

The Journey from Cotton Production to the Textile Industry: जमनालाल बजाज यांच्या पुढाकारामुळेच महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांना वर्ध्यांला पाठवत ग्रामसेवा मंडळाची उभारणी केली होती. गांधी विचारावर विश्वास ठेवत त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ग्रामस्वराज्यांच्या दिशेने हे मंडळ आजही पुढे जात आहे. सेंद्रिय शेती, शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग यातून स्वावलंबनाचे धडे गिरवले जात आहेत. कापूस उत्पादनापासून कापडच नव्हे; तर तयार कपड्यांपर्यंतचा प्रवास सामान्य शेतकऱ्यांना संपूर्ण शाश्वततेच्या दिशेने नेऊ शकतो.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये १९३४ ते १९४० या काळात एका बाजूला राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक खेडे स्वावलंबी करत आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी महात्मा गांधींचे प्रयत्न सुरू होते. त्या काळातच वर्धा येथील गांधी विचाराने प्रेरीत झालेले समाजसेवी जमनालाल बजाज हे अहमदाबादच्या साबरमती आश्रमाची शाखा वर्ध्यामध्ये सुरू करण्यासाठी धडपडत होते. मात्र स्वातंत्र्याच्या आंदोलनाने वेग घेतला होता. स्वतः महात्मा गांधी यांना येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी १९३४ मध्ये विनोबा भावे यांना वर्धा येथे पाठविले. विनोबांनी ग्राम स्वावलंबनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवत ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली.
सूतकताईतून स्वावलंबन
परदेशी कपड्यांच्या मिलमुळे होणारे स्थानिकांचे शोषण रोखण्यासाठी प्रतीकात्मक पातळीवर सुरू झालेले चरखा आणि सूतकताई हे शांततापूर्ण आंदोलनाचा अनोखा मार्ग होता. सामान्यातील सामान्यालाही शक्य अशी चरख्यावर सूतकताई व हातमागावर कापडनिर्मितीला ग्रामसेवा मंडळाने चालना दिली. स्थानिकांचे सहकार्य आणि सहभाग वाढत चालला तसे वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुके खादीमय करण्यासाठी मंडळाने कंबर कसली. यातून स्थानिकांच्या हातांना काम आणि कपड्यातील स्वावलंबन वाढेल, असा विचार होता.
देशी गाय संवर्धन प्रकल्प
भारतीय परंपरेचा आणि अध्यात्माचा विशेष अभ्यास अशलेल्या विनोबांनी शेतीतील आणि मानवी जीवनातील गोवंशाचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे गो हत्याबंदी कायदा होण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. आश्रम असलेला वर्धा जिल्हा हा गौळाऊ गायींसाठी प्रसिद्ध आहे. गायींची दूध उत्पादन क्षमता अधिक असून, बैल काटक आहेत. त्यामुळे ते शेतिकामात उपयोगी आहेत. १९४० मध्ये या जातीच्या संवर्धनासाठी स्थापन झालेल्या गोशाळेने पुढे गीर, हरियाना, थारपारकर अशा देशी गायींच्या वर्धनाला प्राधान्य दिले. आजही ती कार्यरत असून, शुद्ध वंशाचे जातिवंत वळू तयार करण्यासाठी विशेष भर दिला जातो. गोपुरीच्या गोशाळेमध्ये सध्या ५५ जातिवंत गाई आहेत.
कापूस ते कापड निर्मिती
आपण कापूस पिकवत असूनही कपड्यांसाठी अन्य देशांवर का अवलंबून राहायचे? त्यातून होणारे शोषण रोखायचे असेल, तर स्वदेशीचा नारा बुलंद करताना ग्रामसेवा मंडळांने कापूस ते कापड गावातच तयार करण्याचा निर्धार केला. शेतकरी तर कापूस पिकवत होतेच, त्याला जोड द्यायची होती ती चरखे आणि विणकामासाठी हातमागाची. त्यासाठी ग्रामसेवा मंडळाने ‘सरंजाम विभाग’ सुरू केला. त्यात हातमाग, विविध प्रकारचे चरखे, अहिंसक सिल्क मशीन, हात रेचे, लाकडी तेलघाणी इ. चे उत्पादन केले जाते. या देशी यंत्रामध्ये आवश्यक त्या सुधारणा व संशोधन करण्यासाठीही संस्थेचे सतत प्रयत्न राहिले. त्यातून चरख्याचे पाच मानवचलित प्रकार विकसित करण्यात संस्थेला यश आले.
रोजगार निर्मितीचा साधला उद्देश
संस्थेच्या परिसरात चरख्यावर सूतकताईचे काम होते. थोडीफार अनामत रक्कम घेऊन शंभर महिलांना घरी चरखे देण्यात आले आहेत. कताईच्या प्रमाणात महिलांना २५० ते ३०० रुपयांचे उत्पन्न होते. संस्थेच्या परिसरात १० हातमाग आहेत. ग्रामसेवा मंडळातच विणकर असून, त्यांना सूत देऊन त्यापासून कापड तयार करून घेतले जाते. त्यामध्ये पोतानुसार जाड, पातळ, साड्या, साधे कापड, लायनिंगचे, नैसर्गिकरीत्या रंगीत कापसापासून तयार केलेले संपूर्णपणे रसायनमुक्त कापड यांचा समावेश असतो. स्थानिकांमध्ये रोजगार निर्मितीच्या उद्देशाने आवश्यक ते प्रशिक्षण आणि संयंत्रे पुरवठा करण्यावर ग्रामसेवा मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.
तेलासाठी लाकडी घाणा
पूर्वी गावागावांत बैलचलित लाकडी तेलघाण्या होत्या. त्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीसोबतच शेतमालावर प्रक्रियेचाही उद्देश साधला जात होता. संस्थेने लाकडी तेलघाणीची संकल्पना तशीच कायम ठेवत बैलाऐवजी मोटारपंपाचा वापर ती चालविण्यासाठी केला आहे. एक घाणा १६ किलो शेंगदाण्याचा असतो. त्यापासून ६.५ ते ७ किलोग्रामपर्यंत तेल मिळते. याला दीड ते पावणेदोन तास लागतात. जवसाच्या एका घाण्याला प्रक्रियेसाठी अडीच तास इतका वेळ लागतो. मंडळाद्वारे तेलाचे उत्पादन करुन त्याची विक्री केली जाते.
लाकडी तेलघाण्यांची विक्री
अलीकडे लाकडी तेलघाण्यावरील तेलांना पुन्हा मागणी वाढत आहे. अशा स्थितीमध्ये गावस्तरावर तेलघाणा उभारण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना संयंत्र तयार करून दिले जाते. त्यासाठी बाभूळ व भेरा जातीच्या लाकडाचा वापर होतो. ग्रामसेवा मंडळाच्या या लाकडी तेलघाण्याची किंमत दोन लाख रुपयांच्या घरात आहे. महाराष्ट्रासोबतच देशाच्या अन्य राज्यांमध्ये मिळून आजवर ४० लाकडी तेलघाण्यांची विक्री झाली आहे. सध्या असलेला मोठा आकार कमी करून कार्यक्षमता वाढविण्यासंदर्भा संशोधन सुरू आहे.
रेशीम कोषापासून धागा निर्मिती
सामान्यतः रेशीम कोषाला छिद्र पाडून त्यातून अळी/पतंग बाहेर पडल्यानंतर त्या कोषाला बाजारात मागणी नसते. या टाकाऊ मानल्या जाणाऱ्या घटकांपासूनही रेशीम धागा तयार करण्याची यंत्रणा संस्थेने विकसित केली आहे. अहिंसक अशा रेशीम यंत्रांना नागालॅंड, आसाम या भागातून मोठी मागणी आहे. या कामासाठी तीन स्वयंचलित संयंत्रे वापरली जातात. त्यांची एकत्रित किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे तर मानवचलित संयंत्रांची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे.
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी
मंडळाद्वारे तयार केलेले कापसाच्या सरळ वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाते. त्यासाठी सेवाग्राम लगतच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादन प्रकल्पात सहभागी करण्यात आले आहे. त्यांना आलेले उत्पादन मंडळ पहिल्या वर्षी बाजारभावापेक्षा १० टक्के, तर दुसऱ्या वर्षी २० टक्के अधिक रक्कम देत खरेदी करते. या कापसापासून तयार करण्यात आलेले खादीचे कापड शेतकरी कुटुंबाला दिले जाते. गेल्या आठ वर्षांपासून चालू असलेल्या या प्रायोगिक उपक्रमात हंगामात २५ ते ३० क्विंटल कापसाची खरेदी होते. पुढील काही वर्षांत त्यात वाढ करण्याचा मंडळाचा मानस आहे.
अन्य पिकांमध्ये सेंद्रिय उत्पादनावर भर
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सर्व शेतीमालाचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जात आहे.
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी दर दोन वर्षांतून एकदा धैंचा, बोरू सारखी हिरवळीची खतपिके घेऊन योग्य वेळी गाडली जातात.
कापसानंतर पाच ते सात ओळी मुगाच्या आणि दोन ओळी तुरीच्या घेतल्या जातात. मूग निघाल्यानंतर हरभरा लागवड केली जाते. या पिकांचे व्यवस्थापन देखील सेंद्रिय पद्धतीने होत असल्याचे वसंत फुटाणे सांगतात.
मुख्य पिकामध्ये पीक संरक्षणासाठी सापळा पिके (उदा. मका, झेंडू, लाल अंबाडी) लावली जातात. आवश्यकता भासल्यास गोमूत्राची फवारणी घेऊन कीड-रोग नियंत्रण केले जात असल्याचे वसंत फुटाणे यांनी सांगितले.
उत्पादनांची होते विक्री
मंडळाद्वारे हातमागावरील कापड, लाकडी घाण्यावरील तेल व अन्य प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती केली जाते. त्यांच्या विक्रीसाठी संस्थेचे वर्धा शहरात दोन, मंडळाचा परिसरात एक आणि सेवाग्राम आश्रम परिसरात एक विक्री केंद्र आहे. मंडळाच्या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगली मागणी राहते. याच उत्पन्नावर मंडळाचे कामकाज चालते. प्रक्रियेसाठी आवश्यक कच्च्या मालाची खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य खर्चही त्यातूनच भागवला जातो.
देशी कापसाची लागवड
ग्रामसेवा मंडळाच्या शेतीमध्ये देशी कापसाच्या बीज उत्पादनावर भर दिला जातो. ज्वारी, मूग, उडीद, हळद, तूर, बोरू अशा विविध प्रकारच्या पिकांची हंगामनिहाय लागवड केली जाते. गोशाळेतील जनावरांसाठी चारा लागवडीचेही नियोजन असते. सेंद्रिय कापूस उत्पादनाच्या प्रयत्नांतर्गत १० विविध देशी वाणांची लागवड होते. अनमोल (मफुकृवि, राहुरी), पीए-०८, पीए-७४०, पीए-८१२ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) यासह इतर सरळ वाणांच्या लागवडीला मंडळाने प्रोत्साहन दिले आहे. कारण बीटी वाणांमुळे शेतकऱ्यांचे कंपन्यांवरील अवलंबन वाढले आहे. त्यातुलनेत सरळ वाणांचे बी पुन्हा पुन्हा वापरता येत असल्याने शेतकरी बियाण्यांबाबत स्वावलंबी राहतो. या वाणाच्या पानांवर विशिष्ट लव असल्याने मावा, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होत नाही. बोंड अळी येऊच नये यासाठी गोमूत्रांसह देशी पर्यायांचा वापर केला जातो. तूर व हरभऱ्यावरील किडींसाठीही देशी पर्याय उपयोगी ठरत असल्याचे मंडळाचे सचिव चिन्मय फुटाणे सांगतात.
- चिन्मय फुटाणे ९९२३२३११४९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.