Agriculture Irrigation Management:
शेतकरी नियोजन
पीक : हळद
शेतकरी : विनोद संपतराव तोडकर
गाव : कासेगाव,
ता. वाळवा, जि. सांगली
एकूण शेती : ६ एकर
हळद लागवड : १ एकर
कासेगाव (ता. वाळवा) येथील विनोद संपतराव तोडकर यांनी प्रयोगशील शेतकरी अशी ओळख निर्माण केली आहे. मागील पंधरा वर्षांपासून विनोदराव हळद लागवड करत आहेत. पीक फेरपालट पद्धतीने ऊस, हळद, मिरची पिकाची आंतरपीक पद्धतीने लागवडीत सातत्य राखले आहे. उत्पादनवाढीसह मातीच्या आरोग्यावरही त्यांनी तितकेच लक्ष केंद्रित केले आहे.
विनोद यांची कारंदवाडी (ता. वाळवा) येथे ६ एकर शेती आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत हळद पीक उत्पादनात ते पारंगत झाले आहेत. हळद पिकात मका, कोथिंबीर, मेथी ही आंतरपिके घेत उत्पादन खर्च काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या वर्षी पुन्हा हळद लागवड केली जात नाही. साधारण ३ वर्षांनी शेत हळद लागवडीखाली येईल असे नियोजन असते.
लागवडपूर्व नियोजन
या वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये हळद लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार खोडवा गेल्यानंतर पूर्वमशागतीच्या कामास फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली.
पालाकुट्टी करून रोटर मारून उभी-आडवी नांगरट केली. अशा पद्धतीने पूर्वमशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली.
पूर्वमशागत झाल्यानंतर एकरी ४ ते ५ ट्रॉली प्रमाणे शेणखत तसेच गांडूळ खत शेतात विस्कटून दिले. त्यानंतर रेझरचा वापर करून कच्ची सरी सोडली. त्यावर पुन्हा रोटर मारून दिलेली शेणखत आणि गांडूळ खत मात्रा जमिनीमध्ये एकसारखी मिसळून घेतली. शेणखत प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी विस्कटले जाते. जेणेकरून पक्षी शेणखतातील किडे खाऊन नैसर्गिक कीड नियंत्रण होण्यास मदत होईल.
खत व्यवस्थापन
दरवर्षी माती परीक्षण केले जाते. त्यानुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यावर भर दिला जातो.
सुरुवातीच्या १५ दिवसांत ड्रीपद्वारे ट्रायकोडर्माचा वापर करण्यात आला.
लागवडीनंतर साधारण १ महिन्याने पीक पिवळे दिसू लागले होते. त्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट आणि ०ः५२ः३४ यांचा वापर करण्यात आला.
मागील १५ दिवसांपूर्वी फुटवे चांगले येण्यासाठी युरिया आणि फॉस्फेरिक ॲसिड ठिबकद्वारे देण्यात आले आहे.
साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनंतर म्हणजेच भरणीचे नियोजन केले जाते. २४ः२४ः०, एमओपी, डीएपी, सिलिकॉन, गंधक, निंबोळी पेंड आणि करंज पेंड यांचा वापर केला जाईल. सध्या पाऊस असल्याने भरणी करणे शक्य नाही. पावसात उघडीप मिळताच भरणी करून घेण्यात येईल.
भरणी झाल्यानंतर १५ दिवसांनी जिवाणू खतांचा वापर केला जाईल. त्यानंतर १० दिवसांनी पुन्हा ड्रीपद्वारे ट्रायकोडर्माचा वापर केला जाईल.
आवश्यकतेनुसार ठिबकद्वारे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत खतमात्रा दिली जाते.
कीड-रोग नियंत्रण
हळद लागवडीत पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, कंदमाशी, करपा, भुरी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या वर्षी लागवडीपासून आतापर्यंत कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यासाठी रासायनिक कीटकनाशक फवारणीसह एरंडीचे आमिष यांचा वापर केला आहे.
सिंचन व्यवस्थापन
सिंचनासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पिकाची गरज आणि वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाते. सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याने सिंचन करणे टाळले आहे. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चरी काढण्यात आली आहे.
आगामी नियोजन
येत्या आठ दिवसांत भरणीचे नियोजन आहे. पावसात उघडीप मिळताच भरणी करून खतमात्रा दिली जाईल.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीडनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी केली जाईल. यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाईल.
आवश्यकतेनुसार पाऊस आणि जमिनीतील वाफसा स्थिती पाहून सिंचनाचे नियोजन केले जाईल.
लागवड नियोजन
लागवडीसाठी ५ फूट अंतर राखत बेड तयार केले. तयार बेडवर रासायनिक खत आणि सेंद्रिय खतांचे बेसल डोस दिले. त्यात अमोनिअम सल्फेट, डीएपी, एमओपी, गंधक, ह्युमिक ॲसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये यासह कीटकनाशकाची एकरी मात्रा दिली. याशिवाय निंबोळी पेंड, करंज पेंड या प्रमाणे बेसल डोस दिले. त्यानंतर पुन्हा लहान पॉवर टिलरच्या साह्याने खते जमिनीत मिसळून घेतली. त्यानंतर पुन्हा बेड एकसारखे तयार केले जातात. ही सर्व कार्यवाही १५ मेपूर्वी करण्यात आली.
सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या बेडवर अंथरून बेड पुरेसे भिजवून घेतले.
साधारण १५ मे च्या दरम्यान लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार झिगझॅग पद्धतीने बेडच्या दोन्ही बाजूस गड्डे लागवड करण्यात आली. दोन गड्ड्यांमध्ये ८ इंच राखण्यात आले.
दरवर्षी लागवडीसाठी घरचे बेणे वापरण्यावर भर असतो. त्यानुसार मागील वर्षीचे सेलम वाणाचे मातृकंद बाजूला काढून ठेवले जातात. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात जमिनीतून होणाऱ्या कीड रोगांना अटकाव करण्यासाठी बेणेप्रक्रिया करण्यावर भर दिला जातो. त्यानुसार लागवडीपूर्वी बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या द्रावणामध्ये बेणे बुडवून घेतले.
लागवडीसाठी एकरी १२ ते १५ क्विंटल बेणे लागले. त्यातून दरवर्षी साधारणपणे एकरी सरासरी ३५ ते ३८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
हळद लागवडीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोथिंबीर, मेथी आणि मका पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. ही आंतरपिके लागवडीनंतर साधारण अडीच तीन महिन्यांच्या कालावधीत निघून जातात. त्यामुळे उत्पादन खर्च निघण्यास मदत होत असल्याचे विनोद तोडकर सांगतात.
- विनोद तोडकर ७५८८१६७२५२ (शब्दांकन : अभिजित डाके)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.