market : आवक वाढल्याने आंब्याचे दर गडगडले ; बागायतदारांना स्थानिक बाजारपेठेचा आधार

सध्या पारा ३२ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. कातळावरील परिसरात पारा तुलनेत अधिक असतो. त्याचा सर्वाधिक फटका कातळावरील आंबा बागांना बसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील जांभरूण येथील चारशे कलमांच्या आंबा बागेमधील तयार झालेली फळे सनस्ट्रोकला बळी पडत आहेत.

Hapus Mango
Mango Market : तेलंगणा, आंध्रप्रदेशमधून ३०० क्विंटल कैऱ्यांची आवक

उन्हामुळे आंबा भाजत असून पिवळा पडत आहे. हे आंबे गळून जात आहेत. दिवसाला दोन ते तीन क्रेट आंबा झाडाखाली पडत आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी झाडाखाली पडलेले आंबे गोळा करून टाकण्याशिवाय आंबा बागायतदारांपुढे पर्याय उरत नाही. या पद्धतीने आंबा वाया जात असल्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. दुपारीच्या सुमारास फळे गळून पडण्याची प्रक्रिया वेगाने होत आहे.

गेले आठवडाभर ही परिस्थिती असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. याबाबत बागायतदारांनी अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर हा उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम आहे, असे सांगण्यात आले. तसेच सकाळच्या सत्रात पडणारे दव आंब्यावर राहते. उन्हामुळे ते आंब्याच्या सालीवरच जळून जाते आणि फळावर डाग पडतात. त्यामध्ये साका तयार होतो. झाडाला पाणी देणे हा उपाय असला तरीही एवढ्या मोठ्या बागेला पाणी देणे खर्चीक आहे. त्यामुळे बागायतदारांना राम भरोसे म्हणायची वेळ आली आहे.

उन्हामुळे तयार होत असलेली फळे काळवंडत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करणे खर्चीक आहे. कातळावरील बागेत आंबा चांगला आहे, पण अशीच स्थिती राहिली तर झाडावर आंबा शिल्लक राहणार नाही. झाडाच्या फांद्यांमधील आंबा सुरक्षित आहे. तेवढाच एक दिलासा आहे. उन्हापासून सुरक्षेसाठी कागद लावण्याची सूचना केली होती. पण कागद लावल्यानंतरही फळ खराब होत आहे.
- मल्हार सावंत, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com