
Local Mango Varieties Maharashtra : फळबाग केंद्रित व त्यातही कोरडवाहू शेतीत आंबा हे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) हाच धागा पकडला.
या पिकातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावणे, स्थानिक जातींना चालना देणे, ताज्या आंब्यांसह प्रक्रियायुक्त उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देणे या उद्देशाने आंबा महोत्सव हा अभिनव उपक्रम सुरू केला. महोत्सवाच्या पहिल्या वर्षापासूनच शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे.
महोत्सवात घन, अति घन पद्धतीने लागवड, जलसंधारण, खते व कीड-रोग नियंत्रण, हंगाम नियोजन, प्रक्रिया, विपणन आदी विषयांवर विशेष कार्यशाळा घेण्यात येतात. यात केव्हीकेसह कृषी विद्यापीठातील शास्त्र, अधिकारी, प्रयोगशील शेतकरी आणि उद्योजकांचा सहभाग असतो. सर्वांचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी पारंपरिक आंबा शेतीत बदल सुरू केला आहे.
केव्हीकेच्या संपर्कात राहून तंत्रज्ञान वापरात ते कुशल होत आहेत. आंबा लागवडीबरोबर प्रयोगांमध्ये रुची वाढत चालल्याने बुलडाणा जिल्ह्यातील आंबा फळबाग क्षेत्रात वाढ होण्यास चालना मिळाली आहे. चार वर्षांच्या कालखंडात जिल्ह्यातील आंबा क्षेत्राने सुमारे साडेआठशे हेक्टरचा टप्पा गाठला आहे. कृषी विभागाने उपलब्ध केलेल्या पुढील आकडेवारीतून हे स्पष्ट होते.
स्थानिक जातींचे वाढतेय महत्त्व
सन २०२२ मध्ये आंबा महोत्सवात सुमारे अडीच टन आंब्याची विक्री झाली. सन २०२५ मध्ये हीच विक्री साडेबारा टनांवर पोहोचली. तर एकूण चार वर्षांत ३१ टनांहून अधिक आंब्याची विक्री झाली हे उपक्रमाचे यश म्हणता येईल. त्यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभही झाला. चार वर्षांत १२ हजारांवर शेतकरी व ग्राहकांनी महोत्सवास भेट दिली.
मागील तीन वर्षांतील दरांचा आढावा घेतल्यास प्रति किलो ८० रुपयांपासून तर यंदा १५० रुपयांपर्यंत आंब्याची विक्री झाली. ग्राहकांकडून थेट खरेदी असल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी समाधानकारक दर मिळाले. दरवर्षी आंब्यांची आवक व दरांमध्ये सुधारणा होत आहे. आंब्याच्या स्थानिक जातींना व्यासपीठ मिळाले. यात प्रामुख्याने काळू आंबा, नारळ्या, महाराजा, खैट्या, रोडग्या, गणेशा, भोपळ्या, शेप्या, भदाया, गोट्या आदींचा समावेश आहे.
या जातींचे उत्पादन, चव, स्वाद आणि टिकवणक्षमता लक्षात घेता त्यांचे महत्त्व वाढू लागले आहे. सध्या सर्वच बाजारपेठांमध्ये हापूस, केसर, दशहरी किंवा अन्य लोकप्रिय वाण पाहण्यास मिळतात. मात्र स्थानिक वाणांनाही ग्राहकांची पसंती असल्याचे पाहण्यास मिळते.
बुलडाणा जिल्ह्यात १० ते १५ वर्षांपूर्वी देशी वाणांची उपलब्धता चांगली होती. काळानुरूप या जाती मागे पडत गेल्या. मात्र शेतकऱ्यांनी त्या आजही जोपासल्या आहेत. सध्या स्थानिक १० पेक्षा अधिक जातींवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अभ्यास सुरू आहे.
महोत्सवात नऊ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला. केव्हीकेच्या गृहविज्ञान विषयाच्या विषय विशेषज्ज्ञ डॉ. कृत्तिका गांगडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. त्यातून त्यांनी आंबा लोणचे, मुरंबा, रस, जाम, जेली, पन्हे, साखरांबा आदी पदार्थ तयार केले.
हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले. अशा उपक्रमांमुळे त्यांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यासह उद्योजकता वाढीसही चालना मिळाली. जिल्ह्यातील आंबा कलमे विक्री करणाऱ्या शासकीय, शासनमान्य फळरोपवाटिकांचाही सहभागही वाढला.
‘टीमवर्क’ आणि मान्यवरांचे पाठबळ
उपक्रमाच्या यशामागे बुलडाणा कृषी यंत्रणेचा हातभार लागला. केव्हीकेचे प्रमुख डॉ. अमोल झापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. अनिल साहेबराव तारू आदींचे योगदान लाभले. आयोजनासाठी प्रशासनाचीही साथ दरवर्षी मिळू लागली. सन २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, २०२३ मध्ये श्रीमती भाग्यश्री विसपुते तर २०२४ आणि २०२५ या वर्षात विद्यमान जिल्ह्याधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित राहून उपक्रमाच्या कार्याची प्रशंसा केली. विद्यापीठ स्तरावरून कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनीही शेतकऱ्यांना घन व अतिघन पद्धतीने आंबा लागवडीचे आवाहन केले.
डॉ. अमोल झापे ९८२२९३०३५८(वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, केव्हीके, बुलडाणा), डॉ. अनिल तारू ९९६०२३२४०८ (उद्यानविद्या विशेषज्ञ, केव्हीके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.