Kolhapur Flood : सलग आठवडाभर होत असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच धरण क्षेत्रातील पावसाने राधानगरी धरणाचे ६ स्वयंचलित दरवाजे उघडले. तसेच काळम्मावाडी आणि तुळशी धरणातून विसर्ग वाढल्याने भोगावतीसह पंचगंगा व अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली.
मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने तब्बल दिड फुटाने पंचगंगेची पाणी पातळी वाढली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर पोहोचली. तर जिल्ह्याचा शेकडो गावांशी संपर्क तुटला आहे. झालेल्या पावसाने गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालयांना आज, उद्या सुटी जाहीर केली आहे. तर कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल बंद केल्याने करवीर तालुक्यातील अनेक गावांचा कोल्हापूर शहरातील संपर्क तुटल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर ८० अधिक राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
नदीलगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांचे प्रशासनाकडून स्थलांतराची कार्यवाही सुरू असल्याने आतार्यंत ६५३ जणांचे, तर १०५ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच कोल्हापूर शहरातील २१ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाकडून पाहणी करून नागरिकांना स्वत:हून स्थलांतर होण्याचे सांगितले. कालपासून होत असलेल्या पावसाने अचानक प्राण्याना आसरा शोधण्याची वेळ आली यावेळी कासारी नदी पात्र परिसरात ४० माकडे अडकली होती याबाबत एनडीआरएफच्या पथकाने तातडीने जात त्यांना मदत केली.
२६ जुलैची पुन्हा आठवण
२६ जुलै २००५ ला कोल्हापूर शहरासह जिल्ह्याने भयावह महापूर अनुभवला. यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेकडो लोकांचे स्थलांतर झाले. अचानक झालेल्या या गंभीर परिस्थितीने प्रशासनाचीही दमछाक झाली होती. आज २६ जुलैची पुन्हा आठवण होत आहे. कारण आताही महापुराचे संकट गडद होत चालले आहे.
सकाळी सूर्यदर्शन; दिवसभर धुवाधार
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सूर्यदर्शन झाले नव्हते, परंतु आज सकाळी काही काळ सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्यानंतर पुन्हा धुवाधार पावसाने रात्री उशिरापर्यंत बॅटिंग सुरूच ठेवली.
जिल्ह्यात ७३ लाखांचे नुकसान
मुसळधार पावसाने जिल्ह्यातील १३३ मातीची कच्ची घरे, २३ पक्की घरे व १० जनावरांच्या गोठ्यांचे सुमारे ७३ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.