Forest Conservation : ‘जंगल सत्याग्रहा’कडून‘जंगल आग्रहा’कडे...

Nature Conservation : लोकनायक बापूजी अणे यांनी १० जुलै १९३० रोजी पुसद जवळच्या धुंदी घाटात ‘जंगल सत्याग्रह’ केला. या घटनेला काल ९४ वर्षे पूर्ण झालीत. आज जंगल सत्याग्रहाची आठवण करताना जंगलसंवर्धनाचा आग्रह धरण्याची वेळ आली आहे.
Forest Conservation
Forest ConservationAgrowon

प्रा. दिनकर गुल्हाने

Jungle Satyagraha Story : ‘जंगल है तो मंगल है’ असे म्हटले जाते ते उगीचच नाही. मानवी जीवन जंगलावर अवलंबून आहे. ‘कोरोना’ काळात श्‍वास या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने मानव प्राण्याला कळला. बाळाचा जन्म झाल्यानंतर जिवंत राहण्यासाठी जन्मदात्या आईच्या दुधाआधी या सृष्टीतील पहिला श्‍वास घेण्यासाठी बाळाला लागतो तो ऑक्सिजन! हा ऑक्सिजन पुरवतात वृक्ष! आज हे जंगलच मानवाच्या हव्यासापोटी संकटात सापडले आहे.

लोकनायक बापूजी अणे यांनी १० जुलै १९३० रोजी पुसद जवळच्या धुंदी घाटात ‘जंगल सत्याग्रह’ केला. ब्रिटिश सरकारच्या ताब्यातील जंगलातील गवत कापून असंख्य अनुयायांसह त्यांनी प्रतीकात्मक सविनय कायदेभंग केला. महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरोधात जंगल सत्याग्रहाचे अस्त्र उगारण्यास सांगितल्यानंतर भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद जवळच्या धुंदी-बेलगव्हाण जंगलात करण्यात आला.

हा सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य तेजोमय व्हावा, या उद्देशाने केलेला होता. या जंगल सत्याग्रहातून ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध लोक पेटून उठले. स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा वेगाने भडकला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीत आता या जंगल सत्याग्रहाचे संदर्भ बदलले आहेत. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाचे संतुलन कायम राखायचे असेल तर ‘जंगल सत्याग्रह’कडून ‘जंगल आग्रहा’कडे आपली पावले पडली पाहिजेत.

भारताच्या स्वातंत्र्य युद्धात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या विभूतींचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी लोकांमध्ये आपल्या भाषणातून प्राण फुंकणारे लोकमान्य टिळक पुसदमध्ये १९१८ मध्ये येऊन गेले. जुन्या पुसदमधील हटकेश्‍वर मंदिरात त्यांचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी त्यांची भली मोठी सभा पूस नदीच्या पात्रात झाली. त्यांचे ओजस्वी भाषण ऐकण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती.

Forest Conservation
Forest Conservation : देवरायाच करतील वसुंधरेचे संरक्षण

ती गर्दी पाहून टिळकांचा उत्साह वाढला. ते म्हणाले, ‘‘पुसद नव्हे, ही तर स्वराज्याची पंढरी होय.’’ त्यांच्या प्रभावी भाषणाने लोकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला व असहकार आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळाला. अर्थातच टिळकांसारख्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल योद्ध्यामुळे पुसद भूमीला वेगळा संदर्भ मिळाला. या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील प्रतिरूप टिळक लोकनायक बापूजी अणे यांच्या नेतृत्वातील धुंदी घाटातील ‘जंगल सत्याग्रह’ पुसद परिसरासाठी ऐतिहासिक ठरला.

स्वातंत्र्य संग्रामातील पुसदचे हे योगदान निश्‍चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व्हावे म्हणूनच जंगल सत्याग्रहाची स्मृती जतन करण्याची आवश्यकता आहे. खरेतर, धुंदी- बेलगव्हाण येथील जंगलात जंगल सत्याग्रहाचे प्रणेते लोकनायक बापूजी अणे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी लोक इच्छा आहे.

जंगल सत्याग्रह नेमका काय आहे, असा प्रश्‍न आज नव्या पिढीला पडतो. ब्रिटिश सरकार विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह झाला. ‘‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया,’’ असे म्हणत स्वातंत्र्य युद्धातील स्वयंसेवकांनी कायदेभंग केला. विदर्भात ब्रिटिश सरकारच्या मालकीची गायराने, जंगले होती. त्यावर आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह होता.

मात्र जंगलाची वाढ आणि संरक्षण करण्याचे निमित्त करून ब्रिटिश सरकारने त्यावर नियंत्रण आणले. शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. इंग्रजांची जुलमी राजवट घालविण्यासाठी महात्मा गांधींनी कायदेभंग चळवळीची १९३० मध्ये सुरुवात केलेली होती. इंग्रजांचे जनतेवरील अत्याचार वाढत होते. इंग्रजांनी जंगल आरक्षित करून लोकांना प्रवेश करण्यास बंदी घातलेली होती. जंगलातील लाकूड, फळे, वनोपज एवढेच काय, तर गवतही कापू शकत नव्हते.

Forest Conservation
Forest Conservation : जंगल, जमीन, जल यांचे संवर्धन हे राष्ट्रीय कार्य

या अन्यायाविरुद्ध महात्मा गांधींनी जंगल सत्याग्रहाचे आवाहन केले होते. विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी वणीचे लोकनायक बापूजी अणे यांनी त्याकाळी जंगल सत्याग्रहासाठी धुंदी-बेलगव्हाणच्या जंगलाची निवड केली. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या सुमारे दोन हजार सत्याग्रहींनी जंगलाकडे मोर्चा वळविला. पुसदचे शंकरराव सरनाईक अग्रभागी होते. बापूजी अणे यांनी जंगलात प्रवेश करून चांदीची मूठ असलेल्या विळ्याने सपासपा गवत कापून प्रतीकात्मक आंदोलन केले. त्याच वेळी इंग्रजांनी सत्याग्रहींना ताब्यात घेतले.

या आंदोलनाची वार्ता भारतभर पसरली आणि सत्याग्रहींना जोश चढला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील बिळशी येथे १८ जुलै रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरच्या अक्काताई जंगलात सर्वांत मोठा जंगल सत्याग्रह होऊन इंग्रजांच्या गोळीबारात तेरा हुतात्मे झाले. छत्तीसगडमध्ये जंगल सत्याग्रहाचे लोण पसरले.

या स्वातंत्र्य चळवळीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, या उद्देशाने आबासाहेब पारवेकर वनखात्याचे मंत्री असताना त्यांनी धुंदी- बेलगव्हाण जंगलात जंगल सत्याग्रहाची स्मृतिशिळा उभारली. पुढे पुसद येथील लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यातून वनविभागाने पुसद- दिग्रस मार्गावरील या स्मृतिस्थळाच्या जीर्णोद्धार केला.

जंगल सत्याग्रह स्मृतिशिळेचा परिसर वनखात्यामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग पर्यटकांसाठी जंगल पायवाट निर्माण करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती ताज्या होतानाच निसर्गाची ओढ नवीन पिढीच्या मनात निर्माण व्हावी, हा या मागील हेतू आहे. आज जंगल सत्याग्रहाची आठवण करताना जंगलसंवर्धनाचा आग्रह धरण्याची वेळ आली आहे. वृक्षराजी वाढली, तरच पर्यावरणाचा समतोल राखता येईल. आजच्या काळात जंगलाची जपणूक आणि निर्माण हे राष्ट्रीय कार्य बनले आहे. राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यात सहभागी होणे म्हणजे खऱ्या अर्थाने आजचा ‘जंगल सत्याग्रह’ ठरेल.

स्वातंत्र्योत्तर काळात आता जंगलावर निर्भर असणाऱ्या जंगलालगतच्या परिसरातील लोकांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय कुरण विकास योजना मंजूर केली असून, राज्यस्तरावर ही योजना जंगल सत्याग्रहाचे प्रणेते लोकनायक बापूजी अणे यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून गवतांच्या कुरणांची जपणूक होऊन खेडेगावात समृद्धी परत येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ब्रिटिशांच्या काळात कुरण कापण्यास मनाई तर आताच्या सरकारने कुरण विकासाला चालना दिली आहे, अशा प्रकारे एक वर्तुळ पूर्ण होत आहे.

जंगलाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होणार आहे. अत्यंत गरीब असलेल्या व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी गुरांचा आधार असतो. त्यांच्या कुरणासाठी चारा योजना यशस्वीपणे राबविल्यास जंगले टिकून ठेवता येतील. शुद्ध हवा आणि पाणी मिळण्यासाठी जंगला शिवाय पर्याय नाही. जंगलातून शुद्ध प्राणवायू मिळतो तर जंगले पाणी शोषून ठेवतात. त्यामुळेच जंगलातील ओढे कायम खळखळत असतात. जंगले संपली तर पाणीही संपेल. जंगलांचे संवर्धन मानवजातीला समृद्ध जीवन प्रदान करू शकेल. जंगल सत्याग्रहातून जंगल आग्रहाकडे वाटचाल आपले स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल, यात शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com