ॲग्रोवन वृत्तसेवा
Hapus Mango MSP : सिंधुदुर्गनगरी ः शासनाने हापूस आंब्याला दर्जानुसार हमीभाव जाहीर करावा. कॅनिंगच्या आंब्याचा दर देखील निश्चित करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. बदलत्या वातावरणामुळे तर आंबा उत्पादक मेटाकुटीला आला असून दरातील चढउताराने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे.
तोक्ते चक्रीवादळानंतर फळमाशींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेली दोन वर्ष आंबा बागायतदार फळमाशीने त्रस्त झाले आहेत. याशिवाय फुलकिडी, तुडतुडे याचा प्रादुर्भाव देखील वाढला. जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यातही विविध संकटांवर मात करीत आंबा बागायतदार मार्गक्रमण करीत आहेत. मात्र आंबा उत्पादन सुरू झाले तरी त्याला नेमका किती दर मिळेल हे बागायतदाराच्या हातात राहत नाही. उत्पादन कमी असताना देखील अनेकदा कमी दर राहतो. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या हितासाठी ठोस निर्णय घ्यावा.
शासनाने हापूस आंब्याला दर्जानुसार हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे. याशिवाय कॅनिंगला दिल्या जाणाऱ्या आंब्याचा दर देखील निश्चित केला पाहिजे. मे महिन्याच्या मध्यानंतर बहुतांशी आंबा हा कॅनिंगला दिला जातो.कॅनिंगच्या आंब्याला साधारणपणे प्रतिकिलो १५ ते ३० रुपयांपर्यंत दर दिला जातो. हा दर परवडत नाही. त्यामुळे तो दर देखील शासनाने निश्चित करणे आवश्यक आहे.
याशिवाय कृषी विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळांचा आयोजन करणे, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशा मागण्या देखील संस्थेने केल्या आहेत.
अशा प्रकारचे निवेदन अध्यक्ष संजय नरे, जगदीश गावकर, सौंगधराज बांदेकर, अनिकेत फाटक, नागेश चव्हाण, रमेश गावकर, किशोर पवार, बाळा सामंत, रत्नाकर कोळंबकर, संदेश मालवणकर, दाजी हडकर, नाना सामंत यांनी मालवण तहसीलदारांना दिले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या काही वर्षात आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक बागायतदार कर्जबाजारी आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील आंबा हा दर्जेदार आहे.
तरीदेखील अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून आम्हाला सकारात्मक निणर्याची अपेक्षा आहे.
- संजय नरे, अध्यक्ष, आंबा व्यावसायिक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.