Poultry : जालना जिल्ह्यातील घाणेवाडी हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील भाऊसाहेब व यमुनाबाई या कावले दांपत्याची केवळ पाच एकर शेती आहे. त्यात दोन एकर मोसंबी, दीड एकर बारमाही भाजीपाला असतो. सहा ते सात वर्षांपासून एक एकरांत कपाशी बीजोत्पादन घेतले जाते. उर्वरित अर्ध्या एकरात ज्वारी व अन्य हंगामी पिके असतात. वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर भाऊसाहेबांचा मुलगा भागवत यांनी दोन वर्षे छत्रपती संभाजीनगर येथे ‘बँकिंग’ विषयाचे वर्ग ‘जॉईन’ केले. नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यात समाधानकारक यश मिळाले नाही.कोरोनाचे संकटही त्या दरम्यान आले. मग ते गावी परतले आणि कायमचे शेतीत रमले.
शेळीपालन आणि कोंबडीपालन
क्षेत्र कमी असल्याने पूरक उद्योगाची जोड देऊन अर्थकारण सक्षम कसे करता येईल हा प्रयत्न भागवत यांनी सुरू केला. परिसरातील शेळीपालनाचे व्यवसाय पाहिल्यानंतर आपणही तो करून पाहावा असे ठरविले. सुमारे १० शेळ्या घेऊन बंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरू केले. यामध्ये मजुरबळाचा मोठा प्रश्न भेडसावू लागला. तो काही थांबेना. मग ३० च्या संख्येपर्यंत पोहोचलेल्या शेळ्या विकून व्यवसाय थांबविला. पुन्हा एकदा विचार करून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली.
त्यातून गावरान कोंबडीपालन योग्य ठरू शकते याचा अंदाज आला. कुंबेफळ (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मोसंबी पिकात मुक्त संचार पद्धतीने केलेले गावरान कोंबडीपालन पाहण्यात आले. ते मनाला भावले. आपल्या दोन एकर मोसंबी बागेपैकी एका एकरात त्या पद्धतीने कोंबडीपालन करणे शक्य असल्याचे वाटले. मग सन २०२१ मध्ये सुमारे ३० गावरान कोंबड्या खरेदी करून व्यवसायास सुरवात केली. एक एकर बागेला आजूबाजूने साध्या पद्धतीने, कमी खर्चात सुरक्षेसाठी सुमारे सहा फूट उंच जाळी लावली.
कोंबडीपालनातील ठळक मुद्दे
सन २०२२ मध्ये कोंबड्यांची संख्या ६०० पर्यंत नेली. परंतु जागेचे क्षेत्र पाहता आणि कोंबड्यांना मुक्त संचार करणे सोपे जावे यासाठी त्यांची संख्या कमी करून आटोपशीर ठेवण्याचे ठरविले. आजच्या घडीला पिले व मोठ्या कोंबड्या मिळून संख्या तीनशेपर्यंत आहे. विविध हॉटेलमधील अन्नाची उष्टावळ व मंडईतील वाया जाणारा भाजीपाला यांनाच खाद्य बनविले. त्यामुळे खाद्याची उपलब्धता व त्यावरील खर्च हा प्रश्न निकाली निघाला. दररोज तीन क्रेट या प्रमाणात हॉटेलमधील खाद्य लागते. तर भाजी बाजारात खाद्य संकलित करण्यासाठी तेथील कामगारांना थोडी मजुरी द्यावी लागते एवढाच काय तो खर्च. मुक्तसंचार पद्धतीमुळे रोगराई देखील जवळपास नाही. मरतुक नगण्य आहे. बागेत पाणी व खाद्याचीही व्यवस्था केली आहे. कोंबडीपालनामुळे मोसंबी बागेत तण नियंत्रण झाले. शेतासाठी कोंबडीखत उपलब्ध झाले.
‘मार्केटिंग’ केले यशस्वी
दिवसाला ४० ते ५० तर महिन्याला जवळपास १३०० ते १४०० अंडी उपलब्ध होतात. त्यापैकी ३०० ते ३५० अंडी उबवणीसाठी ठेवण्यात येतात. ग्राहकांच्या मागणीनुसार प्रति नग १५ रुपये दराने अंड्यांची विक्री होते. आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी मिळतील असे ‘शनिराज ॲग्रो’ या फार्मच्या नावाने फलक भागवत यांनी जालना शहरात अनेक ठिकाणी लावले. त्यावर संपर्क क्रमांकही दिला. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला. आज जालना शहरात ५० ते ६० ग्राहक नियमित जोडले गेले आहेत. जालना शहर पाच किलोमीटर अंतरावर असल्याने ‘होम डिलिव्हरी’ देणे शक्य होते. त्यासाठी काही शुल्क अतिरिक्त घेण्यात येते. गावातही विक्री होते. मांसल कोंबडा ८०० रुपये प्रति नग तर कोंबडी ४०० रुपये प्रति नग या दराने विक्री होते. शिवाय गाव व परिसरातील सुमारे आठ ते दहा हॉटेल व्यावसायिकही जोडले आहेत. गावरान वाणाला अधिक मागणी असल्याने खपही चांगला होतो असे भागवत सांगतात. किमान १५ ते २० कोंबड्यांची महिन्याला विक्री होते. श्रावण, गणपती उत्सव, नवरात्र व दिवाळी या कालावधीत मागणी अत्यंत कमी किंवा नसतेच. भागवत यांनी सुमारे १०० अंडी उबवणी क्षमता असलेले यंत्र घेतले आहे. प्रति नग ५० रुपये दराने ते पिलांची विक्रीही करतात.
शेती पद्धती
कावले कुटुंबातील सर्व जण शेतात राबतात. दोन एकर मोसंबीतून त्यांना १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातून किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. चवळी, भेंडी, वांगी, कोबी आदी पिके वर्षभर विविध टप्प्यांत घेण्यात येतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.