Agriculture Fertilizers Management :
शेतकरी नियोजन
पीक : टोमॅटो
शेतकरी : हर्षद काशिनाथ मोरे
गाव : दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक
एकूण शेती : ११ एकर
टोमॅटो लागवड : १ एकर १० गुंठे
मागील २५ वर्षांपासून मोरे परिवार प्रयोगशीलतेने बारमाही पिकांसोबतच हंगामी भाजीपाला उत्पादनात घेत आहे. मात्र उत्पन्नातील जोखीम कमी करण्यासाठी प्रामुख्याने द्राक्ष बागेसोबतच कारले, टोमॅटो व कांदा अशा पिकांच्या लागवडीवर देखील भर दिला जात आहे. भाजीपाला लागवडीमध्ये प्रामुख्याने टोमॅटो उत्पादनात सातत्य राखले आहे. गेल्या १५ वर्षांत सुधारित पद्धतीचा अवलंब करत उत्पादनवाढ व त्यातून उत्पन्नवाढ साधण्यात हर्षद मोरे यशस्वी झाले आहेत.
लागवड नियोजन
या वर्षी ९ जुलैला १ एकर १० गुंठे क्षेत्रावर टोमॅटो लागवड करण्यात आली. लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून रोटावेटरच्या साह्याने माती भुसभुशीत करून घेतली.
त्यानंतर ९ फूट अंतरावर ४ फुटांच्या सऱ्या पाडण्यात आल्या. त्यावर शेणखत त्यासोबत १०:२६:२६, दाणेदार गंधक, सिलिकॉन आणि एमओपी यांच्या मात्रा दिल्या.
त्यानंतर सऱ्यांवर दुहेरी पद्धतीने ताशी ४ लिटर विसर्गक्षमता असलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरून घेतल्या. त्यावर ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरून रोप लागवडीचे नियोजन केले. तणनियंत्रण व जास्तीत जास्त दिवस लागवड चालण्यासाठी मल्चिंग पेपरची जाडी ही अत्यंत महत्त्वाची ठरते, असे हर्षद मोरे सांगतात.
सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर सऱ्यांवर २ बाय २ फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने रोप लागवड केली.
खत व्यवस्थापन
लागवडीनंतर पहिल्या टप्प्यात बुरशीनाशके व सूक्ष्म अन्नद्रव्यांची आळवणी केली. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता होण्यासाठी खत व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाते.
लागवडीनंतर ८ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम नायट्रेट यांचा ठिबकद्वारे वापर.
११ व्या दिवशी २४:२४:० सोबत फॉस्फेरिक ॲसिड यांच्या ठिबक सिंचनातून वापर.
झाडांची वाढ चांगली होण्यासाठी १५ व्या दिवशी ०:६०:२०, ०:०:५० यांचा वापर.
फुलकळी चांगली येण्यासाठी, गळ रोखण्यासाठी कॅल्शिअम, झिंक व बोरॉन यांच्या वापरावर भर.
झाडांचा हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच फुटवे चांगले वाढण्यासाठी फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम यांचा वापर.
वाफसा तपासून सिंचन
रोप लागवड पूर्ण झाल्यानंतर पहिले पंधरा प्रत्येक दिवशी वाफसा स्थिती तपासून त्यानुसार दररोज सिंचन करण्यात आले. त्यानंतर रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार टप्प्याटप्प्याने सिंचन कालावधीत दर १५ दिवसांनी वाढ केली. पिकाची फुले, कळी व फळांची वाढ या अवस्थेनुसार काटेकोर सिंचनावर भर असतो.
पीक संरक्षणावर भर
टोमॅटो लागवडीत कीड-रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पीक वाढीच्या प्रत्येक अवस्थेत निरीक्षणे नोंदवून कामकाज करणे महत्त्वाचे ठरते. जेणेकरून योग्य वेळी पीक संरक्षण करणे शक्य होईल. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादनवाढ साधण्यास मोठी मदत होते. पीक संरक्षणावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जातो. वातावरणीय बदल यामध्ये ढगाळ वातावरण असल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच किडींचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीनुसार प्रतिबंधात्मक रासायनिक घटकांच्या फवारण्या वेळोवेळी घेतल्या जातात.
आगामी नियोजन
सध्या पिकामध्ये फुलकळी येण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवडाभरापूर्वी रोपांची बांधणी करून घेतली आहे.
वाढीच्या टप्प्यात खत, सिंचन व्यवस्थापन, पीक संरक्षण यासह अधिक फुलधारणा होऊन उत्पादन वाढीकडे लक्ष दिले जाईल.
वाढीच्या अवस्थेत संतुलित खत व्यवस्थापनावर भर दिल्यास टप्प्याटप्प्याने गुणवत्तापूर्ण फळांचे उत्पादन मिळते, असे हर्षद सांगतात.
गुणवत्तापूर्ण वाण निवडीवर भर
टोमॅटो लागवडीमध्ये उत्पादकता, टिकवणक्षमता व गुणवत्ता या अंगाने वाणाची निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यात अधिक उत्पादकता, टिकवणक्षम फळे, फळांना एकसारखा रंग, चकाकी, आकार व वजन देणाऱ्या वाणाची निवड महत्त्वाची ठरते. त्याच अनुषंगाने नियोजनानुसार लागवडीपूर्व रोपांची आगाऊ मागणी नोंदवली होती. त्यानुसार लागवडीसाठी एकरी सुमारे ४.५ ते ५ हजार रोपांची उपलब्धता केली.
हर्षद मोरे, ९५७९०९४६४३
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.