Marathawa Water Issue : अखेर मराठवाड्यासाठी सोडले पाणी

Jaykwadi Water Issue : ‘जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून नगर, नाशिक आणि मराठवाडा वाद पेटला आहे.
Marathwada Water Crisis
Marathwada Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून नगर, नाशिक आणि मराठवाडा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून पाणी सोडण्यास शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून १९२ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली. याशिवाय नगर जिल्ह्यातील भंडारदरा-निळवंडे धरण समूहातून देखील १०० क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे प्रकरण न्यायालयात गेले होते. मराठवाड्यातील नेत्यांची पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी होती. तर नगर, नाशिकमधील नेत्यांनी त्यास विरोध केला.

अखेर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याच्या सूचना केल्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जायकवाडीसाठी शुक्रवारी रात्री अकरा वाजेपासून १९२ क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिली.

Marathwada Water Crisis
Jaykwadi Dam Water Issue : ‘जायकवाडी’चा मृतसाठा वापरावा

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने ३० ऑक्टोबरला दिलेल्या आदेशानुसार पाणी सोडण्याची अंमलबजावणी अखेर झाली आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार, उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याने पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली, असे नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले यांनी सांगितले.

३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचे आदेश महामंडळाने जलसंपदा विभागाला दिले होते. पाणी सोडण्याची कार्यवाही करावी लागणार असल्याने नदीकाठावरील डोंगळे, मोटारी काढण्याचे आणि मोटारींचा वीजप्रवाह खंडित करावा, धरणांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा, यासाठी जलसंपदा विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले.

त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, दारणा धरणातील विसर्ग वाढविला जाणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत गंगापूर धरणातून देखील जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Marathwada Water Crisis
Jaykwadi Water Issue : ‘जायकवाडी’ला पाण्याची प्रतीक्षा कायम

नाशिकमधील नेते गप्प का?; शेतकऱ्यांचा संताप

शेतकऱ्यांनी पदरमोड, कर्ज घेऊन द्राक्षबागा उभ्या केल्या. त्या आता जगणार नाहीत. कांदा लागवडी थोड्याफार आहेत. त्या सोडून देण्याची वेळ येईल. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच स्थिती आली आहे.

मराठवाड्यातील नेते पाणी प्रश्नासाठी आक्रमक आहेत. मात्र जिल्ह्यातील नेते मूग गिळून गप्प का ? असा संताप शेतकरी संघटनेचे नेते बाबासाहेब गुजर यांनी उपस्थित केला. ‘‘पिके धोक्यात आहेत. याशिवाय जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली असताना त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दिलेली आकडेवारी चुकीची असतानाही हा पाणी सोडण्याचा घाट घातला गेला आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.

‘भंडारदरा-निळवंडे’तून १०० क्युसेकने सोडले पाणी

भंडारदरा, निळवंडे धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत गुप्तता ठेवत शुक्रवारी (ता. २४) रात्री भंडारदरा-निळवंडे धरण समुहातून १०० क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडले. शनिवारी (ता. २५) रात्री त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. मुळा धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. भंडारदरा-निळवंडे धरणातून ३.३६ टीएमसी, ‘मुळा’तून २.१० टीएमसी ५.४६ व नाशिकमधील धरणातून ३.१४३ टीएमसी असे ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा नगर, नाशिक जिल्ह्यात पाणलोट भाग आहे. पावसाळ्यात जर धरणात ६५ टक्के पाणी कमी असल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणातून तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येते.

मागील चार वर्षांत जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यंदा धरणात पुरेसा साठा नाही. शुक्रवारी दुपारी पाणी सोडल्याची चर्चा झाली. मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नाही. सोडण्याचे निश्चित नाही, असे सांगत गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री अकरा वाजता निळवंडेतून १०० क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडले. शनिवारी दिवसभर १०० क्युसेकनेच विसर्ग सुरू होता. त्यात वाढ होऊ शकते, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com