
Kolhapur News: केंद्र सरकार आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) वतीने स्थापन झालेल्या शंभर वैरण कंपन्यांमध्ये शिंदेवाडी (ता. कागल) येथील गौ ॲग्रीटेक या वैरण उत्पादक कंपनीने उत्कृष्ट कामकाजात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालक व शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. कंपनीस मक्याचा चारा देणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीने प्रति टन २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.बाजारभावापेक्षा हा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
‘एनडीडीबी’च्या मदतीने देशभरात स्थानिक दूध संघांच्या माध्यमातून शंभर वैरण उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भारत सरकारचा कंपनी व सहकार कायदा एकत्र करून एक मॉडेल बनवले. या अंतर्गत शंभर वैरण उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या. राज्यामध्ये पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज), बारामती दूध संघ (बारामती), राजारामबापू दूध संघ (इस्लामपूर) विलासराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र (लातूर) व कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून (गोकुळ) शिंदेवाडी (ता. कागल) येथे गौ ॲग्रीटेक ही कंपनी स्थापन झाली.
या कंपनीच्या माध्यमातून जिल्हा भरात विविध ठिकाणी मका लागवड करून तो मका ८० - ८५ व्या दिवशी प्रतिटन २५०० रुपये दराप्रमाणे खरेदी केला जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे पुरवणे बरोबरच खते, कीटकनाशके पुरवली जात आहेत. कंपनीचे शेती अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीचे हे पीक वर्षभरात दोन ते तीन वेळा घेण्यात येत आहे.
महापुरासारख्या समस्येने नदीकाठची शेती बाधित होऊन ऊस पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्याला उत्तम पर्याय मका पीक ठरत आहे. पावसाळ्यातील चार महिने वगळता नदीकाठच्या शेतात कमीत कमी दोन मका पिके घेण्यात येत आहेत. मक्याच्या एका पिकातून १६ ते २० टन इतके उत्पादन मिळते. एकूण उत्पादन ४० हजार रुपये ते ५० हजार रुपये मिळत आहे.
उत्पादन खर्च वजा जाता दोन महिन्यांत ३० ते ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. वर्षभरात दोन पिके घेतल्यास ६० हजार ते ८० हजार रुपये आर्थिक प्राप्ती होत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला मका कंपनीच्या हार्वेस्टरने कापून कंपनीच्या वाहनाने वाहतूक केली जात आहे. लवकरच कंपनीमार्फत पेरणीयंत्र, कीटकनाशके, तणनाशके फवारणीसाठी ड्रोन, सवलतीच्या दरात खते व कीटकनाशके पुरवणे मका पिकाची संपूर्ण माहिती ‘एसएमएस’द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.