Fish Income : मासळीचे टाकाऊ घटकही देतात मोठे उत्पन्न

Fish Waste Products : पृथ्वीवरील ७६ टक्के भाग समुद्र आणि पाण्याने व्यापलेला असून, त्यातील विविध जलचर राहतात. यातील मासे आणि अनेक जलचर हे सामान्य माणसांच्या आहाराचा मोठा हिस्सा व्यापतात.
Fish Food
Fish FoodAgrowon
Published on
Updated on

अमिता जैन, डॉ. भूषण सानप

By-Products From Fish Waste : पृथ्वीवरील ७६ टक्के भाग समुद्र आणि पाण्याने व्यापलेला असून, त्यातील विविध जलचर राहतात. यातील मासे आणि अनेक जलचर हे सामान्य माणसांच्या आहाराचा मोठा हिस्सा व्यापतात. पौष्टिक आणि चवीला उत्तम या दृष्टीने या आहाराकडे पाहिले जाते. मात्र जलस्रोतातून पकडून आणलेल्या माशांच्या शरीराच्या एकूण भागांपैकी ४० ते ६० टक्के भाग हे टाकून दिले जातात.

उदा. माशांची पचनसंस्था, आतडे, डोके, खवले इ. तर कोळंबी किंवा खेकड्यांचे कवच इ. अवयव आहाराच्या दृष्टीने टाकाऊ ठरतात. जाळ्यामध्ये उत्तम माशांसोबतच कमी दर्जाची टाकाऊ मासळीही येते. तीही तशीच टाकून दिली जाते. माशांचे टाकाऊ भाग वातावरणामध्ये प्रदूषणाचे, दुर्गंधीचे कारण ठरते.

त्यातून परिसरातील मानवी वस्ती व त्यांच्या पाळीव प्राण्यांमध्ये हानिकारक रोगांचा प्रसार वाढू शकतो. म्हणूनच टाकाऊ मासळीची योग्य विल्हेवाट किंवा त्याचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मात्र माशांच्या या टाकाऊ अवयवांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रथिने व अन्य पोषक तत्त्वे असतात. त्यापासून विविध उपपदार्थांची निर्मिती केल्यास उत्तम उत्पन्नही प्राप्त होऊ शकते.

मासळीच्या टाकाऊ भागापासून तयार होणारे उपपदार्थ

मत्स्यकुटी (फिशमिल) :

फिशमिल तयार करण्यासाठी टाकाऊ मासळी किंवा मत्स्य प्रक्रिया कारखान्यात तयार होणाऱ्या मासळीच्या टाकाऊ भागांचा वापर केला
जातो. ते कडक उन्हात वाळविल्यानंतर यंत्राच्या साह्याने कुटले अथवा दळले जातात. अशा प्रकारे तयार केलेल्या फिशमिलमध्ये साधारणत: ५० ते ६० टक्के प्रथिने, ५ ते ७ टक्के स्निग्धांश व ५ ते १० टक्के जलांश असतो. या मत्स्य कुटीमध्ये राखेचे प्रमाण जास्त
(१५ ते ३० टक्क्यांपर्यंत) असते. त्यामुळे फिशमिल हे अत्यंत पौष्टिक खत मानले जाते.

माशांच्या शरीराचे तेल

अनेक मत्स्य प्रजातींमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अशा मासळीच्या उतींपासून मत्स्य तेल काढले जाते. या तेलात ‘ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स’ आढळतात. ही मेदाम्ले मानवी शरीरास अत्यंत उपयुक्त मानली जातात. सागरी आणि गोड्या पाण्यातील माशांच्या तेलामध्ये आर्चिडोनिक ॲसिड, ईपीए आणि डीएचए यांची मात्रा भिन्न असते. या तेलाचा उपयोग अनेक औषधी, सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती व खाद्य उद्योगांमध्ये केला जातो. प्रक्रियेदरम्यान तयार झालेल्या निकृष्ट दर्जाच्या तेलाचा उपयोग वंगण, पॉलिश तेल म्हणून केला जातो.

Fish Food
Fish Crisis : चाहूल - भीषण मत्स्य दुष्काळाची

माशांच्या यकृताचे तेल

माशाच्या यकृतात मोठ्या प्रमाणात ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्व आढळतात. हे जीवनसत्त्व मेंदूच्या वाढीसाठी, हाडांच्या व डोळ्यांच्या स्वास्थ्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असतात. मुशी व कॉड जातीच्या माशांच्या यकृतामध्ये जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशा तेलाचे प्रमाण अधिक असते.

मासळीच्या यकृताचे बारीक तुकडे करून, समप्रमाणात पाण्याबरोबर मिसळले जातात. त्यानंतर सातत्याने ढवळत ते तापवले जाते. या प्रक्रियेमध्ये यकृताचे तेल पाण्यावर तरंगायला लागते. हे तरंगणारे तेल वेगळ्या भांड्यात साठवले जाते. काही वेळानंतर ते स्थिरावल्यावर पाणी व तेल यांचे विलगीकरण केले जाते.

कोळंबी कवचापासून कायटीन व कायटोसॅन :

कोळंबी, खेकड्यासारख्या कवचधारी प्राण्यांच्या कवचांची विल्हेवाट लावणे हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असतो. मात्र या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे, प्रथिने असून, सोबतच कायटीन व कायटोसॅन यांचा समावेश असतो.

कायटीन व कायटोसॅन या दोन्ही पदार्थांना विविध उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे. उदा. औषधी उद्योग, दंत शस्त्रक्रिया, जखमा भरणे, विषारी पदार्थ पाण्यापासून वेगळे करणे, वाइन किंवा मद्याचे शुद्धीकरण, फोटोग्राफी फिल्म निर्मिती, सौंदर्यप्रसाधन निर्मिती, कापड उद्योग इ.

Fish Food
Fish Farming : मत्स्य उत्पादक संस्था,कंपन्यांना व्यवसाय संधी

द्रवरूप खत (फिश सिलेज) :

माशांच्या टाकाऊ घटकांपासून मत्स्यकुटी तयार केली जात असली या उद्योगातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याऐवजी द्रवरूप खते (फिश सिलेज) निर्मिती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फिश सिलेज दोन पद्धतींनी तयार केले जाते.

१) रासायनिक पद्धती : यात सिलेज निर्मितीसाठी फॉस्फोरिक आम्लाचा उपयोग होतो.
२) जैविक पद्धती : यात टार्टारिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्लसारख्या जैविक आम्ल पदार्थांचा उपयोग होतो.
सिलेजचा वापर विविध प्राणी खाद्यांमध्ये जीवनसत्त्वाची पूर्तता करण्यासाठी केला जातो. त्याच प्रमाणे झाडांना द्रवरूप खत म्हणूनही केला जातो.

खवल्यांपासून पर्ल इसेन्स :

मासळीच्या कातडीवरील खवल्यात आढळणाऱ्या रासायनिक पदार्थांस शास्त्रीय भाषेत ग्वानिन या नावाने ओळखले जाते. चमकदार खवले असलेल्या मासळीपासून ‘पर्ल इसेन्स’ बनवले जाते. समुद्रातील बांगडा, सौंदाळा इ. प्रजातींच्या चमकदार खवल्यांपासून पर्ल इसेन्स बनवले जाते. पाण्याच्या पृष्ठभागाजवळ वास्तव्य असणाऱ्या बहुतेक माशांचे खवले चकाकणारे असतात. त्यांच्या खवल्यात व त्वचेच्या बाहेरील थरात ग्वानिन मोठ्या प्रमाणात आढळते.

हा पदार्थ स्फटिक रूपात असल्याने प्रकाशात व पाण्याच्या संपर्कात चकाकतो. स्फटिक रूप ग्वानिन वेगळे केल्यानंतर ओले राहण्यासाठी १० ते १५ टक्के मिठाच्या द्रावणात ठेवले जाते. याच द्रावणास ‘पर्ल इसेन्स’ असे म्हणतात. त्यापासून कृत्रिम मोती, दागिने व शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. याचा वापर वस्त्रोद्योग व रंग उद्योगातही केला जातो.

मत्स्य जिलेटीन :

साधारणत: प्राण्यांच्या हाडांपासून व कातडीपासून जिलेटीन तयार केले जाते. त्याचा उपयोग खाद्यपदार्थामध्ये जेली निर्मितीमध्ये केला जातो. त्याच प्रमाणे फोटो फिल्म, सौंदर्यप्रसाधने, औषधे, छपाई काम आणि रंगोद्योगामध्ये केला जातो. माशाचा कातडीपासून जिलेटिन उत्पादन केले जाते. विशेषतः गोड्या पाण्यातील कार्प प्रकारच्या माशांची कातडी ही त्यासाठी अत्यंत उत्कृष्ट मानली जाते.

माशाच्या हवेच्या पिशवीपासून उत्पादने :

धोमा जातीचे किंवा घोळ जातीच्या माशांच्या पोटातील हवेच्या पिशवीचा उपयोग आयसिंग ग्लास तयार करण्यासाठी होतो. आयसिंग ग्लासचा वापर बियर व दारू शुद्धीकरणांमध्ये केला जातो. या हवेच्या पिशवीपासून सर्जिकल स्युचर (म्हणजेच शस्त्रक्रियेनंतर कातडीवर घातले जाणारे विरघळणारे धागे) तयार केले जातात.

मत्स्य व पशुखाद्य :

व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या व संवर्धन पूरक अनेक मत्स्यप्रजाती या मांसभक्षक आहेत. अशा मत्स्य प्रजातीच्या संवर्धनासाठी मत्स्यकुटी किंवा मासळीच्या टाकाऊ भागांपासून कृत्रिम खाद्य तयार केले जाते. या कृत्रिम खाद्याचा गंध माशांना आकर्षित करतो. त्याच प्रमाणे पशू खाद्यात व कुक्कुटखाद्यात याचा वापर केला जातो. त्यात पोषक घटक आणि जीवनसत्त्वे यामुळे माशांची, कोंबड्यांची किंवा जनावरांची वाढ वेगाने होते.

अमिता राजेंद्रकुमार जैन, ९९११७५१५९३
(अमिता जैन या मोर्शी येथे, तर डॉ. भूषण सानप हे अमरावती येथील मत्स्यव्यवसाय विभागामध्ये सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com