
Pune News: सरकारी कार्यालयात पंख्याखाली बसलेले शासकीय अधिकारी आणि गावशिवारात असलेल्या सामान्य जनतेमध्ये तयार झालेली दरी आता राज्य सरकारला दिसून आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना कार्यालये सोडा आणि क्षेत्रीय दौरे करा, असे फर्मान सरकारने सोडले आहे.
क्षेत्रीय स्तरावर नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन त्या सोडविण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. केंद्र व राज्य सरकारची विविध शासकीय धोरणे, उपाययोजना, महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी अंतिम घटकांपर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा ही जिल्हाधिकारी ते कोतवाल स्तरापर्यंत कार्यरत असते.
महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वांत प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्रे देणे, कृषी गटांना शासनाच्या विविध योजना, अभियान व मोहिमांचे समन्वय, आपत्ती, टंचाई, जनगणना, निवडणुका, राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर महसुली कामांची जबाबदारी महसूल विभागावर असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांशी निगडित असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.
क्षेत्रीय कार्यालयातून काम करताना विविध योजनांची अंमलबजावणी आखणीनुसारच होत आहे की नाही, याची खातरजमा वेळोवेळी त्या त्या स्तरावरील महसुली अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देऊन पाहणी करून स्थानिक लोकांचे अभिप्राय घेऊन केल्यास शासनाच्या उपाययोजना व्यवस्थितरीत्या पूर्णत्वास जातील. तसेच अशा क्षेत्रीय भेटीच्या माध्यमातून शासन व सर्व सामान्य जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधून शासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, अशा सूचना राज्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी दिल्या.
...या आहेत महत्त्वाच्या सूचना
जिल्हाधिकारी यांनी महिन्यातील किमान प्रत्येकी एक दिवस.
उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी प्रत्येकी दोन दिवस क्षेत्रीय भेटी द्याव्यात.
क्षेत्रीय भेटीनंतर त्याचा लेखाजोखा स्थानिक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे व जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे वेळोवेळी द्यावा.
क्षेत्रीय भेटी दौऱ्याचे मॉनिटर करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करून त्याद्वारे दौऱ्याचे नियोजन ठेवावे. याविषयी समन्वय करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाची राहील.
भेटीदरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरीत्या व अचानक तंत्राचा वापर करून तपासावे.
ग्रामपातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत.
संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे, याबाबत जनसंवादातून खात्री करावी.
गावपातळीवरील तसेच इतर अधिकारी, कर्मचारी नियमानुसार कार्यक्षेत्रात राहून आपले कर्तव्य निभावत असल्याची खात्री करावी.
गौण खनिज व महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे, तसेच वाळू व गौण खनिज उत्पन्न तपासणी शासकीय धोरणानुसार अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा भेटीदरम्यान करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.