Loksabha Election Result 2024 : सोलापूर, माढ्यात भाजपला ‘दे धक्का’

Election Result : सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना तर माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णायक आघाडी घेत दे धक्का दिला आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Solapur News : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघांत सत्ताधारी भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले असून, सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना तर माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णायक आघाडी घेत दे धक्का दिला आहे. एकूणच सत्ताधारी भाजपला अति आत्मविश्वास नडल्याचे स्पष्ट झाले.

मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून निकाल दोन्हीबाजूंनी अगदी काही हजार मतांच्या फरकाने हलता राहिला. जसजशा फेऱ्या पुढे सरकत गेल्या, तसे निकालाचे चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने एकतर्फी राहत गेले. १८ व्या फेरीअखेर प्रणिती शिंदे या राम सातपुते यांच्यापेक्षा जवळपास ४४ हजार ६३६ हजार मतांनी पुढे राहिल्या. तर, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ११ व्या फेरीअखेर २९ हजार २०९ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयाकडे घौडदौड कायम ठेवली.

Loksabha Election
Loksabha Election 2024 Result : सुरुवातीचे कल; देशात एनडीए आघाडीवर तर महाराष्ट्रात महाआघाडीची महायुतीला टक्कर!

विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी टपाली मतांमध्येही आघाडी घेतली आहे. सोलापूर हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघ, पण या आधीच्या दोन्ही निवडणुकांत स्वतः शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव करत भाजपने हा मतदार संघ हिसकावून घेतला होता. यंदा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीत रिंगणात उतरल्या होत्या. आपल्या आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा त्या काढणार की, त्यांनाही पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमदार शिंदे यांनी पद्धतशीरपणे प्रचारयंत्रणा राबवत, उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराला सुरुवात करत बाजी घेतली. दुसरीकडे भाजपच्या या आधीच्या दोन्ही खासदारांबद्दल तीव्र नाराजी होतीच, शिवाय विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा भाजपच्या चांगलाच अंगलट आला होता. त्यामुळे यंदा उमेदवार कोण, यातच भाजपचा वेळ गेला. ऐनवेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. पण आमदार शिदे यांनी त्यांना ‘उपरा उमेदवार’ म्हणत ‘मी सोलापूरची लेक’ अशी भावनिक साद घातली. त्याचा मोठा फायदा त्यांना झाला.

Loksabha Election
Rahul Gandhi : देशाला मोदी-शहा नको आहेत, आम्ही नवी दृष्टी दिली : राहुल गांधी

माढा मतदारसंघातही मोठी चुरस राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील गटाची मोठी ताकद गतवेळी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली होती. यावेळी मात्र स्वतः मोहिते पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. धैर्यशील मोहिते पाटील हे त्यासाठी इच्छुक होते, पण मोहिते पाटलांना डावलून विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या पक्षात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवले.

या निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप अधिक झाली. शिवाय सोलापूरसह माढ्यातील स्थानिक प्रश्नांवर फारशी चर्चा झालीच नाही, मराठा आरक्षणाचा फटकाही बसला. विशेषतः कांदा निर्यातबंदीसह शेती प्रश्नावर भाजपबाबतची नाराजी मतदारांनी दाखवून दिल्याचेही दिसून आले.

उमेदवारांना मिळालेली मते

सोलापूर मतदारसंघ (१८ वी फेरीअखेर)

प्रणिती शिंदे ४ लाख ७३ हजार २७३

राम सातपुते ४ लाख ३२ हजार ५३७

मताधिक्य ४० हजार ७३६ (प्रणिती शिंदे)

माढा मतदारसंघ (११ फेरी अखेर)

धैर्यशील मोहिते पाटील १ लाख ८६ हजार ४२१

रणजितसिंह नाईक-निंबाळकर १ लाख ५७ हजार २१२

मताधिक्य २९ हजार २०९ (धैर्यशील मोहिते पाटील)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com