Pratap Pawar : स्वतःच्या गुणवत्तेवर पुढं जा!

Article by Pratap Pawar : घराणं हा विषय माझ्या मनात कधी आला नाही. एका गोष्टीची खंत जरूर आहे; माझ्या भावंडांबद्दल कोणतीही पूर्ण माहिती न घेता गैरसमज पसरवले गेले.
Pratap Pawar
Pratap PawarAgrowon
Published on
Updated on

प्रताप पवार

‘पवार घराणं’ हा विषय कायम चर्चेत असतो...तुम्ही याकडे कसं पाहता?

घराणं हा विषय माझ्या मनात कधी आला नाही. एका गोष्टीची खंत जरूर आहे; माझ्या भावंडांबद्दल कोणतीही पूर्ण माहिती न घेता गैरसमज पसरवले गेले. पवार घराण्याकडे बोट दाखवावं किंवा शाप द्यावा असं आमच्यापैकी कुणीही काहीही केलेलं नाही. हजारो लोकांच्या जीवनात काही चांगलं घडवल्याचं समाधान आम्हां प्रत्येक भावाला आहे. ही वस्तुस्थिती आहे.

आम्ही कधीही आमच्या कार्याचा गाजावाजाही केला नाही आणि करणारही नाही. कारण, समाजाविषयी ते आपलं कर्तव्य आहे हीच आमची भावना आहे. ‘समाज चांगला पाहिजे’ असं आपण म्हणतो; परंतु तो चांगला होण्यासाठी आपलं काही योगदान आहे का? भले खारीचा वाटा असेल...परंतु माझ्या प्रत्येक भावाचं, बहिणीचं आणि पुढच्या पिढीचंही हेच योगदान आहे असं मी म्हणेन.

वायनरीचं एक उदाहरण सांगतो. बारामतीत शेतकऱ्यांनी एक वायनरी सुरू केली होती. तत्कालीन राज्य सरकारच्या काही धोरणांमुळे ती तोट्यात आली. एका नवीन उत्पादनाची तातडीनं उभारणी केल्यास ही वायनरी वाचेल, असं संचालक मंडळाच्या लक्षात आलं. ती संपूर्ण जबाबदारी माझ्या दोन्ही वडीलबंधूंनी माझ्यावर टाकली. मी माझा मूळ व्यवसाय सोडून बारामतीत सहा महिने मुक्काम ठोकला. वायनरीचा प्रकल्प यशस्वी झाला. या काळात वैयक्तिक व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यानं माझं भरपूर आर्थिक नुकसान झालं.

त्या वेळी मला सल्ला दिला गेला, ‘शरद पवारांमुळे तुम्ही तिथं काम केलं, तर त्यांच्याकडून पैसे घ्या.’ मी म्हणालो, ‘अंतिम निर्णय माझा होता, त्याचे परिणाम मीच भोगले पाहिजेत. मी व्यावसायिक आहे. माझ्या व्यवसायात नफ्या-तोट्याची जबाबदारी माझी आहे. ती वायनरी चालवण्याबाबत मला सांगितलं गेलं होतं, त्या वेळी मी ‘होय’ म्हणालो. त्यामुळे वायनरीची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. हे जरी सामाजिक दायित्व असलं तरी त्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं. ते मी भरून काढेन.’

आणि, पुढच्या तीन-चार महिन्यांत मी ते नुकसान भरून काढलंही. तो माझ्या स्वभावाचा भाग आहे. आमच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत, असा समज, कोणतंही तथ्य नसताना, समाजात पसरवला गेला. अर्थात, याबाबत ‘माझी वाटचाल’ या पुस्तकात ‘उचलली जीभ’ या प्रकरणात मी लिहिलं आहे. आमचं काही ऐकून घ्यावं, असं समाजाला कधी वाटलं का? नाही वाटलं. माझ्या दृष्टीनं सर्वांत वेदनादायी भाग हा आहे.

मी अनेकदा विद्यार्थ्यांशी बोलायला जातो, समाजात जातो त्या वेळी घरोघरी आम्हाला प्रश्न विचारला जातो, ‘तुम्हाला पैशाला काय कमी आहे?’ अप्पासाहेब पवारांनी आयुष्यभर शेतीत योगदान दिलं म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला. मी पंचावन्न वर्षं सामाजिक कामात योगदान दिलं म्हणून मला ‘पद्मश्री’ किताब मिळाला आहे, याची एक टक्का लोकांनाही जाणीव नाही. ही सामाजिक व्यथा आहे आणि आम्ही पवार कुटुंब तिचे बळी आहोत.

आमचे सहकारी कोण आहेत, आमचे विचार काय आहेत, याविषयी समाजानं कधी विचारलं नाही. जगभरात आम्ही माल विकतो, आम्ही युनिक प्रॉडक्ट तयार करतो यात कुणाला रस नाही. ‘तुम्ही पैसा फुकटात कमावला’ अशीच समाजाची भावना आहे. माझ्या मते, हे केवळ राजकीय कारणामुळे तयार केलं गेलेलं मत आहे. हे खूप खोलवर आहे. भले त्यामागं ‘शरद पवार’ हे कारण असावं. हे हेतुपूर्वक आहे. समाजानं दुसरी बाजू ऐकून घ्यावी. कुणीतरी मोठ्यानं बोलतो आहे, सातत्यानं बोलतो आहे त्यामागची वस्तुस्थिती शोधावी.

Pratap Pawar
Pratap Pawar : स्वतःची ओळख होणं महत्त्वाचं...!

सहज एक उदाहरण म्हणून सांगतो...तशी अनेक आहेत. माझ्या एका अत्यंत जबाबदार, कर्तृत्ववान, बुद्धिमान मित्रानं मला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला. अर्थातच त्यालाही तो कुणीतरी पाठवला होता. त्यात असं म्हटलं होतं, ‘मोदी सरकार आल्यापासून सुप्रिया सुळे यांना त्यांच्या दहा एकर जमिनीतून वीस कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवणं अशक्य झालं आहे.’ अर्थात हा मोदीमहिमा!

मी त्या मित्राला लेखी विनंती केली, ‘या माहितीबद्दल मी आभारी आहे; परंतु आपण जबाबदार व्यक्ती असल्यानं याची शहानिशा केली असणार. कृपया मला याबद्दल संपूर्ण माहिती, आकडेवारी द्याल का? मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.’ तीन-चार दिवसांनी माझ्या या मित्रानं माझी माफी मागितली. तो म्हणाला, ‘‘हा संदेश सर्वांना पाठवण्याआधी शहानिशा करायला हवी होती.’’

हा द्वेष कशासाठी? का हा खोटा आरोप? मतांसाठी? दुर्दैव आहे. अशा उच्चशिक्षित व्यक्ती जिथं प्रभावित होतात, तिथं सर्वसामान्य माणसांचं काय?

इंग्लंडमध्ये डॉक्टर असलेल्या व्यक्तीनं सर्वांसमोर, आम्ही पवारमंडळी किती असुसंस्कृत, अशिक्षित, गावंढळ आहोत याचं रसभरीत वर्णन मलाच ऐकवलं! नंतर शहानिशा करून दिल्यावर माझे पाय धरून माफी मागितली ही गोष्ट वेगळी. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची आहे. समाजानं दुसऱ्यावर केलेल्या दोषारोपांची शहानिशा करावी याचा सहसा प्रयत्न केला जात नाही. दोन महिन्यांपूर्वी एकाच दिवशी दोन घटना घडल्या.

‘राजकीय बातमी न मिळाल्यास ही बातमी पाठवू पण नका,’ अशा काही माध्यमसंस्थांच्या सूचना होत्या. अशा उदाहरणांची माझ्याकडे जंत्री आहे. आमच्याविषयीचा कुठलाही थेट अनुभव न घेता ऐकीव माहितीच्या आधारेच आमच्याविषयी गैरसमज करून घेतले जातात.

सध्या समाज कुठं उभा आहे? तुम्हाला काय वाटतं?

मला कायम चांगली माणसं भेटली. समाजात चांगली माणसं आहेत. त्यामुळे मी आशावादी आहे. स्वातंत्र्यानंतर काही धोरणं चुकली. कमाल जमीनधारणा कायदा आला. १८ एकर बागायत जमीन... शेतकऱ्याला चार-पाच पोरं...तिसऱ्या पिढीत जमीन दीड एकरावर आली...शेतावर जगण्याची परंपरा होती; परंतु शेतीच काढून घेतली गेली...

त्यातून सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. आमच्या शिक्षणव्यवस्थेत दोष आहेत. उद्योग-व्यवसायवाढीसाठी पुरेसं पूरक धोरण ठरवलं गेलं नाही. शरद पवार यांच्या काळात ‘सिकॉम’ वगैरे आलं. त्याशिवाय नवीन काही महाराष्ट्रात झालं नाही, त्याबद्दल कुणी बोलत नाही. रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण होत नाहीत ही माझ्या दृष्टीनं मोठी समस्या आहे. त्यातून अनेक सुशिक्षित तरुण वैफल्यग्रस्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात निघणारे मोर्चे रोजगारासाठी आहेत.

तुम्ही सर्व क्षेत्रांत वेगळा ठसा उमटवला; परंतु राजकारणापासून मात्र लांब राहिलात...काही खास कारण?

मी नेहमी गमतीनं सांगतो, सचिन तेंडुलकर क्रिकेट खूप छान खेळतो म्हणून मीही खेळायचं का? तो तेंडुलकर आहे ना! महंमद रफी खूप छान गाणं गात असत. मग मीही गायचं का? कुणी ऐकेल का माझं गाणं? आपण कोण आहोत, हे समजलं पाहिजे. आपल्याला समाधानी राहायचं असल्यास आवडीच्या क्षेत्रातच गेलं पाहिजे. वडिलांनी सांगितलं म्हणून मी वैद्यकीय क्षेत्रात नाही गेलो.

मला माहीत होतं की, या क्षेत्रात मी यशस्वी होणार नाही. राजकीय क्षेत्राचं तेच आहे. जिथं आवड नाही तिथं जाऊन मी करू काय? त्या वाटेला जाऊ कशाला? त्यातून पुन्हा शरद पवार यांचा भाऊ म्हणून? माझं कर्तृत्व काय? अर्थात, एवढं काम करूनही आम्ही ‘शरद पवार यांचे भाऊ’ म्हणूनच ओळखलो जातो. राजकारणात गेलो असतो तर काय झालं असतं?

उद्योजक, सामाजिक काम यांपैकी तुम्हाला सर्वाधिक काय भावतं?

कसं असतं, आईला तिची सर्वच मुलं आवडत असतात. तुम्ही स्वेच्छेनं काम स्वीकारलं आहे ना! ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. समाजातल्या चार कुटुंबांचं जीवन चांगलं करता आलं याचा आनंद मोठा आहे. अंधशाळेचं काम करत असतानाची गोष्ट. शस्त्रक्रिया केल्यामुळे तीन मुलांना दिसू लागलं.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान कशात मोजणार? त्यातून आपल्याला मिळणारा आनंद, समाधान अवर्णनीय असतं. ‘झाडं लावली पाहिजेत’ हे जोरात सांगितलं जातं; मात्र प्रत्यक्षात स्वतः दोन झाडं लावून ती तुम्ही जगवली आहेत का? तो अधिकार आधी मिळवा. त्यामुळे मी माझ्या पसंतीनं कामं केली आहेत.

राज्यपालांनी माझी सिनेटवर निवड केली. मी वर्षभरात राजीनामा दिला; कारण, तिथं राजकारण असतं. जिथं मी योगदान देऊ शकत नाही तिथून मी लगेच बाहेर पडतो. भले तो सन्मान असेल; परंतु तो मला नकोय. ही स्पष्टता माझ्याकडे आहे. मी वेळ देऊ शकत नाही असं मला ज्या ठिकाणी वाटतं तिथून मी स्वतःला बाजूला करतो.

हा डिटॅचमेंटचा स्वभाव कसा तयार झाला?

मी शाळेत असतानाची आठवण आहे. माझे सर्वांत थोरले भाऊ प्रथितयश वकील होते. मी अत्यंत तापट होतो. आमचे आजोबाही अत्यंत तापट होते. हे थोरले बंधू एकदा म्हणाले, ‘‘प्रताप आजोबांवर गेला आहे.’’ ते माझ्या मनाला खूप लागलं. मी जाणीवपूर्वक प्रयत्न करून तापटपणा कमी केला. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व समजलं आहे का, तुमचे गुण-दोष समजले आहेत का, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात का...

हे महत्त्वाचं आहे. रोज रात्री झोपताना मी आढावा घेतो...स्वतःचं व्यावसायिक कर्तव्य आणि दुसऱ्यासाठी काही चांगलं केलं आहे का? दुसऱ्यासाठी करताना निःस्वार्थी हेतूनं केलं का याचाही विचार मी करतो. हा माझ्या जगण्यातला आनंद आहे. म्हणून मी म्हणतो, ‘माझा सदरा हा सुखी माणसाचा सदरा आहे.’ जगात प्रत्येक जण पूर्णतः वेगळा आहे. कुणाची कुणाशी तुलना होऊ शकत नाही. दोष, कमतरता कुणामध्ये नाहीत? परंतु ही बाब समजून घेतली पाहिजे.

तुमच्यातल्या ऊर्जेचं रहस्य काय?

एकतर मनात पाप नाही. दुसऱ्याचं नुकसान करण्याचा विचारही मनात येत नाही. चांगलं करता आलं नाही ना...मग निदान वाईटही करणार नाही. कायम नवीन शिकायची इच्छा असते. ‘बारामती अॅग्रो ट्रस्ट’मध्ये मी नुकताच जाऊन आलो.

तिथं आपल्या प्रयत्नांतून हजारो शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर ते किती मोठं समाधान आहे! मला शिकायला कायम आवडत असल्यानं वयाचा विचार मनात, डोक्यात येतच नाही. वेळच नाही ना डोक्यात यायला...! आपल्या सदसद्‌विवेकबुद्धीनं काम करत राहायचं हीच धारणा असते.

आयुष्याचं तत्त्वज्ञान कसं मांडता?

माझ्या आई-वडिलांनी सांगितलं, ‘आपलं कर्तव्य करत राहायचं.’ सामाजिक बांधिलकीची जाणीव आयुष्यभर ठेवण्याचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. त्याविषयीच्या जबाबदाऱ्याही घेतल्या आहेत. उदाहरणार्थ : वायनरीमध्ये नुकसान झाल्यावर शरद पवारांकडे नाही पैसे मागितले; कारण तो निर्णय माझा होता, त्याच्या परिणामांची जबाबदारीही माझीच. हे तावून-सुलाखून बाहेर पडणं एक प्रकारचं अग्निदिव्यच आहे. अजाणतेपणानं माझ्याकडून काही चुका होत असतील, त्या मी मान्य करतो.

Pratap Pawar
Pratap Pawar : आता आपलं राज्य

माणसांमध्ये काय वाचता?

मी क्षमता, दृष्टिकोन पाहतो. ‘सकाळ’चं उदाहरण सांगतो. मी सूत्रं घेतल्यानंतरची गोष्ट. शहात्तर कर्मचारी कमी शिकलेले होते. त्यांना शिकायची इच्छा होती; परंतु परिस्थिती नव्हती. त्यांना विचारलं, ‘शिकायचं का?’ सर्वजण तयार झाले. त्यांना प्रोत्साहन दिलं. सर्व कर्मचारी केवळ पदवीधरच झाले असं नव्हे तर, १४ जणांनी पदव्युत्तर शिक्षणही घेतलं. एकानं डॉक्टरेट केली. कोणताही बाँड नाही.

त्यातले काहीजण ‘सकाळ’सोडून अन्य दैनिकांतही गेले; परंतु मला वाईट वाटलं नाही. मी माझं कर्तव्य केलं. यामागं माझा उद्देश काय होता, तर त्यांना शिकायची इच्छा होती; परंतु त्यांची परिस्थिती नव्हती; मग आपण संधी देऊ शकतो का, असा विचार मी केला. काम सांभाळून अभ्यास करायला त्यांना सांगितलं होतं.

त्यांच्याकडून काही अपेक्षा केली नाही. चांगली माणसं तयार व्हावीत एवढीच इच्छा होती. हे एक प्रकारचं मानसिक प्रशिक्षण आहे. ते दिल्यानंतर कर्मचारी खुलले. मी कुणाकडूनही कायदेशीरच काय, नैतिक बाँडही घेतला नाही. उत्तम नागरिक, कर्मचारी घडवणं हा माझा उद्देश होता. ‘सकाळ’मधल्या होतकरू कर्मचाऱ्यांना कायम संधी दिली. त्याचे चांगले परिणाम दिसले. निरपेक्षपणे काम करण्यात एक विलक्षण समाधान असतं.

उद्योग-व्यवसाय आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधला?

कामाच्या व्यापात कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही ही खंत आयुष्यभराची आहेच; परंतु आमच्या घरात मातृसत्ताक पद्धत. आई जसं सर्व पाहत असे, तसंच माझी पत्नी भारती हिनं संपूर्ण कुटुंब सांभाळलं. तिचं मुलांवर अतिशय बारकाईनं लक्ष होतं. आता मात्र नातवंडांमध्ये छान रमलो आहे.

तुम्ही नेटकेपणाबाबत आणि वेळेबाबत आग्रही असता, यामागं काही खास कारण?

माझ्याकडे वाया घालवायला वेळच नव्हता. सामाजिक काम करत असताना, संस्थेनं मला वेळ मागितला आणि मी दिला नाही, असं एकदाही घडलं नाही. मी वेळ दिली आणि पाळली नाही, असंही कधी झालं नाही. माझी स्वतःशी वचनबद्धता असते. मी या बाबीचा कायम सन्मान करतो; मग ती वेळ असो किंवा कुणा पुरवठादाराचं, कर्मचाऱ्यांचं वेतन असो, माझं कर्तव्य मी करणारच. त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होत असतं.

ही वचनबद्धता आयुष्यभरासाठी आहे. ती पाळता येत नसेल तर बाजूला व्हायला हवं. मोह टाळता आला पाहिजे. काय करू शकतो, काय करू शकत नाही याबाबत स्पष्टता असली पाहिजे. कुणीतरी स्तुती करतोय म्हणून वाहवत जायला नको. तुम्हाला चांगलं जगायचं आहे ना, मग तुमचं शरीरही निरोगी पाहिजे. तुम्ही काय वाचता किंवा काय शिकता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला शरीर ऊर्जावान पाहिजे तर ते फुकट कसं मिळेल?

कोणतंही वाहन घेतलं तर आपण त्याची सर्व्हिसिंग करतो; मग शरीराचंही नको का? ‘व्यायाम करा’ असं आपण कुणाला सांगतो, त्या वेळी, ‘मी करतो का,’ हा प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा. उपदेश करण्याचा अधिकार मिळवण्याआधी आपण तसं वागलं पाहिजे. दिवसातल्या २४ तासांपैकी एक तास स्वतःला देता येत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.

दिवसभरात एक तास स्वतःला देऊ शकत नाही इतकं कुणी व्यग्र नसतं. मी प्रवासात स्पोर्टस् शूज जवळ ठेवतो. वेळ मिळतो त्या वेळी विमानतळावरही चालतो. इच्छा असेल तर तुम्हाला वेळ निश्चितच मिळतो. सर्व काही मनोनिग्रहावर अवलंबून आहे. तुमचा प्राधान्यक्रम इच्छाशक्तीवर ठरतो. कामाच्या व्यापात थोडं स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे.

समाजाला काय सांगाल?

व्यवहार शिका. ‘येत नाही’ हे कारण सांगणं माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे. आमच्याकडे पैसे नव्हते, हा काय गुन्हा आहे का? मला टाय बांधता येत नव्हता, मला इंग्लिश सफाईदारपणे बोलता येत नव्हतं, हा काय माझा गुन्हा आहे का? परंतु शिकलो ना सर्व. आपल्या कमतरता लक्षात घेऊन त्यांच्यावर मात करून पुढं जाणं हा एकमेव मार्ग आहे. त्याला वेळ लागेल; परंतु तुम्ही मात करू शकता. आता नोकऱ्या मिळू शकत नाहीत.

तर, प्राप्त परिस्थितीत काय केलं पाहिजे हा विचार करायला हवा. समाजाच्या व्यथा दिसत आहेत, त्यांचं उत्तर आत्ता कदाचित तुमच्याकडे नाही; परंतु व्यथा दूर करण्यासाठी काही करता का, त्या दिशेनं काही प्रयत्न करता का? हे तपासावं. तरुण पिढीनं आपल्यातल्या कमतरता शोधून त्यांच्यावर मात केली पाहिजे. समाजाला दोष न देता, स्वतःच्या गुणवत्तेवर पुढं गेलं पाहिजे. जगात कुठंही जाण्याची तयारी पाहिजे.

तुमच्या दृष्टीनं समाधान म्हणजे काय?

मी वैयक्तिक पातळीवर कधी अस्वस्थ नसतो. फक्त एखाद्या सामाजिक प्रश्नावर अस्वस्थ असतो. समाजाच्या प्रश्नांविषयी तुमच्या मनात कणव आहे का आणि त्यासाठी तुम्ही काही करत आहात, हे तपासणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ : ‘विद्यार्थी सहायक समिती’द्वारे वर्षभरात आठशे विद्यार्थ्यांचं आयुष्य आपण बदलू शकतो, याचं समाधान आहेच ना. अर्थात् समाधान मानण्यावर आहे.

माझ्या मनात काही गोष्टींबाबत अत्यंत स्पष्टता आहे. मी व्यवसाय करतो तो नफा मिळवण्यासाठी आणि सामाजिक काम करतो त्यात मात्र कोणताही स्वार्थ असत नाही. व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे.. त्याला कष्ट आहेत. ते करण्याची तयारी असावी. त्याचबरोबर समाजासाठी भलं करता आलं तर जरूर करावं, असा माझा दृष्टिकोन आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्‍स यांनी बारामतीच्या ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’बरोबर - जगातलं पहिलं - शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याबाबतचं केंद्र सुरू केलं. त्याचा देशातल्या लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्या केंद्राचं उद्‍घाटन शरद पवार यांनी केलं. त्याच दिवशी पंतप्रधानांनी ‘शरद पवार यांनी शेतीसाठी काय केलं?’ असा प्रश्न जाहीररीत्या विचारला. सर्व मीडियानं पंतप्रधानांना पहिल्या पानावर स्थान दिलं. देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘अॅग्रिकल्चर ट्रस्ट’च्या कार्यक्रमाच्या बातमीचं कुणालाच (अपवाद वगळता) महत्त्व वाटलं नाही.

(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक ८४८४९ ७३६०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com