Crop Advisory : आंबा
- पालवी ते फळधारणा अवस्था.
- ता. ८ आणि ९ या दोन्ही दिवशी कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. आणखीही २ दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पावसामुळे बागेतील आर्द्रतेत वाढ होणार आहे. अशा स्थितीमध्ये मोहोर अवस्थेतील आंब्यावर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. भुरी रोगामुळे मोहोरावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीची मुळे अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर वाळून गळून जातो. लहान फळांच्या देठांवर ही बुरशीची वाढ होऊन फळे गळतात. करपा रोगामुळे मोहोर तांबूस होऊन वाळतो. तसेच फूलगळ होते. लहान फळांवर काळे डाग पडून फळांची गळ होते. करपा आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, मोहोर आणि कोवळ्या पालवीवर ॲझाक्सिस्ट्रॉबिन (२३% प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. अंदाजाप्रमाणे पुढील दोन दिवसाचा पावसाचा कालावधी संपल्यानंतर वरील बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात किमान तापमानामध्ये बऱ्याच अंशी घट झालेली दिसते. कमी झालेले किमान तापमानामुळे व इतर हवामान घटकांच्या अनुकूलतेमुळे कोकणातील काही ठिकाणी आंब्याला मोहोर धारणा होत आहे. मोहोर धारणा होऊन
१५ ते २० दिवस झालेल्या बागेमध्ये काही ठिकाणी फळधारणा झाली असून, तेथील फळे कणी व वाटाणा आकाराची आहेत. अशा बागांमध्ये उत्तम प्रतीचे आंबा उत्पादन मिळविण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१%) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण ३ फवारण्या कराव्यात.
- काही ठिकाणी पालवी, मोहोर किंवा फळधारणा अवस्थेतील बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड मोहोरातील, कोवळ्या फळातील रस शोषत असल्यामुळे मोहोराची गळ होते. सोबतच त्यांच्या शरीरात स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थांवर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने काळी पडतात. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था ५ तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर) ओलांडली असल्यास फवारणीचे नियोजन करावे.
फवारणी प्रमाण प्रति १० लिटर पाणी
अ) जर बाग बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असेल, तर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि.,
ब) मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत, इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि.
क) वाटाणा अवस्थेत असताना, थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) १ ग्रॅम.
मोहोर अवस्थेत भुरी रोगाचाही प्रादुर्भाव दिसत असल्यास, या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २० ग्रॅम.
टीप : मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे अत्यंत गरजेचेच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर परिणाम होऊ नये, यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी ९ ते १२) वगळून फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
- किमान तापमानात होणारी घट झाल्यामुळे फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नद्रव्याचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते. यासाठी मोहोर अवस्थेत
असलेल्या आंबा झाडावर पुनर्मोहोराची प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड ५० पी.पी.एम. (म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी.) मिसळून स्वतंत्र फवारणी झाडाला पुरेसा मोहोर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना आणि
नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर करावी. जिबरेलिक अॅसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या
अल्कोहोलमध्ये विरघळून घ्यावी. नंतर पाण्यात मिसळावी.
- आंब्याचे उत्पादन वाढविणे आणि प्रत सुधारणे यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.
- फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये, वाटाणा ते सुपारी आकारांच्या फळांची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
काजू
- फुलोरा ते फळधारणा अवस्था
- या अवस्थेत काजूवर फुलकीड आणि ढेकण्या (टी मोस्कीटो बग) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड पालवी, मोहोर किंवा फळातील रस शोषून घेते. पिल्ले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहोर सुकून जातो. मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
अ) मोहोर फुटण्याच्या वेळी, प्रोफेनोफॉस* (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. आणि
ब) फळधारणेच्या वेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड* (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम.
ही फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी. फवारणी करावी. (*लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस).
टीप : एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे. काजू बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी आणि नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. काजू बागेतील कलमांसोबतच इतर स्थानिक झाडांवर देखील फवारणी करून घ्यावी. म्हणजे बागेतील किडींच्या प्रभावी नियंत्रणास मदत होईल.
- फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी
प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
सुपारी
- वाढीची अवस्था
- सुपारी बागेस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात खताचा दुसरा हप्ता देण्यात यावा. ३ वर्षावरील सुपारीला १६० ग्रॅम युरिया आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खते प्रती झाड बांगडी पद्धतीने द्यावे. या खताची मात्रा तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या झाडांना देताना पहिल्या वर्षी १/३
पट आणि दुसऱ्या वर्षी २/३ पट या प्रमाणे द्यावी. सुपारी बागेस ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
काळी मिरी
- पक्वता
- काळी मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल झाल्यावर मिरीची काढणी करावी. दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवावेत. उन्हामध्ये ३ ते ४
दिवस चांगले वाळवावे.
मिरची
- वाढीची ते फुलोरा
- मिरची पिकाला फुले धरण्याच्या वेळी नत्र खताची दुसरी मात्रा ३ ग्रॅम युरिया प्रती रोप या प्रमाणे खताची मात्रा द्यावी.
- मिरची पिकामध्ये ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करणार असल्यास पिकाच्या कालावधीकरिता एकूण १५ समान हप्त्यामध्ये विद्राव्य खते एक आठवड्याच्या अंतराने विभागून द्यावीत.
- पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी. यासाठी ६.५ किलो १९:१९:१९ विद्राव्य खत आणि २ किलो युरिया प्रती हप्ता प्रती १० गुंठे क्षेत्रासाठी वापरावे.
कोबी
- वाढीची अवस्था
-कोबी लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. तसेच नत्र खताची दुसरी मात्रा ९०० ग्रॅम युरिया प्रती गुंठा देण्यात यावी.
- कोबी पिकास आवशकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.
चवळी, मोहरी
- वाढीची अवस्था
- चवळी हे पीक वाढीच्या अवस्थेत असून, मोहरी वाढ ते फुलोरा अवस्थेत आहे. या पिकांमध्ये मावा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड आणि त्यांची पिल्ले कोवळ्या शेंड्यावर पानाच्या खालच्या भागातील रस शोषतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. या किडीने बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रवामुळे पानांजवळ काळ्या बुरशीची वाढ दिसून येते.
नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.२ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.
- मोहरी लागवडीनंतर एक महिन्यांनी नत्र खताची मात्रा १ किलो युरिया प्रती गुंठा क्षेत्राला देण्यात यावी.
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.