
Nagpur News : नदी आणि नाल्यांच्या काठावर वसलेल्या जिल्ह्यातील तब्बल १५७ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका (संवेदनशील) निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या गाव वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याबरोबरच पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पूरक उपायोजनांवर भर दिला आहे. याबरोबरच जिल्हाधिकारी ते तालुकास्तरापर्यंत आढावा बैठका घेऊन पूरनियंत्रण उपाययोजना निश्चित केल्या आहेत.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या नाग, पिवळी, कन्हान, पेंच, वैनगंगा आदी १० नद्यांमुळे पूरस्थिती उद्भवते. विशेषतः मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पेंच व कन्हान काठावरील गावांना धोका निर्माण होतो. या वेळी शेकडो नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. नागपूर शहरातील सखल भागांतही पूरपरिस्थिती निर्माण होते. गतवर्षी ६० वस्त्यांत पाणी शिरले होते. मनपा आणि एनडीआरएफ-एसडीआरएफच्या मदतीने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
शहर व ग्रामीणमधील संभाव्य धोकादायक गावे, वस्त्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंदा जनजागृती मोहिमा राबवल्या असून, पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्थानिक रस्त्यांची पाहणी केली आहे.
मनपा ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुकास्तरापर्यंतच्या सर्व यंत्रणांनी आढावा बैठका घेऊन उपाययोजना आखल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पूरस्थितीत बचाव व मदत कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी बचाव कार्यात वापरात येणाऱ्या साहित्याची कार्यस्थिती सुनिश्चित केली आहे. तसेच सर्व यंत्रणांनी एकत्र येत मॉकड्रीलद्वारे पूरस्थितीचा सरावही केला आहे.
संभाव्य पूर प्रवण भाग
जिल्ह्यामध्ये पुराचा धोका असलेली तब्बल १५७ गावे आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यात ३४, कामठी २२, मौद्यात २०, नरखेडमध्ये १७, हिंगण्यात १३, उमरेड १२, भिवापूरमध्ये १०, पारशिवणीत ८, कुहीत ७, नागपूर ग्रामीण ५, रामटेक ४, काटोल ३ आणि कळमेश्वरमध्ये २ गावांचा समावेश आहे. तर शहरातील नरेंद्रनगर, हुडकेश्वर रोड, पिपळा, दुबेनगर, विनोबा भावेनगर, दशरथनगर, काचीपुरा झोपडपट्टी, लालगंज, गितानगर आदी भागातही पुराचे पाणी शिरते.
उपलब्ध संसाधने
आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे बोट ५२, लाइफ जॅकेट ४८९, टेन्ट २४, स्वॉ कटर ७२, रोप, लाईफबॉय आदी साहित्य उपलब्ध असून, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन विभाग, आपदा मित्र-सखी, आरोग्य विभाग, पोलीस व स्वयंसेवी संस्था सज्ज आहेत. याशिवाय ५०० ‘आपदा मित्र- सखी’ना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
२४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित
जिल्ह्यातील प्रमुख, मध्यम व लहान अशा ७७ धरणांची तपासणी पूर्ण झाली असून, जलस्तर आणि सुरक्षेची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. संभाव्य धोकादायक पूल व रस्त्यांची यादीही तयार झाली आहे. याशिवाय धरणांची सतत निगराणी, समन्वय आणि इशाऱ्यांची माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
तसेच मनपाने शहरासाठी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह १३ ही तालुक्याच्या ठिकाणी २४ बाय ७ आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुकानिहाय तात्पुरत्या हेलिपॅडच्या ठिकाणांचीही निवड झाली आहे, जे आपत्कालीन मदतीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.