Nashik Crop loss : गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचे संकट घोंघावत असतानाच बुधवारी ( ता. ८) पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता;
मात्र देवळा शहरासह तालुक्यात जोरदार मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. वाखारीच्या कापराई शिवारात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकाचे नुकसान (Rabi Crop Loss) झाले.
तर विठेवाडी, भऊर, खामखेडा व इतर गावशिवारात जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे देवळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण उडविली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या द्राक्षबागा, शेतात उभा असलेला व काढणीला आलेला गहू, हरभरा, वाढीच्या अवस्थेत असलेला रब्बी कांदा, तसेच काढून शेतात घोड्या घालून पडलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दहिवड परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने कांदा, गहू, मका, पपई, डाळिंब आदी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दहिवड येथील रघुनाथ त्रंबक पवार यांच्या पपईच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने पपयांचे नुकसान झाले.
दहिवड येथे जोरदार वारा, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन ते चार वर्गखोल्यांच्या छताचे एका बाजूचे पत्रे उखडून दुसऱ्या बाजूला उडाले. यामुळे शाळेच्या या वर्गखोल्यांमधील साहित्य भिजले.
याशिवाय खारीफाटा येथील दहिवड रोडवरील एक व मालेगाव रोडवरील एक, असे दोन कांद्याचे मोठे शेड वाऱ्याने कोसळले.
जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दक्षिण बाजूकडील पत्रे उत्तर बाजूकडे उडून गेले. त्यामुळे या प्रत्येक वर्गात पाणी साचले. सुदैवाने शाळा दुपारीच सुटली असल्यामुळे विद्यार्थी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला.
शासनाने शाळेचे उडालेले पत्रे त्वरीत बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.