
Akola News : शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांनी केलेल्या अंमलबजावणीचे परीक्षण ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून होणार आहे. या कार्यक्रमाचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कार्यालयांनी तत्काळ आवश्यक त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.
शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, तसेच सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, की सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे.
अद्ययावत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सातही उद्दिष्टांची पूर्तता होईल यासाठी सर्व कार्यालयांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. अशा कार्यवाहीची क्वलिटी कौन्सिलकडून पाहणी करण्यात येणार आहे. आपण स्वत:ही या अनुषंगाने पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले, की कृती कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून कार्यालयांचे मूल्यमापन करून घेण्यात आले. कार्यालयांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यात आली आहेत. प्राप्त अर्ज, तक्रारीवरील कार्यवाहीची माहिती अर्जदाराला मिळण्यासाठी ई-ऑफिस टपाल ट्रॅकर विकसित करण्यात आले आहे. स्वामित्व योजनेत शिबिराद्वारे ७५० प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सनद वाटप झाले.
‘ई- कोतवालबुक’ उपक्रम राबविणार
जिल्हाधिकारी श्री. कुंभार पुढे म्हणाले की, ई- ऑफिस कार्यप्रणाली तलाठी व मंडळ कार्यालयांच्या स्तरावरही विकसित करण्यात येत आहे. तालुका स्तरावर साप्ताहिक तक्रार निवारण दिनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यालयांची स्वच्छता, अभ्यागतांसाठी सुविधा, माहिती फलक आदींबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
‘एआय’च्या वापरातून कामकाज अधिक प्रभावी, जलद व अचूक बनविण्याचा प्रयत्न आहे. त्याचअंतर्गत ‘ई- कोतवालबुक’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. तक्रार निवारण प्रणालीच्या अनुषंगाने सर्व पोलिस ठाण्यांच्या समावेशासह केंद्रीकृत डेटाबेस तयार करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारींचा मागोवा, तसेच जलद निपटारा शक्य होईल, असे पोलिस अधीक्षक श्री. सिंह यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.