Apple Ber Farming : ॲपल बोर लागवडीत कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Apple Ber Production : नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर (ता. येवला) येथील प्रयोगशील शेतकरी हरिभाऊ दाते यांनी २०१६ मध्ये फळशेतीचा पर्याय निवडला.
Apple Bore
Apple BoreAgrowon
Published on
Updated on

Apple Ber Pest Disease Management :

शेतकरी नियोजन

ॲपल बोर

शेतकरी : हरिभाऊ गजीराम दाते

गाव : जळगाव नेऊर, ता. येवला, जि. नाशिक

एकूण शेती : ९ एकर

ॲपल बोर लागवड : दोन एकर

नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर (ता. येवला) येथील प्रयोगशील शेतकरी हरिभाऊ दाते यांनी २०१६ मध्ये फळशेतीचा पर्याय निवडला. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व कमीतकमी निविष्ठांचा वापर हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. ॲपल बोर लागवड करताना वाण निवडीला विशेष प्राधान्य दिले. कमी पाण्यात येणारे व कीड-रोगांना कमी बळी पडणारे वाण लागवडीसाठी निवडले. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे. सध्या बागेतील झाडांवर लहान निंबोळी आकाराची झालेली फळधारणा झालेली आहे, असे हरिभाऊ सांगतात.

हरिभाऊ दाते यांची एकूण ९ एकर शेती आहे. त्यात तीन एकरावर ड्रॅगन फ्रूट, दोन ॲपल बोर, दीड एकर पेरू व उर्वरित अडीच एकर क्षेत्रात मका, मूग अशी पिके घेतली जातात. २०१६ मध्ये त्यांनी ॲपल बोरची १४ बाय ९ फूट अंतरावर लागवड केली. बागेत पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याकरिता ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला आहे.

Apple Bore
Ber Market : बाजारात संकरित बोरांची चलती

छाटणी नियोजन

दरवर्षी मार्च महिन्यात बागेची छाटणी केली जाते. बुडापासून दोन फूट अंतर सोडून छाटणी केली जाते. छाटणी केल्यानंतर एकरी १० ते १२ टन लाकडे मिळतात. इतर बारीक काड्यांची रोटाव्हेटरच्या साहाय्याने कुट्टी करून ती मातीत मिसळली जाते. त्यामुळे जमीन सुपीक होऊन रासायनिक खतांचा वापर कमी झाला. तसेच कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाल्यामुळे उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत झाली असल्याचे हरिभाऊ दाते सांगतात. मे महिन्यात खोडातून फुटवे निघतात. एका खोडातून १० ते १२ फुटवे येतात. त्यापैकी सशक्त व चांगले वाढ झालेले ४ ते ६ इतकेच फुटवे ठेवले जातात. छाटणी केल्यानंतर साधारणपणे सप्टेंबर महिन्यात फुले येतात. त्यानंतर १५ ते २० दिवसांत फळ सेंटिग होण्यास सुरुवात होते.

रासायनिक खतांचा वापर कमी

उन्हाळ्यात एकरी ४ ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेल्या शेणखताचा बागेत वापर केला जातो. जून महिन्यात एकरी २ टन गांडूळखत असे प्रति झाड ३ किलो प्रमाणे गांडूळखताची मात्रा दिली जाते. ऑगस्ट महिन्यात भरखते म्हणून निंबोळी पेंड, १०:२६:२६ तसेच भुकटी स्वरूपात ह्युमिक ॲसिड यांचा वापर केला जातो.

सिंचन व्यवस्थापन

ॲपल बोर हे कमी पाण्यावर येणारे फळपीक आहे. एप्रिल महिन्यात झाडाच्या दोन्ही बाजूने चर काढून शेणखत दिले जाते. त्यानंतर ठिबकद्वारे मे महिन्यात पहिले पाणी दिले जाते. त्यानंतर दर १० ते १२ दिवसांनी वाफसा स्थिती तपासून २ ते ३ तास सिंचन केले जाते. हे नियोजन पाऊस पडेपर्यंत नियमित ठेवले जाते.

यावर्षी सिंचनासाठी पाणी कमी होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून दुष्काळी स्थितीत बाग जगवून हंगाम उभा केला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पावसाने जर सलग १५ ते २० दिवस उघडीप दिली तरच वाफसा तपासून सिंचन करण्यावर भर दिला जातो. अन्यथा सिंचन केले जात नाही. पावसात १५ दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यास ठिबकद्वारे २ ते ३ तास सिंचन केले जाते. ऑक्टोबर महिन्यापासून डिसेंबर अखेरपर्यंत ड्रीपद्वारे ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी केले जाते.

Apple Bore
Soybean Market : सोयाबीनला संजीवनी मिळणार का?

पीक संरक्षण

बहर धरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. फूलगळ टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशक व निम तेलाची फवारणी घेतली जाते. झाडांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्या व्यतिरिक्त इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक फवारणी केली जाते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भुरीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पुन्हा शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाते. त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव कमी होतो.

काढणी व विक्री

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ॲपल बोरची फळे तोडणीस येतात. साधारण नोव्हेंबर ते जानेवारी असा २ ते २.५ महिन्यांचा काढणीचा हंगाम असतो. हंगामात व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी होते. फळांची गुणवत्ता राखल्याने व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. दर्जेदार ॲपल बोर फळांची दिल्ली, कलकत्ता व सुरत येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. फळांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी संपूर्ण हंगामात सिंचन व खत व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच दर्जेदार फळांचे उत्पादन साध्य करणे शक्य होत असल्याचे हरिभाऊ सांगतात.

हरिभाऊ दाते, ९६८९६५१०५५

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com