
Amravati News: शिवारात माकडांचा वाढता वावर आणि त्यातून होणारे नुकसान सर्वाधिक असते. हीच बाब लक्षात घेता सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील माकडे पकडण्यात निष्णात असलेल्या समाधान गिरी यांना राज्यभरातून या कामासाठी मागणी वाढली आहे. गेल्या तीस वर्षांत सुमारे चार लाखांवर माकडे पकडत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दावा त्यांनी केला. अमरावती शिवारातही त्यांनी नुकतीच माकडे पकडत त्यांना जंगलात सोडले.
जंगलात चारापाण्याची सोय नसल्याने वन्यप्राण्यांनी गावाकडे कुच केली आहे. त्यामध्ये माकडांचे प्रमाण सर्वाधिक असून ते उभ्या पिकातील शेतीमालावर ताव मारतात. परिणामी नुकसान होते. त्यापोटी वन विभागाकडून दिली जाणारी भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकरी त्यासंबंधीची प्रक्रियाच करीत नाही.
या समस्येचे कायम समाधान म्हणून शिवारातील या माकडांना पकडत त्यांना नैसर्गिक अधिवसात सोडणे, हे काम आव्हानात्मक असले, तरी सिल्लोड येथील समाधान गिरी यांनी यात गेल्या तीस वर्षांपासून सातत्य राखले आहे. त्यांनी सांगितले, ‘‘कोकण, मराठवाड्यात माकडे पकडण्यासाठी शासनाकडून खर्च दिला जातो. तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. त्याकरिता शेतकऱ्याने वन विभागाकडे अर्ज करावा.
त्याआधारे वन विभाग सूचना देतो. त्यानंतर शिवारातील माकडांची गणना केली जाते. नंतर त्यांना पकडून जंगलात सोडले जाते. या कामासाठी प्रति माकड ८०० रुपये, वाहन खर्च दिला जातो. माझे आजोबा देवगिरी हे पुजारी होते. मंदिर परिसरात माकडांचा उच्छाद वाढल्यानंतर त्यांनी या माकडांना जंगलात सोडण्याचे काम केले. तोच वारसा वडील सोमीनाथ यांनी जपला आणि आता मी या कामात सातत्य राखले आहे.’’ एका कळपात ३० ते ७० माकडांचा समावेश असू शकतो. त्यानुसार एक कळप पिंजऱ्यात बंद करण्यासाठी साधारणतः १५ ते २० मिनिटे लागतात.
राज्यपालांनी केला गौरव
माजी राज्यपाल रमेश बैस यांची रायपूर (छत्तीसगड) मध्ये शेती आहे. या शिवारातील ६०० ते ७०० माकडे पकडून दिल्यामुळे त्यांनी समाधान गिरी यांचे दोन दिवस राजभवन परिसरात आतिथ्य करीत गौरव केला. माजी आमदार वीरेंद्र जगताप, मंत्री उदय सामंत, राजेश टोपे, अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे, श्वेता महाले यांच्या मतदार संघात तसेच शेतातील माकडेही समाधान यांनी पकडून दिली.
राज्यातील २८०० ते ३००० गावांतून चार लाखांवर माकडे पकडत त्यांना अधिवासात सोडले. अन्न, पाण्याची सोय जंगलात असेल तर ते वनक्षेत्राबाहेर येणार नाही. त्यातून मासांहारी प्राण्यांना देखील जंगलात खाद्य मिळेल. माकडे बाहेर पडल्याने वाघ, बिबटे देखील गावात आले. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे.
- समाधान गिरी ९४२३४५१८२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.