
Grapes Production Sangli : सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी यंदा सर्वाधिक म्हणजे १० हजार १५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत आखाती देशात २६ कंटेनरद्वारे ३८९ टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून युरोपीय देशात निर्यात सुरू होणार आहे. गतवर्षी ९ हजार ५२४ शेतकऱ्यांनी १७ हजार ३१८ टन निर्यात केली होती. नैसर्गिक आपत्ती, विविध कारणांमुळे द्राक्षबागांमध्ये झालेल्या घटीमुळे यंदा जेमतेम ११ हजार टन निर्यात शक्य होईल, असा अंदाज आहे. यंदा निर्यातदार वाढले तरी निर्यातीत घट येणार आहे.
यंदा द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत निर्यातदारांची संख्या सुमारे चारपटीने वाढली आहे. राज्यात नाशिकनंतर सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात होतात. त्यातून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. त्यात सांगली जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. जिल्ह्याचे द्राक्षाचे क्षेत्र एक लाख २० हजार एकरांवर आहे. निर्यातक्षम द्राक्षबागेची ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत आता १५ जानेवारीपर्यंत आहे. अशी माहिती कृषी विभागाने दिली.
द्राक्ष बागायतदार शैलेश कोरे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातून आखाती देशात डिसेंबरपासून द्राक्षांची निर्यात सुरू होते. त्यानंतर जानेवारीपासून युरोपियन देशांत द्राक्षनिर्यात होते. यावेळी यास विलंब होताना दिसत आहे. यंदा सततच्या पावसामुळे द्राक्षाच्या फळ छाटण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. यंदा ऑक्टोबरनंतरही नोव्हेंबरमध्ये छाटण्या झाल्या आहेत. दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती कोरे यांनी दिली.
गेल्या वर्षी युरोपीय देशांत ८२८ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन, तर इतर देशांत ४८९ कंटेनरमधून ७ हजार ६१६ टन द्राक्षे निर्यात झाली होती. गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीसाठी ९ हजार ५२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्याद्वारे ५ हजार ३१३ हेक्टरवरील द्राक्षे सातासमुद्रापार पोहोचली. यंदा १० हजार १५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ५ हजार १५ हेक्टर क्षेत्र नोंदवण्यात आलेले आहे.
स्थानिक बाजारपेठेतही द्राक्ष दरात वाढ
द्राक्षाचे एकरी सरासरी दहा टन उत्पादन निघते. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीत पाच ते सात टन उत्पादन शक्य आहे. सध्या आखाती देशांत द्राक्षे जात असून, किलोला सरासरी ९० ते १२० रुपये दर मिळतो आहे. युरोपीय देशात निर्यात सुरू झाल्यानंतर यापेक्षा अधिक म्हणजे प्रतिकिलो सुमारे ११० ते १४० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. दर चांगले असले तरी उत्पादन घटणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.