
Palghar News : मुरबाड ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. परंतु, बदलत्या काळानुसार आणि कृषी विभागाचा आधुनिक शेती प्रचार, अत्याधुनिक अवजारे व विविध योजनांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी ‘हायटेक’ बनू लागला आहे. यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा व अंगमेहनत वाचू लागली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची जोड देत बैलजोड्याच्या नांगराच्या जागी पॉवर टिलरचा वापर करू लागले आहेत.
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी शेती अवजारे एकमेकांच्या शेतात नेत शेती करायचे. यातून शेतकऱ्यांची परस्पर आपुलकी दिसून येत असे. शेतकरी जेवणाचे सर्व सामान शेतावरच नेत असत. शेतीच्या माळरानावरील छोट्याशा गवताच्या झोपडीत चहाचे टोप उकळत असत. या सर्व वातावरणात शेतीचे काम करताना पडणारे श्रम शेतकऱ्यांना जाणवत नव्हते. परंतु, काळ बदलला तसे पारंपरिक शेती व्यवसाय यांत्रिक अवजारांचा शिरकाव करण्यास सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील शेती म्हटली की, लाकडी नांगर आणि बैलजोड्या आल्याच. परंतु, शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्याने आवश्यक असणारी पारंपरिक अवजारे सोडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास शेतकऱ्यांनी धरली आहे. ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या शेतात, शेतमळ्यांमध्ये बैलजोड्यांच्या, नागरांच्या जागी पॉवर टिलर दिसू लागले आहेत. मशागतीची कामे आता भाड्याच्या पॉवर टिलरने होत आहेत. एकमेकाला मदत करणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी शेतात आता मजूर दिसू लागले आहेत.
शेतमजुरीत वाढ
सध्या शेतमजुराचे मजुरीचे दरही वाढले आहेत. यावर्षी महिलांसाठी ४०० ते ५०० रुपये आणि पुरुषांसाठी ५०० ते ६०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
वेळेची बचत
पॉवर टिलरच्या एका तासाचे भाडे ७०० ते ८००, ट्रॅक्टरचे ११ हजार ते १२०० रुपये भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. दोन ते तीन तासांत एक हेक्टर शेती शेतकऱ्यांची नांगरणी व चिखलनी होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत, पैसे व वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
बैलजोड्या खर्चीक
बैलाच्या जोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना त्या खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे. एका बैलाच्या जोडीची किंमत २० ते ४० हजारांपर्यंत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात भाडेतत्त्वावर बैलजोडी राखण्यासाठी सात ते आठ हजार द्यावे लागतात. याशिवाय बैलाला चरण्यासाठी एका गुराख्याला ठेवावे लागते. त्यामुळे बैलजोड्या विकत घेणे आणि पाळणे खर्चिक झाले आहे.
शेतकऱ्यांना अनुदान
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलरसाठी आणि इतर कृषी साहित्यासाठी विविध योजना आहेत. तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी अनुदान मिळते. महिला बचत गटासाठी तर विशेष सवलत आहे. त्यामुळेच मुरबाड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉवर टिलरची खरेदी केली आहे.
कसा होतो उपयोग
पॉवर टिलरचा उपयोग नांगरणी, चिखलनी, भाजीपाला लागवडीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी करतात. जे शेतकरी बैलाद्वारे नांगरणीचे काम दोन दिवसांत करतात. तेच काम पॉवर टिलर काही तासांत करतो. त्यामुळे अंगमेहनत, वेळेची बचत व पैशांची बचत होते. पॉवर टिलरने नांगरणी केल्यास जमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.