महारुद्र मंगनाळे
Climate Changes Effect on Fruit Crops : हवामानातील बदल चकीत करणारे, कल्पनेपलिकडचे आहेत. माणसांवर, जनावरांवर आणि फळझाडांवरही त्याचे वाईट परिणाम होत आहेत. हे बदल असे अचानक घडत आहेत की, आपत्तीपूर्व नियोजन करणं शक्य नाही. अनेक घटना अशा आहेत की,त्यामागचा कार्यकारणभाव लक्षात येत नाही. अशा स्थितीत कोणी तज्ज्ञ हवामान बदलाला पुरक शेती करावी, असा सल्ला द्यायला लागला की,त्याचं हसू येतं. कारण तो एवढं एकच वाक्य बोलतो. हवामान बदलाला पुरक म्हणजे नेमकं काय करायला हवं, यावर तो काहीच बोलत नाही. कारण या संदर्भात त्याला काहीच माहित नाही. तीव्र ऊन,अवकाळी पाऊस ,जोरदार वारा यांचा चार फळांवर कसा वाईट परिणाम झाला, ते मी इथं नोंदवणार आहे.
आंबा...
आमच्या बागेत एकूण २५ आंब्याची झाडं आहेत.त्यातील पाच गावरान बाकी केशर.यावर्षीचा संभाव्य तीव्र ऊन्हाळा लक्षात घेऊन पहिल्यांदाच आंब्याच्या झाडांना भरपूर पाणी दिलं.त्याआधी गांडूळ खत टाकला.वर्मी कल्चर टाकलं. झाडाखालच्या ओलीचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या बुडाला गोलाकार सोयाबीन गुळी,कडबा कुट्टीचं आच्छादन केलं.वेळेवर सात-आठ आंब्यांनाच मोहोर आला. काही झाडाला दोन टप्प्यात तर काही झाडांना तीन टप्प्यात मोहोर आला. मोहोर भरपूर आला.आम्ही शक्यतो मोहोरावर फवारणी करीत नाही. पण मित्राचा सल्ला ऐकून दोन जैविक औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. पहिल्यांदा मोहोरगळती नंतर फळगळती मोठ्या प्रमाणात झाली. आंबे आवळ्याएवढे ,लिंबाएवढे होऊन गळतच राहिले. दिड महिन्यांनंतर असं लक्षात आलं की,सुरूवातीला ज्या आंब्यांना मोहोर आला होता,त्या मोहोराचेच आंबे टिकले. २५पैकी ५ झाडांना एकही आंबा टिकला नाही.इतर एका छोट्या झाडाला २,दुसऱ्या एका छोट्या झाडाला ५,एका गावरान आंब्याला एकच,दोन्हीला तीन-चार असं प्रमाण राहिलं.फक्त ६ केशर आंब्यांना बऱ्यापैकी फळ राहिलं पण शेवटपर्यंत वाऱ्यामुळं गळती चालूच राहिली.जमीन तिचं,खत,पाणी तेच.हवामान तेच. तरीही प्रत्येक झाडांची स्थिती वेगळी.फक्त दोन छोट्या झाडांचे आंबे मध्यम आकाराचे झाले.तीन मध्यम आकाराच्या केशर झाडांना लागलेल्या आंब्याचा आकार छोटाच राहिला. या तिन्हीचे पाड पडले,पाखरं दररोज किमान सात-आठ आंबे टोकरून पाडू लागले तेव्हा या आंब्यांची फळं काढली.मात्र हे आंबे दरवर्षीइतके चवदार नाहीत. काही आंबे पिकलेच नाहीत. एका गावरान आंब्याला दोन वेळा भरपूर मोहोर लागूनही, त्याला एकही आंबा लागला नाही. दुसऱ्या दोन्ही गावरान आंब्यांचा आकार खूपच छोटा राहिला. याचे पाड पडत आहेत. मागची तीन वर्षे याला लागलेले आंबे आकाराने मध्यम,मोठे म्हणण्यासारखे होते. खत,पाणी देऊनही आंबे का मोठे झाले नाहीत, याचं उत्तर नाही. काही आंबे तोंडाला नासत आहेत.गारपीट झाल्यावर असं होऊ शकतं.पण इथं गारपीट झाली नाही. तरीही हे का नासत आहेत? याचं कारण कळत नाही. फक्त तीन छोट्या आंब्यांची फळं आकाराने वाढली आहेत. अद्याप त्यांचा पाड झालेला नाही. प्रत्येक झाडाची स्थिती वेगळी,हे याचवर्षी घडलयं.
आंबे विकणं,हे आमचा हेतू नाही. आम्ही आंबे ,रस खातोय.पण दरवर्षीप्रमाणे आंबे गुणवत्तापूर्ण नाहीत. याचे कारण हवामानातील बदलांपेक्षा वेगळं कारण असू शकत नाही. गेल्या दहा वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा मोडल्या, याचं कारण हेच आहे. अवकाळी पाऊस,गारपीट,बेफाम वारा हे दरवर्षी नियमितपणे घडतयं.अशा वातावरणात आंब्यांचा निभाव लागणं कठीण आहे.यावर्षी दोन फवारण्याचा काहीच उपयोग झाला नाही. भविष्यात आंब्यांवर कसलीच फवारणी करायची नाही, असा निर्णय घेतलाय. कितीही वाईट परिस्थिती राहिली तरी, आम्हाला कमी-जास्त आंबे खायला मिळतात, हा गेल्या सात-आठ वर्षांचा अनुभव आहे.त्यामुळं आम्ही खूष आहोत.
पेरू....
गतवर्षी आम्ही गावरान पेरूची सहा मोठी झाडं काढली.त्यातील एका झाडाचे पेरू ठिक होते.शिवाय कीडीमुळे हे पेरू खायला मिळत नव्हते. नव्याने तैवान पिंक आणि सरदार या संकरित जातीची तीस रोपं लावली.सहा महिन्यांआधी पेरूचा पहिला हंगाम घेतला.महिनाभर भरपूर पेरू खाल्ले.किरकोळ विक्री केली.त्यानंतर या सगळ्या झाडांची छाटणी केली.दोन आठवड्यानंतर या झाडांना भरपूर खत आणि पाणी दिलं.काही दिवसातच या झाडांना फुटवा आणि भरपूर फुलं आली. अतिरिक्त फुलं काढली.सगळ्या झाडांना गावरान आवळ्याच्या आकाराचे पेरू झालेत...आणि गेल्या आठवड्यापासून अचानक या फळांची गळ मोठ्या प्रमाणावर सुरू झालीय.जवळपास निम्म्यापेक्षा अधिक फळगळ झालीय. खरं तर पेरूची फळगळ कधीच होत नाही. झाडांना पुरेस अन्न-पाणी आहे. झाडं फ्रेश आहेत.या झाडांनाही गुळीचं आच्छादन आहे. यासंदर्भात मी चार-पाच मित्रांशी बोललो.पेरूच्या फळांची गळ होतेय,हे त्यांच्यासाठीही आश्चर्यकारक आहे.एकाने पाणी कमी पडत असेल, असं मत व्यक्त केलं.पण ते पटणारं नाही. आठवड्यातून तीन वेळा मी स्वत: पाणी देतोय.मी बारकाईने बघितलं. देठामध्ये कमकुवतपणा आलाय..का माहिती नाही.
पेरूचं पण आंब्यासारखंच आहे.कितीही गळ झाली तरी आम्हाला खाण्यापुरते पेरू मिळतीलच...पण हिच बाग व्यावसायिक असती तर,त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं असतं.
केळी....
याच जमिनीत गेली सहा वर्षे आम्ही केळी घेतोय.केळीच्या मोठ-मोठ्या घडांचे फोटो मी फेसबुकवर अनेकदा टाकलेत.दोन वर्षे केळीला एवढी फळं लागली की, केळी मोठ्या प्रमाणात गाई-म्हशींना खाऊ घातली.उन्हाळ्यात दोन-चार झाडं सुकायची,काही मधेच मोडायची. पण केळी निघायचीच. गतवर्षी ती सगळी केळी काढून, २०२३च्या जूलैमध्ये नविन केळी लावली. १२रोपं गोबरगॅस जवळ लावली.ही जमीन जास्तच हलकी आहे.बागेत आठ रोप जुन्याच खोडापासून उगवली,वाढली. यांना सतत भरपूर पाणी देऊनही,यातील बरीचशी झाडं जळून जातील अशी शक्यता आहे. उन्हामुळं केळीची पानं करपून चाललीत.या सगळ्या झाडांनाही गुळीचं आच्छादन केलयं.खत दिलाय.पण तीव्र उन्हापुढे याचा निभाव लागणे कठीण आहे. ही झाडं आता वाळून गेली तरी पावसाळ्यात ती पुन्हा फुटतीलच.
या केळीच्या संदर्भात महिनाभरापूर्वी मी फेसबुकवर एक पोष्ट टाकली होती.त्यात केळीच्या दूरवस्थेचं वर्णन केलं होतं.तेव्हा अनेकांनी अनाहूत सल्ले दिले होते.त्यात या झाडांना नेटसेटच्या जाळीने सावली करण्याचा सल्ला दिला होता.तो अव्यवहार्य असल्याचं मी तेव्हाच म्हटलं होतं.खर्चाचं सोडून द्या पण खुल्या जागेत असा कसलाच मांडव टिकणार नाही. एक वावटळ मांडव साफ करेल. मी विचार केलाय,दररोज या झाडांना पाणी देत राहायचं.टिकतील ते टिकतील.जातील ते जातील.यांना जगवण्यासाठी अनावश्यक पैसे आणि उर्जा घालवून काहीही उपयोग नाही. जे होईल ते शांतपणे बघत वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच हवामान बदलास पुरक शेती करणे.
सीताफळं...
हे फळ आमच्या रानाचं खास फळ आहे.माझ्या बालपणी,शालेय काळात माळावर,मळ्यात,पादंण रस्त्यावर शेकडो सीताफळाची झाडं होती.सीताफळं खाऊनच मोठे झालो.विविध कारणांनी ही झाडं काढण्यात आली. त्याची भरपाई म्हणून २०१८ साली मी तीन-चारशे गावरान सीताफळाची रोपं लावली.२०२१पासूनच पक्ष्यांसह आम्ही भरपूर सीताफळं खातोय.
पहिले दोन वर्षे त्यांना पाणी,शेणखत दिलं.आता ती स्वावलंबी बनलीत.त्यांना काहीच करावं लागत नाही. गावरान सीताफळं म्हणून विचार केला तर, उन्हाळ्यात त्याची पूर्ण पानगळ होते.झाडं वाळून गेल्यासारखं दिसतं.केवळ सांगाडा उरतो.नवखा माणूस ही झाडं वाळून गेली असंच समजतो. पण मे अखेरीस किंवा जूनमध्ये मोठा पाऊस झाला की, या सगळ्या झाडांना लुसलुशीत पानं फुटतात. पान वाढतात.जुलैमध्ये फुलं लागून छोटी छोटी फळं बनतात आणि दिवाळीमध्ये सीताफळाचा हंगाम सुरू होतो.वर्षानुवर्षे सीताफळांचं असं चक्र चालू होतं.पण अवकाळी पावसाने हे चक्र बदलून टाकलयं.
आताची स्थिती बघितली तर,सत्तर टक्के झाडांना पानं आणि सोबतच फुलं आलीत.काही झाडांना तर आवळ्याच्या आकाराची सीताफळं तयार झालीत.काही झाडं अद्याप फुटली नाहीत. आता लागलेली ही फळं ऐन पावसाळ्यात परिपक्व होतात आणि त्यात अळ्या होतात. ती खाण्यालायक राहात नाहीत, असा याआधीचा अनुभव आहे.मागच्या वर्षी काही सीताफळांची ही बिगमोसमी फळं आम्ही काढून टाकली.मात्र हंगामात याला खूपचं कमी फुलं लागली.सीताफळांची साईज मोठी झाली नाही. म्हणजे बिगरमोसमी फळं काढूनही, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.आमच्याकडील सीताफळांच्या झाडांची संख्या लक्षात घेतली तर,सगळ्या झाडांची फुलं तोडणं अशक्य आहे.सीताफळातून कमाई काही नाही, तर खर्च कशाला करायचा? खर्च केला तर तो भरून निघण्याची खात्री नाही. मग जोखीम कशाला वाढवायची.मी नरेशला म्हटलं,मे अखेरला झाडांची छाटणी करायची.त्यामुळं नवीन फुलं लागतीलच.जी राहतील ती फळं तशीच राहू द्यायची.हटच्या पाठिमागच्या वीस-पंचवीस झाडांची छाटणी करताना,सगळी फुलं,फळं काढून टाकायची.एवढी सीताफळं आपल्याला खायला पुरेशी होतात.
नारळ...
आमच्या बागेची जमीन विचारात घेतली तर,इथं एवढी उंच झाडं आली,हेच आश्चर्य आहे.गेल्या वर्षीपर्यंत नारळालाही ठिबकद्वारेच पाणी होते.आता ठिबकचे पाईप काढून टाकलेत.पाईपने पाणी देतोय.मात्र नारळाची गरज भागवणारं पाणी आम्ही देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्यात असा हा उन्हाळा.एकूण आठपैकी पाच झाडांना नारळ लागलेत.तीन झाडांना भरपूर.दोन वर्षांपासून घरचे.नारळ खातोय.छोट्याशा नारळातही छान खोबर निघतयं.नारळाचा आकार लहान असलातरी ते परिपक्व होतयं.मात्र यावर्षीच्या उन्हामुळं छोट्या हिरव्या, अपरिपक्व नारळाच्या गळतीचं प्रमाण अधिक आहे.याच्यावरही उपाय नाही. या झाडांना दररोज पाणी देणं शक्य नाही.
इतर फळांचे अनुभव घेतोय.सध्या तरी चिकू हे या परिस्थितीला तोंड देणारं एकमेव फळ दिसतयं.त्याला बारमाही फळ चालू आहे. बारा वर्षे होऊनही, यावर्षी पण जांभूळाला मोहोर लागला नाही. हे एकमेव झाड आहे ज्यानं निराश केलयं.
मुद्दा असा आहे की,अर्ध्या एकरवरील ही छोटीशी फळबाग सांभाळणं,या हवामान बदलाने अवघड करून टाकलयं.
व्यावसायिक हेतू नाही म्हणून याच्याकडे तटस्थपणे बघू शकतो. गुंतवणूक केली तर आर्थिक फटका अधिक बसणार हे उघड आहे. कमीत कमी जोखमीची शेती करणे,एवढाच एक सोयीचा मार्ग आहे. तो मी स्विकारलाय.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.