- मनोज कापडे
दिवस पहिला
स्थळ- जिल्हा परिषद
बातमीदारः शासनाने पीकपंचनाची जबाबदारी ग्रामसेवकावर (GramSevak) जबाबदारी टाकली आहे. ग्रामसेवकाने पंचनामे (Crop Survey) कसे करावे याची कार्यपध्दत किंवा नियमावली सांगणारी कागदपत्रे पहायची आहेत. कुठे मिळतील?
सामान्य प्रशासन विभागाचा कर्मचारीः तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विचारा.
बातमीदारः साहेब आहेत का? आम्हाला पंचनाम्याची माहिती हवी आहे.
सीईओ ऑफिसचा कर्मचारीः साहेब मिटिंगला गेलेत.
बातमीदारः मग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भेटतील का?
सीईओ ऑफिसचा कर्मचारीः ते तुम्ही समोरच्या ऑफिसात विचारा
बातमीदारः साहेब आहेत का? आम्हाला पंचनाम्याची माहिती हवी आहे.
अडशिनल सीईओ ऑफिसचा कर्मचारीः साहेब नाहीत; पण तुम्हाला ती माहिती एडीओ ( झेडपीमधील कृषी विभाग) ऑफिसात मिळेल.
बातमीदारः साहेब आहेत का? आम्हाला पंचनाम्याची माहिती हवी आहे.
एडीओ ऑफिसचा कर्मचारीः साहेब मिटिंगला गेलेत; तुम्ही कृषी अधिकाऱ्याला पंचनाम्याची माहिती विचारा.
बातमीदारः कृषी अधिकारी कुठे आहेत?
कर्मचारीः ते मिटिंगला गेले आहेत.
बातमीदारः आम्हाला पंचनाम्याची माहिती हवी होती.
कर्मचारीः अहो... पीकपंचनाम्याचे काम रेव्हेन्यूच्या (महसुल विभाग) अंडर येते. पंचनामा कामात ग्रामसेवकाचा फारसा रोल नाही. तलाठी मुख्य असतो. तुम्हाला ती माहिती कलेक्टर ऑफिसला मिळेल.
स्थळः कलेक्टर ऑफिस
बातमीदारः शासनाने पीकपंचनामे करण्यासाठी तलाठयांवर जबाबदारी टाकली आहे. पंचनाम्यात तलाठयाने आणि कृषी,ग्रामविकास कर्मचाऱ्याने किती व कसे करावे याची कार्यपध्दत किंवा नियमावली सांगणारी कागदपत्रे पहायची आहेत. कुठे मिळतील?
कलेक्टर ऑफिसचा कर्मचारीः तुम्ही एक काम करा. तिकडे रोजगार हमी योजनेत टंचाईवाल्यांना विचारा.
बातमीदारः पंचनाम्याशी संबंधित कार्यपध्दत किंवा नियमावली सांगणारी कागदपत्रे पहायची आहेत. कुठे मिळतील?
टंचाई शाखेतील कर्मचारीः या कागदपत्रांचा इकडं काय संबंध? तुम्हाला ती माहिती प्रांत किंवा तहसील ऑफिसला मिळेल.
बातमीदारः पण, राज्यातील सर्व तहसीलदार तर आपआपल्या जिल्हाधिकाऱ्यांना ती माहिती पाठवतात. इथे कोणी तरी ती गोळा करीत असेल ना?
कर्मचारीः मग तुम्ही टेनन्सीत (कुळकायदा शाखा) विचारून बघा.
बातमीदारः इथे पंचनाम्याची कार्यपध्दत कागदपत्रे कुठे बघण्यास मिळतील?
टेनन्सीचा कर्मचारीः इथे नाही. तुम्ही होम ब्रॅन्चला जा.
बातमीदार: पंचनाम्याची कार्यपध्दत कागदपत्रे कुठे बघण्यास मिळतील?
होम ब्रॅन्च कर्मचारीः मॅडम आलेल्या नाहीत.
(बातमीदार मग तासभर बसून राहतो.)
बातमीदारः मॅडम कधी येतील?
होम ब्रॅन्च कर्मचारीः मॅडम येतील. कधी येतील ते सांगता येत नाही. तुम्ही सायेबाला भेटा.
बातमीदारः आम्हाला पंचनाम्याची कार्यपध्दत कागदपत्रे बघायची होती.
साहेबः मला एक सांगा. हे आहे जिल्हाधिकारी कार्यालय. जिल्हाधिकारी सर्वच विभागाचे, जिल्ह्याचे प्रमुख असतात. प्रत्येक विभाग त्यांची त्यांची माहिती पाठवतो. नैसर्गिक आपत्तीत बीएन्डसी,एमएसईबी,इरिगेशन असे सर्व जण त्यांची माहिती पाठवतात. आता पीक पंचनामा म्हटला म्हणजे माहिती कोणी पाठवायला पाहिजे?
बातमीदारः कृषी विभागाने..!
साहेबः बरोबर बोललात तुम्ही.
बातमीदारः तरी पण आम्हाला तलाठयाने पीक पंचनामे करताना कार्यपध्दत कशी ठेवावी याची सूचना असलेली कागदपत्रे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने इथे कशी ठेवलेली आहेत ते बघायचं आहे.
साहेबः ते तुम्हाला कृषी विभागात मिळेल. आमच्या इथे तर मॅडम आलेल्या नाहीत. तुम्ही एक काम करा. आमच्या वरिष्ठांना भेटा.
बातमीदारः आम्हाला पीक पंचनामे करताना कार्यपध्दत संबंधी कागदपत्रे बघायची आहेत.
वरिष्ठ अधिकारीः यात केवळ तलाठी जबाबदार नसतो. ग्रामसेवक, कृषी सहायक यांची ती संयुक्त जबाबदारी आहे. तुम्ही बेटर-वे कृषी खात्याकडून ही माहिती घ्या.
बातमीदारः पण, आम्हाला तुमच्या अखत्यारित असलेल्या तलाठी वर्गाची माहिती हवी होती.
वरिष्ठ अधिकारीः तुम्ही होम ब्रॅन्चला जा. तेथे बघा मिळते का.
(बातमीदार पुन्हा होम ब्रॅन्चला येतो. पुन्हा त्याच साहेबांना भेटतो. साहेब त्यांच्या ज्युनिअरकडे पाठवतात)
बातमीदारः साहेब आम्हाला पंचनामा कार्यपध्दत माहिती हवी आहे.
ज्युनिअर साहेबः ती माहिती मॅडमकडे असेल. त्यांनी दोन दिवस खूप काम केले. त्यामुळे आज त्या उशिरा येणार आहेत. मला ती माहिती देता येणार नाही.
दिवस दुसराः
स्थळः राज्य शासनाचा कृषी विभाग
(कृषी सहायकाच्या शोधात मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात बातमीदार जातो.)
एक कर्मचारीः काय पाहिजे तुम्हाला सकाळी सकाळी.
बातमीदारः काही नाही कृषी सहायक साहेबांना भेटायचे होते.
कर्मचारीः तुम्ही?
बातमीदारः मी पत्रकार आहे.
कर्मचारीः अस्सं. ते तिकडे विचारून बघा.
बातमीदारः कृषी सहायक आहेत का इथे?
कृषी सहायकः कुठून आलात?
बातमीदारः इथेच असतो मी. शासनाने पीकपंचनामे करण्यासाठी जबाबदारी तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायकावर जबाबदारी टाकली आहे. यात कृषी सहायकाने पंचनामे कसे करावे याची कार्यपध्दत किंवा नियमावली सांगणारी कागदपत्रे पहायची आहेत. कुठे मिळतील?
कृषी सहायकः हे काय तेच काम चाललंय. पण तुम्हाला कशाला पाहिजे ही माहिती?
बातमीदारः आम्हाला बातमी लिहियची आहे. प्लिज पंचनामा कार्यपध्दतीची माहिती द्या ना.
(मग या कर्मचाऱ्याने लगेच दैनिकाच्या कार्यालयातील त्याच्या ओळखी सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पण कार्यपध्दत कागदपत्रे दाखविली नाहीत.)
कृषी सहायकः त्याची काही अशी कागदपत्रे नसतात. ते काम मुळात रेव्हेन्यूचं आहे. तुम्हाला कलेक्टर कचेरीत करेक्ट माहिती मिळेल. आम्ही तर पार वैतागलो या कामाला. कृषी विस्ताराची कामे करायची की ही हमाली करायची हे कळत नाही. हे बघा या याद्या.
काही दिवसांपासून हीच किचकट कामे चालली आहेत. मी हे काम करत असलो तरी तुम्ही विचारता ती कागदपत्रे मी कधीच पाहिली नाही. आम्हाला फक्त व्हॉटस्अपवर मेसेज येतो. आम्ही मग पंचनामा करायला सुटतो. तुम्ही आमच्या मंडळ अधिकाऱ्याला भेटून पहा.
(तेव्हडयात एक वरिष्ठ येतात. ते बातमीदाराच्या शर्टची तारीफ करतात. मात्र, माहिती देत नाहीत.)
बातमीदारः पंचनामा कार्यपध्दतीची माहिती हवी होती.
वरिष्ठः पत्रकार साहेब..अशी तर काही माहिती इथे नाही. तुम्ही ‘या’ आमच्या साहेबांना विचारून बघा. ते या कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ( ते साहेब तेथे येतात.)
साहेबः ती माहिती जरा बघावी लागेल. तालुका कृषी अधिकारी आता मिटिंगला गेले. तरी पण आपण बघू. या माझ्या बरोबर.
(दुसऱ्या सेक्शनला साहेब घेवून येतात. तेथे सर्वांकडे विचारतात. कुणाकडेही माहिती नसते. शेतकरी वर्गाविषयी चांगली भावना असलेला हा साहेब मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला पंचनामा कार्यपध्दतीविषयी विचारणा करतो. पण त्यांनाही माहिती मिळत नाही. नको ती माहिती विचारणारा हा साहेब आणि बातमीदार या दोघांकडे पाहून कर्मचारी मात्र वैतागतात.)
साहेबः तुम्ही एक काम करा. आमच्याकडे जेव्हडे होते तेव्हडे तुम्हाला सांगितले. शेतकरी आला की मी माझं काम सोडून त्याला माहिती देतो आणि त्यामुळे कर्मचारी मात्र माझ्याशी कसे वागतात हे तुम्हाला दिसलेच ना? आता तुम्हाला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात माहिती मिळते का ते बघा. नाही तर मग एसएओ (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) ऑफिसला विचारा.
(उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात बातमीदार जातो. तेथे साहेब नसल्याने एसएओ ऑफिसला बातमीदार जातो.)
बातमीदारः आम्हाला पंचनाम्याची कार्यपध्दत असलेली कागदपत्रे पहायची आहेत.
एसएओ ऑफिसचा कर्मचारीः कशाला लागतात कागदपत्रं?
बातमीदारः बातमी लिहियची आहे शेतकऱ्यांसाठी.
एसएओ ऑफिसचा कर्मचारीः तुमच्या पेपरच नाव काय? आणि ती माहिती काय अशी एकत्रित मिळत नसती होss. एक तर कर्मचारी गेले मिटिंगला. इथं फाईल नाही. तुम्ही विचारताय ती माहिती तर नेटवर पण आहे. कशाला इकडं-तिकडं फिरता. अहो जरा वाचा की जीआर. काय राव तुम्ही असे जर जीआर न वाचता माहिती मागत फिरत असाल तर कसं चालायचं.
बातमीदारः प्लिज काही तरी माहिती असेलच की साहेब तुमच्याकडे.
एसएओ ऑफिसचा कर्मचारीः अहो इथं एक तर हा कॅम्प्यूटर चालत नाही. तुम्ही एक काम करा ना. आमच्या पुण्याच्या डायरेक्टर ऑफिसला जा. तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल.
दिवसः तिसरा
स्थळः कृषी आयुक्तालय
बातमीदारः साहेब नमस्कार, पंचनाम्याची कामे आमच्यावरच लादली जात असल्याचे कृषी सहायकांकडून सांगितले जाते. त्याची कार्यपध्दत देखील ठरलेली नाही असेही ते सांगतात. त्यामुळे आम्हाला पीक पंचनाम्याची कार्यपध्दत असलेली नेमकी कागदपत्रे पहायची आहेत.
साहेब: अहो, ते जावू द्या हो.
आता तुम्ही या विषयात कशाला घुसता. झालं-गेलं..अहवालही गेला. आता आमच्या वेगळ्या समस्या आहेत. तुम्हाला दुसऱ्या बातम्या देतो ना. जरा सकारात्मक छापा. बी पॉझिटिव्ह.... आणि मुळात पंचनामा ही काय आजची बाब आहे का? त्याचं व्यवस्थित ठरलेलं काम आहे.
कार्यपध्दत देखील आहे. जो कर्मचारी तुम्हाला असे सांगतो ना तुम्ही त्याच्या नावाने बातमी द्या. जावू द्या घरी त्याला. तुम्हाला कार्यपध्दत हवी असल्यास त्या दुसऱ्या साहेबांना भेटा. ते देतील तुम्हाला.
(मग बातमीदार ज्युनिअर साहेबांच्या कार्यालयात जातो.)
ज्युनिअर साहेबः या पंचनाम्याच्या कामात शंका घेण्यासारखं काय आहे? एक तर हे काम मुळात रेव्हेन्यूचे आहे. कृषी विभागाला कोणीही वाकवत असतो. शेतकरी हितासाठी आम्ही देखील चुपचाप पंचनामे करतो. तुम्ही जी कार्यपध्दत म्हणता आहे ना ती काय आताची नाही. वर्षानुवर्षे ते ठरलेले आहे.
मुळात आधी पंचनामे तलाठी करीत होता. लॅन्ड रेकॉर्ड त्याच्याकडेच असते ना. तरीही नंतर कृषी सहायकाच्या गळ्यात ते काम मारलं. तुम्ही पत्रकार देखील सॉफ्ट टार्गेट बघतात. तुम्हाला हे पक्कं माहिती आहे की आपण पंचनाम्याच्या पॉलिटिकल दबावाबाबत लिहू शकत नाही. आणि मुळात पंचनाम्याबाबत कोणी डिटेल्स लिहून ठेवलेले नाही.
कर्मचारी हा पगार घेतो. त्याने त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून घेतल्या पाहिजे. त्यासाठीच दरवेळी आदेश निघत नसतात. तरीही तुम्ही उद्या या. मी तुम्हाला कार्यपध्दतीचा कागद देतो.
(दुसऱ्या दिवशी बातमीदाराला एक सरकारी आदेशाचा कागद दिला जातो. त्यात लिहिलेले असते की “कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकाने संयुक्त पंचनामे व जिल्हाधिकाऱ्यांनी मदत वाटावी.” त्यात काहीही निश्चित कार्यपध्दत नसल्याचे आढळून येते. राज्यभरातील कोणत्याही तलाठी, कृषी सहायक किंवा तलाठयाला सविस्तर, स्वयंस्पष्ट पंचनामा कार्यपध्दत किंवा नियम पुस्तिका अजूनही मिळालेली नाही.
कारण मुळात ती आस्तित्वातच नाही. आतापर्यंतच्या एकाही सरकारला सोडाच; पण कृषी आयुक्त, कृषी सचिव, महसुल सचिव, मदत व पुनर्वसन सचिव किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवाला पंचनाम्याची कार्यपध्दत निर्दोष करावीशी वाटलेली नाही.
नैसर्गिक आपत्ती म्हटली की कर्मचारी आणि शेतकरीही हैराण होतात. यातून फक्त सरकारी यंत्रणेच्या गेंडयाच्या कातडीची जाडी वाढते आहे..!)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.