Gavilgad Fort: गवळ्यांचा गाविलगड : इतिहास, वारसा आणि आजचं वास्तव

Gawli Community: मेळघाटात प्रामुख्याने आदिवासी राहायचे. कोरकू, गोंड, गवळी, भोमका, लोहार, चांभार, बासोड आणि ठाकूर. कोरकू शेती करायचे. डोंगर उतार साफ करायचा. भरड धान्य, कडधान्य वगैरे पेरायचं. पुढच्या वर्षी दुसरा डोंगर उतार... अशी यांची शेती.
Gavilgad
GavilgadAgrowon
Published on
Updated on

सुनील तांबे

Gavilgad Fort: गाविलगड हा किल्ला अमरावती जिल्ह्यात चिखलदऱ्याजवळ आहे. किल्ल्याच्या भोवती पूर्वी घनदाट जंगल होते. गवळ्यांनी हा किल्ला बांधलेला होता. हा किल्ला विदर्भाचे भूषण मानला जातो. गाविलगड हा एक किल्ला नाही तर ते दोन किल्ले आहेत. गाविलगडाची तटबंदी, दरवाजा आणि अन्य इमारती नागपूरकर भोसलेंनी बांधल्या. पलीकडच्या डोंगरावर जुना गाविलगड आहे. तिथे गवळ्यांचा गाविलगड होता. तो पुढे देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला. यादवांचा पराभव झाल्यावर बहामनी घराण्यातील अहमदशहा वली याने इ.स. १४२५ मध्ये बांधला. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उल्कमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती केली. हा गडी मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या पडत्या काळात त्याने बेरार राज्याची स्थापना केली. या वऱ्हाड राज्याची राजधानी गाविलगडावर होती.

किल्ल्याची डागडुजी करताना शार्दूल दरवाजा उभारण्यात आला. या दरवाजावर खजुराचं झाडं कोरलं आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना हत्तींच्या डोक्यावर वाघ आहेत. हत्तींवर राज्य करणारा राजा. हे मुस्लिम शासकांचं चिन्ह. या वाघांच्या डोक्यावर गंडभेरूड हा काल्पनिक प्राणी आहे. गंडभेरूड हे विजयनगर साम्राज्याचं चिन्ह. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही प्रतीकांचा इथे संयोग दिसतो. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वऱ्हाड प्रांतावर राज्य केलं. त्यांची राजधानी होती गाविलगड. १५७७ मध्ये गाविलगड आणि वऱ्हाड प्रांत निजामाच्या ताब्यात गेला. त्यानंतर नागपूरकर भोसल्यांनी गाविलगड जिंकला.

मी नुकताच गाविलगडला गेलो, तेव्हा शिवा काळे यांनी ही माहिती दिली. महावितरण कंपनीत कामाला असलेल्या काळे यांनी २०१५ मध्ये स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. ऐतिहासिक वास्तू, विशेषतः किल्ल्यांच्या, संवर्धनाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलं आहे. मीडिया वॉच या नियतकालिकाचे संपादक अविनाश दुधे आणि ईटीव्ही भारत या वृत्तवाहिनीचे मेळघाट प्रतिनिधी शशांक लावरे यांच्यामुळे गाविलगडावर शिवा मला गाइड म्हणून लाभले.

Gavilgad
Rural Story : स्थित्यंतराच्या रेट्यात गोंधळलेली पिढी

गाविलगडचा विस्तार

गाविलगड दोनशे ते अडीचशे एकरांमध्ये पसरलेला आहे. तिथे मशिदी आहेत, मंदिरं आणि इतर इमारतीही आहेत. त्याशिवाय या किल्ल्यावर शेती व्हायची. तटबंदीला दगड हवेत म्हणून तलाव खणण्यात आले. गडावर २२ तलाव होते. त्यातले पाच तलाव आम्ही पाहिले. त्यापैकी दोन तलाव बारमाही होते. गडाच्या आसपास असणारी चार-सहा गावं याच पाण्यावर अवलंबून असतात. उन्हाळ्यामध्ये मेळघाटात पाण्याची टंचाई असते. कारण सर्व ओढे, नाले कोरडे पडतात. म्हणून तर तलाव बांधले राज्यकर्त्यांनी. तटबंदी, बुरुज, दरवाजे उभे करणारे, बारमाही तलाव बांधणारे वडार, पाथरवट निष्णात इंजिनियर्स होते. हवामान, पाऊसपाणी, गुरुत्वाकर्षण, वनस्पती, झाडं यांचं ज्ञान होतं त्यांना.

गाविलगडाच्या दक्षिणेला पूर्णा नदीचं खोरं आहे. तिथे खारपाणपट्टा आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील सुमारे एक हजार गावांमध्ये भूजल खारं आहे. या खाऱ्या पाण्यापासून लोणारी लोक मीठ बनवायचे. वऱ्हाड प्रांताच्या सुबत्तेत या मिठाच्या व्यापाराचा मोठा वाटा होता. ब्रिटिशांनी या मिठाच्या उत्पादनावर आणि व्यापारावर बंदी घातली. कारण समुद्रकिनाऱ्यांवरील मिठागरांमधील मिठावर ब्रिटीशांचा सर्वाधिकार होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या महसुलात मिठावरील कराचा मोठा वाटा होता.

शेती, पशुपालनाचा वारसा

नागपूरकर भोसल्यांनी बांधलेल्या गडावरून आम्ही खाली उतरून शार्दूल दरवाज्यातून इमादशहाने बांधलेल्या गडावर चढाई केली. तिथून माघारी फिरलो म्हणजे पुन्हा उतार, पुन्हा चढण. तीन तास लागले. इमादशाहीच्या गडावरून गवताचे भारे डोक्यावर घेऊन गवळी लोक येत होते. ते पांढरी, लवादा, आलडोह या गावातले होते. ‘‘पहाटे चार वाजता उठून शेणगोठा करतो. पुरुष मंडळी धार काढून दूध परतवाड्याला पाठवतात. बाकीचे लोक गवत कापायला गडावर येतो,’’ पांढरी गावातल्या लक्ष्मी येवले यांनी सांगितलं. त्यांच्या डोक्यावर ४० किलो वजनाचा गवताचा भारा होता. रोज तीन खेपा होतात. गाविलगडाच्या फाटकापाशी आल्यावर मोटरसायकलवरून गवताचे भारे गावाकडे रवाना होतात. लक्ष्मी येवले यांच्या पंचवीस म्हशी आहेत.

गडावर अश्रफभाई भेटले. ते चिखलदऱ्याचा ज्ञानकोश आहेत. ते १९६५ मध्ये चिखलदऱ्याला स्थायिक झाले. किराणा माल, औषधं, कपडेलत्ते सर्व प्रकारचा माल विकण्याचं दुकान त्यांनी उघडलं होता. ते परतवाड्याचे. रोज परतवाड्याहून बसने त्यांचा डबा यायचा. कारण त्या वेळी चिखलदऱ्यात एकही हॉटेल नव्हतं. अश्रफभाईंनी या परिसराची सविस्तर माहिती सांगितली.

Gavilgad
Development Fund : विकासकामांसाठी भरीव निधी देणार; पालकमंत्री नाईक

मेळघाट म्हणजे अनेक घाटांचा समुच्चय. सातपुड्याच्या पर्वतरांगेचा हा भाग. या पर्वतरांगेत घनदाट जंगल होतं. आज त्यापैकी एक तृतीयांश जंगल शिल्लक आहे. त्या वेळी उन्हाळ्यात पर्यटक यायचे. आता पावसाळ्यात येतात. कारण पावसाचं प्रमाणही खूपच कमी झालंय. मेळघाटात प्रामुख्याने आदिवासी राहायचे. कोरकू, गोंड, गवळी, भोमका, लोहार, चांभार, बासोड आणि ठाकूर. कोरकू शेती करायचे. डोंगर उतार साफ करायचा. भरड धान्य, कडधान्य वगैरे पेरायचं. पुढच्या वर्षी दुसरा डोंगर उतार... अशी यांची शेती.

गवळी गाई-म्हशी पाळायचे. कोरकू शिकारही करायचे. मासे धरायचे. गोंड शेती करायचे नाहीत, तर शिकार करायचे आणि भाज्या, कंदमुळं इत्यादी वेचायचे. धान्य कोरकूंकडून घ्यायचं, पशुपालन म्हणजे गाईगुरं पाळायचे गावलान, भोमका जडीबुटीची औषधं पुरवायचे, बासोड बांबूच्या वस्तू पुरवायचे, याशिवाय चांभार, लोहारही होते. या समूहांमध्ये वस्तू विनिमय व्हायचा किंवा खरेदी-विक्री. बहुसंख्य लोक वन विभागाच्या कामांवर मजूरी करायचे. गावलान समूहांवरून गडाचं नाव गाविलगड पडलं असावं. कारण सर्व समूहांमध्ये पक्क्या मालाचं उत्पादन- दूधापासून लोणी, तूप इ.- हे गावलान लोक करायचे.

ब्रिटिश ईस्ट कंपनीने विदर्भात कापसाच्या शेतीला उत्तेजन देण्यासाठी अधिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी धोरण आणि कायदे केले. त्यामुळे विदर्भातील कुरणं नांगराखाली आली. त्यामुळे वऱ्हाडातील पशुधनाला चाऱ्याची चणचण भासू लागली. लक्ष्मण सत्या यांनी लिहिलेल्या ‘इकॉलॉजी, कलोनिअलिझम ॲण्ड कॅटल ः सेंट्रल इंडिया इन द नाइटीन्थ सेंच्युरी'' या ग्रंथात या विषयी भरपूर तपशील आहे.

Gavilgad
Rural Life Story : अमृतवेळा

नंदा गवळी समूह

रुक्मिणी विदर्भातली. तिच्याशी लग्न करायला श्रीकृष्ण मथुरेहून आला. त्याच्यासोबत अनेक यादव आपापली गाईगुरं घेऊन आले. श्रीकृष्ण-रुक्मिणी गेले मथुरेला. पण हे यादव गवळी इथेच स्थायिक झाले. त्यांचे आम्ही वंशज म्हणून आम्ही नंदा गवळी, असं एका गवळ्याने सांगितलं.

हे मेळघाटातले पारंपरिक गवळी नाहीत. त्यांच्या गुरांची कुरणं कापसाच्या शेतीत गेली म्हणून हे बहुधा मेळघाटात आले असावेत. गवळाऊ गायी यांच्या. गवळाऊ बैल शेतीकामासाठी उत्तम मानले जायचे. मात्र मेळघाटात आल्यावर त्यांनी गायींपेक्षा म्हशींना पसंती दिली. कारण म्हशी अधिक दूध देतात. प्रत्येक कुटुंबाकडे २० ते २५ म्हशी असतात. दुधाच्या धंद्यात बरकत आल्यावर त्यांनी शेतजमिनी खरेदी केल्या.

चिखलदरा तालुक्यातील मसोंडी गाव १ हजार १८० मीटर उंचीवर आहे. गावाची लोकसंख्या पाचशेच्या घरात. हे गाव प्रामुख्याने नंदा गवळींचं. प्रत्येक कुटुंबात २०-२५ म्हशी. त्या जंगलात चरायला जातात. पठारावर लोकवन गहू लावला होता. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गव्हाला लोंब्या धरल्या होत्या. एका ओहोळाचं पाणी अडवून गव्हाला पाणी पाजलं जायचं. प्रत्येक शेताला तीन वेळा पाणी मिळतं. त्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात तो तलाव कोरडा पडतो.

गव्हाची कापणी केली की गावातले लोक गुरं घेऊन हेटीला जातात, कारण उन्हाळ्यात तिथे ना चारा असतो ना पाणी. ते हेटीला जातात म्हणजे गुरं घेऊन मेळघाटातून खाली येतात. परतवाडा, अचलपूर इत्यादी ठिकाणी. जिथे जनावरांना चारा-पाणी मिळेल तिथे. जून महिन्यात पावसाची चाहूल लागली की गावी परतात. मसोंडी गावात ४०० ते ५०० क्विंटल गव्हाचं उत्पादन होतं. त्याशिवाय रोज हजारो लिटर दुधाचं उत्पादन होतं. गहू आणि दूध परतवाड्याच्या बाजारपेठेत जातं.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर कोरकू, गोंड, गावलान, भोमका, चांभार, लोहार सर्वांची रोजीरोटी हिरावून घेतली गेली. नंदा गवळींच्या गुरांना जंगलात

चरायला बंदी घातली गेली. मात्र चारा गोळा करण्यावर बंदी नाही. कोरकू, गोंड अनुसूचित जमातीत तर गावलान भटक्या जातीत. त्यामुळे गावलानांना अनुसूचित जमातीच्या सवलती, राखीव जागा मिळत नाहीत. नंदा गवळी ओबीसीमध्ये. मेळघाटातील सर्व समूहांमध्ये नंदा गवळी प्रगत मानले जातात.

चिखलदऱ्यामध्ये दही, रबडी, खवा विकणारी अनेक दुकानं आहेत. मेळघाटात सीताफळाची अगणित झाडं आहेत. नंदा गवळ्यांचा खवा वा दूध घेऊन दीडशे महिलांनी सीताफळ रबडी विकायला सुरुवात केली. यंदाचं पहिलंच वर्ष आहे, अशी माहिती शशांक लावरे यांनी दिली.

बाराव्या शतकात गावलान समूहाने गाविलगड वसवला. पुढे तो गोंडांकडे गेला. त्यानंतर देवगिरीचे यादव, त्यांच्या

नंतर इमादशाही, पुढे निजामशाही त्यानंतर नागपूरकर भोसले आणि शेवटी ब्रिटिशांकडे त्याची मालकी गेली.

आता गाविलगडावर राज्य आहे वन विभागाचं. पण गाविलगड आजही पोसतो आहे गवळ्यांना. म्हणजे राज्यकर्ते कुणीही असोत गाविलगड गवळ्यांचाच आहे, असं म्हणावं लागेल.

९९८७०६३६७०

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com