Importance of Safflower Farming : रब्बी हंगामात केवळ पावसाच्या पाण्यावर येणारे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून करडईला ओळखले जाते. अलीकडील काळात करडई दुर्मीळ होत चालली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारखा जिरायती पट्टा, शेजारील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सांगोल्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांनी या पिकाची अनेक वर्षांची परंपरा आजही जोपासली आहे.
मोजक्याच क्षेत्रात गहू, हरभरा, ज्वारीत त्याचे आंतरपीक घेतले जाते. करडई तेलाचे आहारातील महत्त्व आणि उत्पादन यांचा विचार करून कृषी विभाग- आत्मा यांनी पीकक्षेत्रवाढ कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात सुधारित वाणांची निवड, व्यवस्थापन व प्रात्यक्षिके या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सन २०१८-१९ मध्ये मंगळवेढ्यात या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक ४८० हेक्टर क्षेत्र होते. २०१९-२० मध्ये त्यात घट होऊन ते ११० हेक्टर झाले. सन २०२०-२१ या कोरोना काळात ते १६० हेक्टरपर्यंत. होते. मात्र त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये ते थेट ९३५ हेक्टरवर तर २०२२-२३ मध्ये त्याने १२२१ हेक्टरवर मजल मारली आहे.
करडई उत्पादकांचे व्यवस्थापन
मंगळवेढ्याचे कृषी पर्यवेक्षक प्रशांत काटे म्हणाले की आमच्या भागात काळ्या खोल जमिनी आहेत. त्यात करडईचे पीक चांगल्या प्रकारे येते. शेतकरी ३५ बाय १५ व ३५ बाय २० सेंटिमीटर अंतरावर लागवड करतात. अलीकडे दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी. ठेवण्याबाबतही आम्ही सुचवीत आहोत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एसएसएफ-७०८ आणि एसएसएफ १२-४० तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पीबीएनएस- १२, ८६ हे वाण शेतकरी घेतात. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएसबी या जिवाणू संवर्धकांची तर मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करतात.
पेरणीनंतर दीड महिन्याने कोळपणी. वाढीच्या अवस्थेनुसार शेतकरी १९-१९-१९, ०-५२-३४ आदी विद्राव्य खतांचा वापर करतात. सुमारे ११० ते १४० दिवसांनंतर ‘हार्वेस्टर’चा वापर होतो.
शेंडा खुडणी
काटे सांगतात, की पेरणीनंतर ३५ दिवसांनंतर शेंडा खुडला जातो. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे प्रति झाडाला ३० ते ४० बोंडे लागतात. पण शेंडा खुडणीमुळे फुटवे वाढून पर्यायाने बोंडांची संख्या दुप्पट म्हणजे ७० ते ८० पर्यंत पोहोचते.
अर्थात, पाऊस कमी असल्यास शेंडा खुडणी करायची नाही. पाऊस चांगला झाला तरच शेंडा खुडणीचा सल्ला आम्ही देतो. कारण पाण्यामुळे केवळ फुटवे आले व पुढे पाणी नसल्यास त्याला बोंडे येण्याचे प्रमाण कमी राहू शकते.
उत्पादन व दर
एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन शेतकरी घेतात. मात्र कृषी विभागाने सुचविलेले व्यवस्थापन, तीन फवारण्या व हवामानाची साथ यातून साडेआठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी साध्य केले आहे.
करडई काटेरी असल्याने पूर्वी काढणी कठीण होती. कमरेला कापडाची झोळी करून त्यात एकेक बोंड खुडून आणले जायचे. त्यानंतर बडवून मळणी पूर्ण व्हायची. मात्र आता ‘कम्बाईन हार्वेस्टर’ उपलब्ध झाल्याने अत्यंत कमी कालावधीत काढणीचे काम सोपे झाले आहे. करडईसाठी मंगळवेढा बाजारपेठ आहे. अलीकडील काळात क्विंटलला साडेतीन हजारांपासून चार ते पाचहजार रुपयांपर्यंत दर आहे. काही तेलघाणा व्यावसायिकांनाही विक्री होते.
जिरायतीसाठी वरदान
मंगळवेढ्याचे संग्राम घोंगडे यांना करडई शेतीचा वीस वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.दरवर्षी ते १० ते १५ एकरांवर करडई घेतात. सुधारित विविध वाणांचा वापर सातत्याने करण्याकडे त्यांचा कल असतो. ते सांगतात की ऑक्टोबरमध्ये लागवड होते.
सुमारे साडेचार महिन्याचे हे पीक आहे. एकरी सरासरी चार ते सहा क्विंटल, तर कमाल ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादन खर्च १५ हजार रुपयांपर्यंत असतो. क्विंटलला चाहरजार, ५१०० ते कमाल सहाहजार रुपयांपर्यंत दर मिळतो. घोंगडे सांगतात, की हे पूर्ण जिरायती पीक आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर येते हा त्याचा मोठा फायदा आहे.
लागवडीचे क्षेत्र अधिक असल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. अलीकडे कंबाइन हार्वेस्टरचाही वापर होत असल्याने काढणीपश्चात काम सोपे झाले आहे. करडईला ६५०० रुपये हमीभाव सरकारने दिला आहे. मात्र प्रत्यक्षात ४००० रुपयेही मिळत नाहीत. शासनाने करडईचे महत्त्व ओळखून हमीभावाप्रमाणेच खरेदी करावी.
प्रशांत काटे (कृषी पर्यवेक्षक), ९४२३९७९००२, संग्राम घोंगडे (करडई उत्पादक), ९९२२०२२१५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.