Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर झाला. त्यातही बार्शी, माळशिरस, सांगोला या तीन तालुक्यांत गंभीर आणि करमाळा, माढा या तालुक्यांत मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाची वर्गवारी करण्यात आली. वास्तविक, जिल्ह्यात सरसकट दुष्काळाचे चित्र भीषण असताना तांत्रिक मुद्द्यांवर सहा तालुक्यांना सरकारने ठेंगा दाखविला आहे.
परंतु आता सरकारच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना स्वाभिमानी आणि रयतक्रांती संघटना आक्रमक झाल्या आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळी यादीत करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत मंगळवारी (ता.३१) दुष्काळ जाहीर झाला. पण त्यात केलेली वर्गवारी आणि वास्तवातील परिस्थिती याचा कुठेच ताळमेळ लागत नाही. गंभीर आणि मध्यम हा काय प्रकार आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांतून व्यक्त केली जात आहे.
वास्तविक, सोलापूर जिल्ह्यात सगळीकडेच यंदा कमी पाऊस झाला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण प्रत्यक्षात ३५० मिलिमीटर पाऊस झाला. पण तोही काही ठराविक भागापुरताच, पण त्यावर पिके काही तगली नाहीत. पण केवळ बार्शी, माळशिरस आणि सांगोल्यासह करमाळा, माढा या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
उर्वरित अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर आणि मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यांना मात्र वगळण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले, ‘‘सरकारने तातडीने ही दुरुस्ती करावी आणि संपूर्ण जिल्ह्याचा समावेश दुष्काळी यादीत करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. ’’रयतक्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,‘‘उद्याच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहोत. ’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.