Satara News : आले उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा फायदा मिळत आहे. तसेच आले पिकाचा खोडवा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र पुन्हा एकदा आल्याच्या नवे जुने विभागणी करून वेगवेगळे दर देण्याच्या पद्धतीने डोके वर काढले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जुने, नवे आले एकाच दराने खरेदी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, गाठ आमच्याशी असल्याचा इशारा दिला आहे.
अनेक आले उत्पादकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ने नेर धरण, खेड, कवडेवाडी, नांदगिरी परिसरात आल्याच्या धुनीच्या ठिकाणी जाऊन तपासण्या केल्या. या वेळी खेड परिसरातून उत्तर प्रदेशात जाणाऱ्या आल्याची लोडिंग सुरू असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रकची तपासणी केली.
त्या वेळी नवे, जुने विभागणी केलेल्या आल्याची अनेक पोती सापडली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील व्यापारी महेश शेठ आणि त्यांच्या जिल्ह्यातील एजंटांना असा प्रकार न करण्याबाबत विनंती केली, मात्र त्यांनी मगरुरी दाखविण्याचा प्रयत्न केल्याने चिडलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोडिंग झालेला माल गाडीतून खाली उतरून घेत जप्त केला. कुठल्याही परिस्थितीमध्ये आल्याची जुनी, नवी अशी वेगवेगळी खरेदी होऊ देणार नाही, असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
गेल्या हंगामात आक्रमक आंदोलने करत पुणे बाजार पेठेत जाऊन सौदे बंद पाडत ही पद्धत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोडीत काढली होती. मात्र पुन्हा हा प्रकार होऊ लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नवे, जुना विभागणी केलेला माल जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईला व्यापारी विरोध करण्याची चिन्हे आहेत, मात्र सरसकट एकत्रित माल खरेदी करून एकच बाजारभाव दिल्यास, आमचे कोणासोबतही भांडण नाही, असे राज्य युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी पद्धत बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, विभागणीनुसार वेगवेगळा माल खरेदी आणि वेगवेगळा दर असा प्रकार घडत असल्यास शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावास असे आवाहन, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केले आहे. या वेळी प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, खटाव मान संपर्कप्रमुख शरद खाडे, वैभव पाटील, अजय पाटील, विजय बुरुंगले, संतोष तुपे आणि सुभाष जाधव हे सहभागी झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.