Farmer Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न; केंद्रीय मंत्र्यांची संयुक्त किसान मोर्चासोबत बैठक

जाखल भागातून शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, त्यामुळे या भागातही कडक बंदोबस्त करण्यात आलाय. शेतकऱ्यांनं शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं.
Farmer Protest
Farmer ProtestFarmer Protest

बातमी पावसाची

रविवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळं  हरभरा, गहू, कापूस, ज्वारी, मका पिकांसोबत संत्रा, मोसंबी, केळी फळपिकांचं नुकसान झालं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपुर या जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात नांदेड, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली. मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक वातावरण झालंय. आजही विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

बातमी मनरेगाच्या मजुरी दराची

केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज विभागानं स्थापन केलेल्या संसदीय स्थायी समितीनं मनरेगा कायद्यांतर्गत मजूरी दर वाढवण्याची शिफारस केली आहे. मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. या योजने अंतर्गत दिली जाणारी मजुरी अपुरी असल्याचं या समितिनं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या निदर्शनास आणून दिलंय. वाढती महागाई लक्षात घेता, मनरेगातून दिल्या जाणाऱ्या मजुरीतून मजुरांचा दिवसाचा खर्चही भागत नाही, असं निरीक्षणही या समितीनं नोंदवलं आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाला संसदीय समितीनं अहवाल सादर केलाय. केंद्र सरकारनं मनरेगासाठी लवकरात लवकर वाढीव निधीची तरतूद करावी, अशी शिफारस समितीनं केली आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या मजुरीच्या दरापेक्षा राज्य सरकार जास्त मजुरी दर देऊ शकतात. ओडीशामध्ये मनरेगा मजुरांना दरदिवसाची मजुरी ३५२ रुपये दिली जाते.  

बातमी उद्धव ठाकरेंच्या टीकासत्राची!

माझ्या शेतकऱ्याचं काय? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणावर टीका केली. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हिरारीनं भाग घेणारे अशोक चव्हाण आज अचानक भाजपमध्ये जातायत असं अचानक काय घडलं? अशोकरावांना आता राज्यसभेची जागा देणार आहेत, असं दिसतंय. प्रत्येकजण आपआपलं बघतोय, मग माझ्या शेतकऱ्यांचं जे दु:ख आहे, त्याकडे कोण बघतंय? शेतकरी रोज आत्महत्या करतोय, त्या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा. असंही ठाकरे म्हणाले. नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात एक लाख रुपये दिले म्हणजे शेतकऱ्याचं कल्याण होत नाही, कुटुंब उघड्यावर पडतं. ही उघडी पडणारी कुटूंब तुम्हाला उद्या जाब विचारणार आहेत, काय म्हणून तुम्हाला मत देऊ? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांचे कान टोचले. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती एक्सवरून दिली. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. 

Farmer Protest
Delhi Farmer Protest : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात पुढे काय झालं? संयुक्त किसान मोर्चा आंदोलन करणारच?

बातमी शेतकरी आंदोलनाची

उत्तर भारतात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन उभं राहिलंय. संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं १३ फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. ११ फेब्रुवारीपासूनच संयुक्त किसान मोर्चानं (अराजकीय) दिल्लीच्या दिशेनं कूच केलीय. हमीभावाचा कायदा करण्याचं सरकार दिलेलं आश्वासन पाळलं नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशच्या शेतकरी दिल्लीच्या दिशेनं ट्रॅक्टर घेऊन निघालेत.

या शेतकऱ्यांना दिल्ली आणि हरियाणाच्या सीमाभागात रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारच बॅरीकेटस लावलेत. त्यासोबतच हरियाणाच्या सीमाभागातील अनेक जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद केलीय. शेतकरी दिल्लीच्या सीमेपर्यंत येऊ नयेत, यासाठी सरकारनं पोलिस फौजही तैनात केलीय. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या सीमाभागात तणावाची स्थिती आहे. हरियाणा सरकारनं पंजाब आणि हरियाणातील शंभू सीमा बंद केलीय. तर बीएसएफ आणि आरएएफची तुकड्या तैनात केल्यात. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दुसरीकडे पंजाबमध्ये सीमा भागातील फतेहाबादच्या रतिया आणि जाखल भागात पोलिसांनी नाकाबंदी केलीय. त्यासोबतच रस्त्यावर सिमेंटचे ब्लॉक उभे करण्यात आलेत. जमावबंदी लागू करण्यात आली.

जाखल भागातून शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, त्यामुळे या भागातही कडक बंदोबस्त करण्यात आलाय. शेतकऱ्यांनं शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलंय. संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये यापूर्वी पहिली बैठक चंदीगडमध्ये झाली होती. शेतकऱ्यांच्या मागण्या या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाकडून मांडण्यात आल्या होत्या. एकूण १२ मागण्या आहेत. संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री नित्यानंद राय यांनी किसान संयुक्त मोर्चाची बैठक बोलावली आहे. तर ही आहे आज ४ वाजेपर्यंतची संयुक्त किसान मोर्चाची अपडेट. या बैठकीतून तोडगा निघतो का नाही? यावर आपलं लक्ष असणारचं. तर या आजच्या महत्वाच्या घडामोडी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com