Green GDP : ग्रीन जीडीपी : नववसाहतवादाचे साधन

Article by Dr. Shailendra Devlankar : निसर्ग ओरबाडून प्रगती साधायची, नंतर त्याविषयी कळवळा दाखवायचा. पण त्याच्या संवर्धनासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान महागडे करून विकसनशील देशांच्या विकासात अडथळे आणायचे, हा पाश्‍चिमात्य देशांचा नववसाहतवादच म्हटला पाहिजे.
Gross Domestic Product
Gross Domestic Product Agrowon

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Gross Domestic Product : मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश बिल गेट्‌स यांची अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला, तो म्हणजे ‘ग्रीन जीडीपी’बाबत भारताचे काय धोरण आहे?

बिल गेट्‌स यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, की तत्त्वतः हे प्रत्येक देशाने केले पाहिजे. आम्ही याबाबत दोन पद्धतीने काम करत आहोत. एक म्हणजे पर्यावरणस्नेही किंवा पर्यावरणाची किमान हानी होईल,

अशा तंत्रज्ञानाचा शोध आणि विकास व्हावा यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक विकास हा पर्यावरणपूरक व्हावा, ही भारताची भूमिका आहे.

तसे पाहता ‘ग्रीन जीडीपी’ची संकल्पना जुनी आहे. एकविसाव्या शतकामध्ये ती प्रकर्षाने पुढे आली. याचे कारण अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य प्रगत देशांचा ‘ग्रीन जीडीपी’विषयी आग्रह आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक काळापासून या देशांनी पर्यावरणाची अपरिमित हानी करून, निसर्गाला बेसुमार ओरबाडून आपापल्या देशांचा आर्थिक विकास घडवला, साधनसंपत्ती निर्माण केली आणि ती सधन-श्रीमंत बनली.

आज त्यांचा आर्थिक विकास कुंठितावस्थेत आहे. दुसरीकडे आशिया खंडातील भारत, चीनसारखे विकसनशील देश वेगाने आर्थिक विकास करत आहेत. साधनसंपत्तीची निर्मिती करत आहेत, निर्यातवाढीसाठी प्रयत्नरत आहेत. भारताचा विचार करता, येणाऱ्या २५ वर्षांसाठीचा दीर्घकालीन कृतिआराखडा बनवला आहे.

त्यानुसार भारत विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करणार आहे. याच काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सध्याच्या २.७५ ट्रिलियन डॉलर्सवरून पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. अशा वेळी हे पश्चिमी देश भारताला ‘ग्रीन जीडीपी’चा आग्रह धरत आहेत. त्यांनी ही संकल्पना वसुंधरेच्या रक्षणासाठी विकसित केलेली असली तरी सद्यःस्थितीत तिसऱ्या‍ जगातील विकसनशील देशांचा आर्थिक विकास रोखण्यासाठीचे साधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो आहे.

Gross Domestic Product
India GDP : देशाचा जीडीपी ८ टक्क्यांनी वाढणार? केंद्रीय अर्थमंत्री यांचा दावा

ग्रीन जीडीपी म्हणजे काय?

‘जीडीपी’ म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन, अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन. भारतात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिलपासून दर तीन महिन्यांनी ‘जीडीपी’ची गणना होते. भारताला पुढील पाच वर्षांमध्ये पाच ट्रिलीयन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर ८ ते ९ टक्के विकासदर ठेवावा लागेल.

२००८ ते २०१८ या काळात भारताने तो ठेवलाही होता. परंतु २०२०मधील कोरोना महासाथीमुळे तो घसरला. तरीही सद्यःस्थितीत भारत जगातील सर्वाधिक आर्थिक विकास दर असणारा देश असून, तो ६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

येणाऱ्या काळात त्यामध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ गरजेची आहे. ते करताना पर्यावरणाचे रक्षणही आवश्‍यक आहे. जगामध्ये कोणतेही उत्पादन हे पर्यावरणाच्या हानीशिवाय होऊच शकत नाही.

शेतीचा जरी विचार केल्यास त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे आणि किटकनाशकांमुळे माती, पाण्याचे प्रदूषण होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू आणि ध्वनीप्रदूषण होते. या पर्यावरणाच्या हानीची किंमत वजा करून येणारी रक्कम म्हणजे ‘ग्रीन जीडीपी’.

थोडक्यात, ‘जीडीपी’मधून पर्यावरणाची हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ‘ग्रीन जीडीपी’. अर्थात, पर्यावरणाची हानी मोजायची कशी, हा कळीचा मुद्दा आहे. कोणताही देश स्वतःहून पर्यावरणाची हानी किती झाली हे सांगणार नाही. असे असूनही पश्चिमी देश सातत्याने ‘ग्रीन जीडीपी’ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

विशेषतः भारत आणि चीन या दोन देशांची यावरून कोंडी केली जाते. २००६ मध्ये चीनने ‘ग्रीन जीडीपी’ किती आहे याची गणना केली आणि त्याची आकडेवारीही घोषित केली. त्यानंतर आजतागायत चीनने चुकूनही ‘ग्रीन जीडीपी’ जाहीर केलेला नाही. कारण पर्यावरणाच्या हानीची आकडेवारी जाहीर केल्यास त्या देशावर निर्बंध टाकले जाणार हे अटळ असते.

Gross Domestic Product
India's GDP : भारत खरेच चीनची बरोबरी करेल?

दुटप्पीपणा आणि षड्‌यंत्र

भारताने आजपर्यंत कधीही ‘ग्रीन जीडीपी’ मोजलेला नाही. २०१३मध्ये यासाठी आयोगाची स्थापना केली. आयोगाने २०१४-१५मध्ये ‘ग्रीन अकाउंट फ्रेमवर्क’ अहवाल सादर केला. त्यापलीकडे भारताने ‘ग्रीन जीडीपी’ गणनेसाठी काहीही केलेले नाही. याचे कारण ‘ग्रीन जीडीपी’च्या माध्यमातून भारताच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न पश्चिमी देश करत आहेत.

आजवर पर्यावरणाचे शोषण करून आर्थिक विकास साधल्यानंतर त्यांना निसर्गसंवर्धनाविषयी आलेली जाग हे एक षड्‌यंत्र आहे. मानवाधिकारांच्या प्रश्नाबाबत पश्चिमी देशांचा हा दुटप्पीपणा अनेकदा दिसला आहे. पर्यावरणाची हानी कमी करून विकास दर वाढवायचा असेल तर त्यासाठीचे तंत्रज्ञान महागडे आहे.

अशा तंत्रज्ञानावर पश्चिमी देशांची मक्तेदारी आहे. त्यांनी हे तंत्रज्ञान गरीब विकसनशील देशांना देण्याची गरज आहे. पण त्यासाठी ते तयार नसतात. तयारी दर्शवली तर त्यासाठी प्रचंड किंमत आकारतात, जी विकसनशील देशांना परवडत नसते. थोडक्यात दोन्ही बाजूंनी आडमुठी भूमिका घेत विकसनशील देशांवर दबाव टाकत राहणे ही पश्चिमी देशांची भूमिका दिसते.

भारताने आता कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन शुन्यावर आणावे, यासाठी पश्चिमी देशांकडून सातत्याने दबाव आहे. भारताने या दिशेने प्रयत्न चालवले आहेत. तथापि, उत्पादन क्षेत्राचा विकास करताना पर्यावरणाची हानी अटळ आहे. अशा स्थितीत पर्यावरणाशी सुसंगत विकास कसा साधता येईल, हे भारतापुढचे आव्हान असेल.

पर्यावरण रक्षणासाठी ‘ग्रीन जीडीपी’चा आग्रह धरणे चुकीचे नाही. पण त्याचा वापर वसाहतवादी मानसिकतेतून होतो आहे. काही मूठभर देशांचा विकास व्हावा आणि अन्य देशांनी त्यांच्यावर विसंबून परावलंबी राहावे, ही यामागची भूमिका आहे. गरीब आणि विकसनशील देशांनी श्रीमंत देशांवर अवलंबून राहावे, यासाठीचे हे प्रयत्न आहेत.

विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला खोडा घालण्याचे साधन म्हणून ‘ग्रीन जीडीपी’चा वापर केला जात आहे. भारताने नववसाहतवादाच्या या दबावाला बळी पडता कामा नये. भारताने आर्थिक विकासासाठी ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करून मार्गक्रमण करावे. कारण विकसित देश बनल्यानंतर भारताची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढणार आहे आणि या देशांची तोंडे आपोआप बंद होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com