
प्रताप पवार
प्रश्न : अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण होत असताना उद्योजक व्हावं असं तुम्हाला का वाटलं?
उद्योजक व्हावं असं मला मी पिलानीत असतानाच वाटत होतं. कारण त्या वेळी माझ्याभोवती मारवाडी मित्र होते. मारवाडी समाजात नोकरी करणारा कुणी क्वचितच असतो. या मित्रांच्या घरी आम्ही जायचो, त्यामुळे काही कुटुंबांशी कौटुंबिक स्नेह निर्माण झाला.
त्यांच्या सर्व गप्पा व्यवसाय, आर्थिक उलाढाल, नवीन प्रकल्प यांवरच आधारित असायच्या. आपण जेवताना साहित्य, राजकारण अशा गप्पा मारतो; परंतु त्यांच्या चर्चा व्यवसायाच्या. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे, आमच्या आई-वडिलांचं म्हणणं होतं, की शिक्षण झालं की घरी यायचं नाही.
त्यामुळे डोक्यात चक्र निर्माण झालं... मी बीई झाल्यावर आई-वडिलांची जबाबदारी संपली होती. या दोन गोष्टींमुळे उद्योजक झालो आणि तिसरी गोष्ट म्हणजे, पिलानीत एक चांगली बाब होती, ती अशी, की प्रत्येक वर्षी दोन महिने - म्हणजे साठ दिवस - एखाद्या प्रोजेक्टवर काम करावं लागायचं.
त्यासाठी शंभर गुण असत. त्यामुळे मुकाट्यानं काम करावं लागायचं. मला चार ठिकाणी काम करावं लागलं. त्यापैकी सर्वच ठिकाणी मला सांगण्यात आलं, ‘बीई झाल्यावर नोकरीसाठी अर्ज करू नका, थेट आमच्याकडे रुजू व्हा.’ मी एक मराठी माणूस. एकाच वेळी माझ्या हातात चार नोकऱ्या म्हणजे फार मोठं फलित होतं.
त्याचा आणखी एक फायदा असा झाला, की आपण हजार-पाचशे माणसं सहज हाताळू शकतो, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. माझे अनेक मित्र अमेरिकेत जाऊन एमएस झाले; परंतु आपलं ते ध्येय नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं. थोडाफार व्यवसाय, फायनान्स समजतो; मग त्यातच करिअर करायला आवडेल हे जाणवलं. ‘तुम्ही कोण आहात’ ही स्वतःची ओळख होणं फार महत्त्वाचं असतं. माझ्या आयुष्यात दोन टर्निंग पॉइंट आहेत.
माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. त्यातलं पहिलं कारण, मी अभ्यासात हुशार होतो आणि दुसरं कारण म्हणजे, त्यातून समाजाची सेवा करता येईल हा त्यांचा उद्देश होता. मात्र वैद्यकीय विषयच मला अतिशय रुक्ष वाटतोय असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी ‘नाही’ म्हणून सांगितलं. यावर वडील माझ्यावर भयंकर रागावले; परंतु आई म्हणाली, ‘‘तुला जे योग्य वाटतं ते कर.’’ मी वडिलांना म्हणालो, ‘‘मी रट्टा मारून डॉक्टर होईनही; परंतु मी आयुष्यात अयशस्वी होईन; कारण मला तो विषय आवडत नाही.’’
‘हा विषय आवडत नाही,’ हे सांगण्याची स्पष्टता त्या काळी कशी निर्माण झाली?
आमचा वडिलांशी संवाद कधी नव्हताच. जे काही असेल ते आम्ही आईशी मोकळेपणानं बोलायचो. सर्वांना आश्चर्य वाटेल; पण मी वडिलांशी पूर्ण आयुष्यात तास-दोन तासच बोललो असेन! आमच्या बहिणी मात्र त्यांच्या लाडक्या होत्या. त्यांच्याशी वडिलांच्या खूप चांगल्या गप्पागोष्टी होत असत.
आम्ही सर्व भावंडं आपापल्या क्षेत्रात मोठी झाल्यावरची गोष्ट... वडील आल्यावर आम्ही एकेक करून खोलीतून बाहेर जात असू. ते एकटेच उरायचे. कारण बोलायचं काय? त्यांचा दरारा, व्यक्तिमत्त्व हे सर्व होतं; परंतु संवाद नव्हता. जो काही संवाद होता तो आईशी. आमची आई हुशार आणि धाडसी होती. आम्ही आईशी मोकळेपणानं बोलायचो. ती म्हणाली, ‘‘तुला जे योग्य वाटतं ते कर, वडिलांशी काय बोलायचं ते मी पाहते.’’
शरद पवारांच्या आयुष्यातही असा प्रसंग आला. म्हणजे, प्रत्येक भावाच्या आयुष्यात हा टर्निंग पॉइंट आला. त्या वेळी माझी आई त्या त्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे सर्वांचं करिअर झालं. आम्हा सर्व भावांचं ‘आई-आई’ असं जे चालतं त्याचं मूळ कारण तिथं आहे.
तिनं प्रत्येक मुलाला त्याच्या कलानं, त्याची क्षमता काय आहे, त्याला काय महत्त्वाचं वाटतं हे जाणून घेऊन प्रोत्साहन दिलं. भलेही वडिलांची इच्छा तशी नसो. त्या काळी घरातल्या कर्त्या पुरुषाच्या विरोधात उभं राहणं ही सोपी गोष्ट नव्हती. अर्थात, आईनं सांगितल्यावर वडीलही त्यावर कधी काही बोलले नाहीत.
पिलानीतल्या मराठी कुटुंबांशी कसं नातं होतं?
पिलानीत पंधरा-वीस मराठी कुटुंबं होती. मी पिलानीत गेल्यावर, कुणी मराठी कुटुंब आहे का, हे शोधत होतो. त्या वेळी तिथं महाराष्ट्र मंडळ असल्याचं समजलं. मराठी मुलं त्या मंडळाची सदस्य आपोआप व्हायची किंवा त्यानं सदस्य केलं जायचं. तिथल्या सर्व कुटुंबांशी माझी नाळ घट्ट झाली. लहान मुलांबरोबर खेळण्याची कला माझ्यात होती.
पिलानीत प्रत्येकाचा छोटासा बंगला. चौकोनी कुटुंब. दोन मुलं आणि आई-वडील. त्यांच्या मुलांबरोबर मी खेळायचो. त्यामुळे दृढ नातं निर्माण झालं होतं. मुलांना कुणी काका-मामा हवा असतो. तो मी होतो. त्यांच्या आई-वडिलांना माहीत होतं, की त्यांच्या मुलाचा आवडता काका कोण, तर प्रतापकाका! त्यातून आमच्यात आत्मीयता निर्माण झाली ती कायमचीच.
एकमेकांच्या सुख-दुःखांच्या गोष्टी बोलणं हा आमच्या जीवनाचा एक भाग होता. डॉ. गोंधळेकरांच्या बाबतीत काही भावनिक प्रसंग निर्माण झाला. तो मी व्यवस्थित हाताळला. त्यांची मुलं आजही माझ्या संपर्कात आहेत. इतर मराठी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्याशी माझं वेगळं नातं निर्माण झालं. मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गोंधळेकरांचा विशेष दबदबा होता; परंतु माझ्यासाठी ते अण्णा होते.
एकदा त्यांचा मुलगा माझ्याकडून सायकल शिकत होता. त्या वेळी गोंधळेकर यांच्या पत्नीनं ते पाहिलं. त्याही डॉक्टर होत्या. त्या मुलांना म्हणाल्या, ‘‘अरे, पवारकाकांना किती त्रास देता?’’ मी म्हणालो, ‘‘मला आवडतं. मी त्यांना शिकवतो आहे. मुलं आनंद घेत आहेत.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘इतकी जवळीक असू शकते हे मला माहीतच नाही.’’ कारण त्याही मुंबईतून चौकोनी कुटुंबातून आल्या होत्या.
त्या कुटुंबानं हितचिंतक म्हणून माझ्याकडे पाहताना या गोष्टींचा कुठं तरी माझा विचार झाला असला पाहिजे. मला व्यवसाय करायचा होता. आई-वडील एक रुपयाही देणार नव्हते. आमच्याकडे फुकटातला पैसा आहे हे गृहीतक घराघरात इतकं पक्कं आहे की, दुसरी बाजू कधी ऐकली गेली नाही...कुणाला ती समजूनही घ्यायची इच्छाही नाही. तो भाग वेगळा. व्यवसाय सुरू करण्यासाठी डॉ. गोंधळेकरांनी मला पैसे दिले.
असे ऋणानुबंध निर्माण झालेले होते ते कायमचेच. डॉक्टरांच्या अखेरच्या श्वासापर्यंत. नंतरच्या काळात किर्लोस्कर कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केलं. मी ‘किर्लोस्कर’चा संचालक झालो तरी पुरवठादार म्हणूनच जायचो तिथं. मी सांगायचो : ‘‘तुम्ही मला मदतीचा हात द्या; परंतु मला प्राधान्य नको, गुणवत्तेवर व्यवसाय द्या. कारण, मला अशी सवय लागली तर अन्य ठिकाणी मी कशी स्पर्धा करणार?’’
उद्योगक्षेत्राप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातही तुम्ही तितक्याच समरसतेनं वावरत आहात. दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या?
या गोष्टी साध्य करायला खरोखरच काहीच अडचण आली नाही. लोकांना वाटतं, की मी खूप काम केलं. प्रत्यक्षात सामाजिक क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाच्या व्यक्तींशी माझी भेट झाली. अच्युतराव आपटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, बाबासाहेब जाधव, निर्मलाताई पुरंदरे, किशाभाऊ पटवर्धन, शोभनाताई रानडे, डॉ. माचवे, शंतनूराव किर्लोस्कर अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. मी त्यांचा सहायक होतो. संस्था तेच चालवत असत, मी मदत करत असे.
आजही ‘विद्यार्थी सहायक समिती’त मी रोज जात नाही. धोरण ठरवण्यापुरता सहभाग. ‘बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट’मध्ये मी काही क्षेत्रांत धोरण ठरवतो. तिथंही दैनंदिन कामात लक्ष घालत नाही; परंतु संस्थेला योग्य दिशा मिळेल, चांगलं काम होईल असं धोरण ठरवतो; अगदी ‘जोशी हॉस्पिटल’ किंवा ‘विद्यार्थी सहायक समिती’ असो. त्यामुळे तुम्ही मर्यादित; परंतु ‘क्वालिटी टाइम’ देऊन योग्य नियोजन करू शकता.
सुदैवानं वाया घालवायला माझ्याकडे वेळ नाही आणि कुणा एखाद्याला विशिष्ट वेळ दिली असल्यास ती मी दुसऱ्याला देत नाही. याचा एक अनुभव सांगतो, मी टोरोंटोमध्ये होतो. माझ्या नित्यक्रमानुसार योगासनं करत होतो. त्या वेळी भारतातून फोन आला. मी तो घेतला नाही. कारण माझी ती वेळ व्यायामाची होती. मी ज्यांच्याकडे मुक्कामाला होतो त्यांनाही याचं मोठं आश्चर्य वाटलं. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं, की सकाळी आठ ते नऊ ही माझी व्यायामाची वेळ असते.
आपण उगाचच विचार करतो...फोन नाही घेतला तर समोरच्याला काय वाटेल? नंतर बोलता येत असतं. त्याला काय वाटायचं ते वाटू द्या ना. तुमचा प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे. तुम्ही काही वाईट काम करता का? स्वतःसाठीच तर वेळ देत आहात ना...यातून वचनबद्धतेची सवय लागते. त्यासाठी दृढशक्ती, इच्छाशक्ती लागते, ती मी माझ्या प्रत्येक कामात देत असतो.
माणसं निवडताना तुमचा अनुभव, तुमचे निकष काय असतात?
वेगवेगळ्या संस्थांत माणसांची निवड करताना, त्यांच्यातल्या शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा मी क्षमतेला महत्त्व देतो. त्यामुळे, माझ्याबरोबर पंचवीस-तीस वर्षं सलग काम करणारी डझनावारी माणसं आहेत. ती चांगली तयार झालेली आहेत. मध्यंतरी मी एक कंपनी विकत घेतली. सर्व व्यवहार कंपनीच्या माणसांनी केला. कारण, मला काय अपेक्षित आहे, हे त्यांना माहीत झालेलं आहे.
माझ्या हाताखालच्या माणसांबद्दल माझ्या मनात कधीच संशय येत नाही. कारण वर्षानुवर्षं काम करत असल्यानं आत्मीयतेचं, पारदर्शक वातावरण निर्माण झालेलं आहे. ‘अजय मेटाकेम’मध्ये काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांची यादी केली; त्या वेळी लक्षात आलं, की पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करणारे तीसहून अधिक कर्मचारी आहेत.
त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मी कोणत्याही कर्मचाऱ्याकडे नोकर म्हणून पाहत नाही; मग तो माझ्या मोटारचा चालक का असेना. तो माझा सहकारी आहे, हाच विचार कायम माझ्या मनात असतो. तीच गोष्ट माझ्या पुरवठादारांबाबत आहे. त्यांना मी कधी दोन तास वाट पाहायला लावली नाही किंवा व्यवसाय देण्यामागं उपकाराची भावना ठेवली नाही, ठेवत नाही. पुरवठादारांना ताणून धरायचं आणि दर कमी करायचे हे मी करत नाही.
त्यांना ठरावीक वेळ दिली असेल तर त्या वेळी माझे दरवाजे उघडे असतात. भले त्याला किंवा तुम्हाला समवेत व्यवसाय करायचा नसेल; परंतु वचनबद्धता असायलाच हवी. गुणवत्ता, किंमत, सेवा यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड पुरवठादारांकडून होता कामा नये अशी माझी अपेक्षा असते, तर मग त्यांना दिलेला शब्द पाळण्याबाबत मलाही दक्ष राहायला हवं, असं माझं असं धोरण असतं.
तसा दक्ष मी राहतो. यामुळे संबंध दीर्घ काळ टिकून राहतात. ‘एबीटी प्राइस’ नावाची कॅनडातली कंपनी आहे, तिनं खास तिकीट पाठवून मला बोलावून घेतलं. त्यांना काय आवश्यकता होती? त्यामागं कारण होतं, वचनबद्धता. केवळ क्षमता असलेला ग्राहक म्हणून त्यांनी बोलावून घेतलं. मी ही पारदर्शकता कायम ठेवली. आणि व्यवसाय करणाऱ्यांचा कायम आदर केला.
तुम्ही प्रत्येक संस्थेवर जिवापाड प्रेम केलं. त्याबद्दल काय सांगाल?
आई मला कायम सांगायची, ‘‘सामान्य आयुष्य जगू नका. आयुष्यात काही तरी उत्तम करण्याचा प्रयत्न करा. ते करताना समाजाला विसरू नका. फक्त स्वतःपुरतं पाहू नका.’’
आई प्रत्यक्षात तशीच जगली. आमच्या घरात दोन-चार विद्यार्थी अभ्यासाला नेहमी असत. गोखले म्हणून एक आईची मैत्रीण होती. त्यांना आम्ही गोखलेमावशी म्हणायचो. या मैत्रिणीच्या आजारपणात आमची आई तिची आमच्या घरी तीन तीन महिने सेवा करायची. अशी अनेक उदाहरणं आहेत. आमच्याकडे तयार होणारा स्वयंपाक सर्वांसाठी सारखाच असायचा.
माणूस घरात आला तर, ‘का?’ ‘कोण?’ असा विचार आमच्या मनात कधीच आला नाही. आईकडून नकळत संस्कार झाले आहेत. मी शाळेत असताना हुतूतूची टीम तयार केली. तीत समाजातल्या सर्व घटकांतली (विशेषतः मागासवर्गीय) मुलं होती. त्या मुलांच्या अभ्यासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी मी काम करायचो. आठवीत असताना माझ्या वर्गात नातू, प्रभुणे वगैरे मित्र होते.
‘‘ते आता दिसत नाहीत,’’ असं आईनं एकदा विचारलं.
मी म्हणालो, ‘‘तसं काही नाही.’’
तिनं लगेच सांगितलं, ‘‘त्यांची संगत सोडू नकोस.’’
मला त्या वेळी राग आला.
मी आईला विचारलं, ‘‘तू हे का सांगतेस?’’
त्यावर ती म्हणाली, ‘‘त्यांच्या संगतीत तुझे विचार चांगले राहतील. भविष्यात तुला त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. त्यांची मैत्री सोडू नकोस.’’
महत्त्वाचं म्हणजे, अशा अनेक मित्रांशी आजही माझी मैत्री टिकून आहे. आपल्या मुलांना कुणाची संगत असावी, आम्ही कोणती पुस्तकं वाचतो, आम्ही कोणत्या विषयावर चर्चा करतो, आमचे मित्र कोण आहेत याबाबत ती सजग होती. अभ्यासाबरोबरच मुलं काय आणि किती खेळतात यावरही तिचा कटाक्ष असायचा. आणि कुणी मित्र अडचणीत आला, तर आम्ही त्याच्या मदतीला जात आहोत ना, यावरही तिचा कटाक्ष असायचा.
आमचे वडील आमच्याशी फार बोलत नव्हते, तरी त्यांचाही आईसारखाच दृष्टिकोन होता. ते बाळकडू आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे विविध संस्थांवर काम करत असताना माझ्या मनात उपकाराची भावना कधीच नसते. ती समाधानाची बाब असते. ‘सकाळ’ची धुरा घेतानाही हाच व्यापक दृष्टिकोन होता, याद्वारे वाचकांना, पर्यायानं समाजाला, अधिक चांगली माहिती देता येईल...
सामाजिक जाणिवेची जोड ‘सकाळ’च्या माध्यमातून देता येऊ शकेल हा विचार होता. सामाजिक संस्थांमधून मी खूप अतुलनीय काम केलं, असं मी कधीच मानत नाही. मी माझं सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे.
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा मला विश्वस्त केलं गेलं त्या वेळी अनेकांच्या भुवया वर गेल्या, ‘प्रताप पवार यांना कसं निवडलं? ते तर शरद पवार यांचे भाऊ आहेत...’
यावर डॉ. दाभोलकर म्हणाले होते, ‘मी कुणाची निवड करतोय हे मला माहीत आहे.’ बरं, दाभोलकरांचा आणि माझा जवळचा परिचय होता, असंही नाही. ‘सकाळ’मध्ये येऊन ते भेटत असत. ही उदाहरणं यासाठी, की मी पदं मागायला गेलो नाही, माझी निवड केली गेली. मी माणसं वाचली नाहीत असं नाही; परंतु माझं औद्योगिक किंवा सामाजिक काम असो, त्यात लोकांनी मला निवडलं.
‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’ असो, ‘भारत फोर्ज’ असो, ‘फोर्स मोटर्स’ असो, ‘फिनोलेक्स’ असो किंवा अन्य कंपन्या असोत, त्यांनी मला संचालक मंडळात येण्याची विनंती केली. जेव्हा मला वाटलं, की आता खूप काम झालं आहे, नवीन मंडळींना संधी मिळाली पाहिजे, तेव्हा मी ‘वॅन इन्फ्रा’च्या संचालकपदाचा राजीनामा दिला. लोकांना सत्ता, जागा, पद यांचा मोह असतो, तो मला कधीच नव्हता आणि आजही नाही.
पुढील भागात :
आमच्याबद्दल गैरसमजच जास्त पसरवले गेले..
घराणं हा विषय माझ्या मनात कधी आला नाही. एका गोष्टीची खंत जरूर आहे; माझ्या भावंडांबद्दल कोणतीही पूर्ण माहिती न घेता गैरसमज पसरवले गेले. हजारो लोकांच्या जीवनात काही चांगलं घडविण्याचं समाधान आम्हा प्रत्येक भावामध्ये आहे. ही वस्तुस्थिती आहे...
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक ८४८४९ ७३६०२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.