
विजय सांबरे
Wildfire Impact:
प्रसंग जुना. पंचवीस वर्षांपूर्वीचा...
सह्याद्रीत भटकत होतो. दिवस उन्हाळ्याचे होते. हरिश्चंद्रगड परिसरातील एका गावात स्थानिकांशी गप्पा मारत असताना डोंगराकडे लक्ष गेले. धूर व आगीचे लोळ उठलेले होते. वेळ मध्यान्हाच्या उन्हाची होती. पेटलेला वणवा पाहून स्थानिक गावकरी उठून आग विझवायला पळतील, असे वाटले. पण कोणीही जागचं हलेना. आम्हास अस्वस्थ वाटू लागले; म्हटलं चला आपण जाऊ. तर गावचे सरपंच म्हणाले, ‘‘ते अभयारण्यात मोडते. सरकारचे जंगल आहे. कशाला या फंदात पडायचे?’’ आपण वनविभागाला वर्दी देऊ, असे म्हटल्यावर उत्तर आले, की फॉरेस्टवाले आले तर उलटे आमच्यावरच आळ घेतील. तुमचेच हे काम असणार, असा आरोप करतील. जाऊ द्या जाईल विझून.
प्रसंग नवा. आठ दिवसांपूर्वीचा...
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावी मोठा वणवा लागल्याची बातमी समाज माध्यमातून कळली. गावातील उघड्या बोडक्या डोंगरावर ‘सह्याद्री देवराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून वन संवर्धन सुरू आहे. निसर्गप्रेमी कार्यकर्ते सीताराम राऊत हे गेली दहा वर्षे या कामी राबताहेत. गावात सह्याद्री-देवराई परिसरात वणवा पेटल्याची बातमी अगदी आगीप्रमाणेच पसरली. आजूबाजूचे गावकरी, शेतकरी लोक जमले. वन विभागाचे कर्मचारी पण धावत आले. अग्निशमन दलाची गाडी पण हजर झाली. अशा सर्वांच्या प्रयत्नांतून आग आटोक्यात आली. पण तोवर डोंगरातील लहान मोठी झाडे बाधित झाली होती.
एकही डोंगर अपवाद नाही
वरील दोन घटनांचा विचार केला तर असे दिसते, की गेली अनेक वर्षे वणव्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. एखाद्या गावातील लोक जागरूक असतील तर पुढाकार घेतात. वन विभागावर दबाव आणून सकारात्मक उपाययोजना आखतात. या वर्षी देवगिरी किल्ला पण सुटला नाही. छत्रपती संभाजीनगरमधील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी संवाद सुरू केला आहे.
मागील आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रात पुणे, वाई, सातारा, कराड, शाहुवाडी, मलकापूर ते पन्हाळा तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रवास झाला. सर्वदूर डोंगररांगा वणव्याने व्यापलेल्या होत्या. स्थानिक लोक व शासकीय यंत्रणा यांच्यात याप्रश्नी ना आस्था होती ना संवेदनशीलता. पावसाळ्यात झटपट चारा मिळावा या अंधविश्वासामुळे स्थानिक लोक मालकीच्या व वनविभागाच्या अखत्यारीतील जंगलाला वणवा लावतात. वेळ प्रसंगी लहान मुलांच्या हातात पण काडेपेटी देतात. हे सर्व गंभीर आहे. एकूणच वणव्याच्या माध्यमातून नव्या पिढीचे भवितव्य बेचिराख होते आहे....! महाराष्ट्रात सर्वदूर असे विदारक चित्र आढळते.
राजकीय मुद्दा व माध्यमांची दखल
जगभरात जवळपास सर्वच देशांना वणव्याच्या समस्येने ग्रासले आहे. आपल्या देशातील चित्र तर खूपच चिंताजनक आहे. केंद्र सरकारच्या भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार मागील एकवीस वर्षांत (वर्षे २००१ ते २०२२) सातत्याने लागणाऱ्या वणव्यांमुळे ३.५९ लाख हेक्टर वन-आच्छादन नष्ट झाले. २००८ मध्ये तर सर्वाधिक नुकसान झाले आहे. या एकाच वर्षात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्र केवळ आगीमुळे नष्ट झाल्याची नोंद मिळते.
भारतात फेब्रुवारीच्या मध्यावर वणवे सुरू होतात. दरवर्षी वणव्यांचा कालावधी तब्बल १४ आठवडे इतका असतो. ही देशाची सरासरी आकडेवारी आहे. राज्य, जिल्हा, तालुका व अगदी गाव-परिसरनिहाय वणव्याच्या नोंदी घेतल्या तर अधिकच भयावह स्थिती समोर येईल. वणव्यांची तीव्रता जशी वाढू लागली, त्यातून जनमानस पण अस्वस्थ होऊ लागले. स्थानिक प्रसार माध्यमांनी नोंद घेण्यास सुरुवात केली. यातून वणवा समस्या हा राजकीय मुद्दा बनला आहे. ही सकारात्मक बाब आहे.
सकारात्मक व दिशादर्शक
अशा या निराशाजनक पार्श्वभूमीवर काही सकारात्मक गोष्टी घडताना दिसत आहेत. जी गावे उत्तम पशुपालन करतात, ते विशेष काळजी घेत असल्याने तुरळक प्रमाणात वणवा लागतो. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोथळा हे आदिवासी गाव आहे. या गावातील तरुण आजूबाजूला वणवा लागला तरी विझवायला जातात. मागील दीड दशकांचा अनुभव लक्षात घेऊन कोथळा ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी वणवा पसरु नये म्हणून या वर्षी भैरोबाच्या डोंगरावर होळी पेटवली नाही. शेजारच्या लव्हाळी आंबित गावातील डांगी गोपालक वणवा लागू नये म्हणून दरवर्षी विशेष खबरदारी घेतात. यांतील बहुतांशी गावात सामुदायिक वनसंपत्तीचे शाश्वत वन व्यवस्थापन प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील आदिवासींनी शंभर वर्षापासून विकसित केलेली ‘राखणरान’ (Grassy meadow) पद्धत शाश्वत चारा निर्मितीसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे वणवा लागत नाही. गाव पातळीवर सामूहिक वन व्यवस्थापन आराखड्यात स्थानिकांनी वणव्यावर नियंत्रणासाठी एकात्मिक नियोजन केले आहे.
संगमनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या बाळेश्वर उपरांगेतील पिंपळगाव माथा येथील पशुपालक वाळलेल्या गवताची प्राधान्याने काळजी घेतात. दरवर्षी जाळपट्टे घेतात. परिणामी, वणव्याची समस्या भेडसावत नाही. अशी वन व गवत संवर्धनाची प्रक्रिया धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, लामकानी आदी गावांत गेली अनेक वर्षे सुरू आहे. अशी ही वानगीदाखल उदाहरणे सोडली तर सर्वदूर वणव्याविषयी कमालीची अनास्था आहे.
घातक परिणाम
वणव्याचे परिणाम विविधांगी आहेत. स्थानिक लोक बेजबाबदारपणे वागू लागले, की वणव्यांची तीव्रता वाढतच जाते. बेजबाबदार शिकारीमुळे बहुतेक ठिकाणी वणवे लागतात. वेळप्रसंगी पशुधन व घरदारे बळी पडतात. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील सह्याद्रीला तर अधिकच अपाय होत आहे, वनसंपत्ती व जैवविविधता यांमुळे धोक्यात येते. स्थानिकांना जंगलापासून मिळणाऱ्या परिसेवा (Ecosystem services) मिळत नाही. शेती पशुपालन धोक्यात येते. मुख्य म्हणजे वन्यजीवांचे अधिवास मोडल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस लागतो. अनेक ठिकाणी निरुपयोगी खुरटे गवत असते. ते झपाट्याने पेट घेते. एकंदरीत वणवा समस्येला सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व मुख्य म्हणजे मानसशास्रीय कंगोरे आहेत. ते अभ्यासकांनी व धोरणकर्त्यांनी समजून घ्यायला हवेत. त्यातून वारंवार असे का घडते, याचे उत्तर निश्चित मिळेल.
अत्यावश्यक उपाययोजना
वणवा समस्येवर पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे :
वणवा समस्येविषयी गाव-परिसरात निरंतर लोकजागृती प्रक्रिया राबवणे. त्यात ग्रामसभा, वनविभाग, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था इत्यादींचा सहभाग असावा.
गावपातळीवर वन विषयक विविध समित्या आहेत. पण कोणी नक्की काय काम करायचे, याविषयी समिती-सदस्य अनभिज्ञ आहेत. या सदस्यांचे सबलीकरण करणे व त्यांना कार्यरत करणे गरजेचे आहे.
दरवर्षी जाळ-पट्टे घेण्याची प्रक्रिया गंभीरपणे राबवणे. स्थानिक ग्रामसभा व वन विभाग यांनी एकत्रित नियोजन करणे.
ग्राम व शासकीय पातळीवर दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांची नोंद ठेवणे.
सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणात वणवा विषय प्राधान्याने घेणे.
स्थानिक तरुणांना वन-गस्ती (Forest patrolling) साठी प्रवृत्त करणे. अवघड ठिकाणी वणवा लागला तर आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
वन विभागाने पर्यटन-विकास (?) कामात पैसा व वेळ न दवडता जंगल संरक्षण व संवर्धन कामाला प्राधान्य देणे.
आग पेटवून केल्या जाणाऱ्या छुप्या शिकारीला पायबंद घालणे.
वणव्यामुळे लाकूड, चारा व विविध वनोपजांचे मोठे नुकसान होते, याची नोंद घेऊन आकडेवारी समजून घेणे.
लोककेंद्री वनाधिकार कायदा व त्यातील सामूहिक वन व्यवस्थापन प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे. वन विभागाने आपल्या क्षमतेचा विचार करून वनसंपत्तीवर असलेला फाजील अधिकार सोडायला हवा.
स्थानिकांना जंगलाविषयी आपुलकी कशी निर्माण होईल, यासाठी कृती कार्यक्रम आखणे.
एकूणच जंगल व गवताळ राने ही जरी सामूहिक राष्ट्रीय संपत्ती (Commons) असली तरी शाश्वत व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गाव समाजाची आहे, याचे भान ठेवावे.
वणवा समस्येवर जैवसांस्कृतिक अंगाने उपाय शोधणे (Cultural based solution). देवक असणाऱ्या वनस्पती व वन्यप्राणी आगीच्या भक्षस्थानी पडतात. या अंगाने स्थानिकांची संवेदनशीलता जागवता येईल. गावोगावचे डोंगर टेकड्या जंगल झाडेझुडपे फक्त पवित्र मानून कसे चालेल? ते सांभाळण्याची जबाबदारी पण आपलीच आहे, असा एकात्मिक व सामुदायिक दृष्टिकोन नव्या पिढीत रुजवणे.
वणव्याशी संबंधित सर्वच घटकांची वर्तणूक पाहून त्यांच्या जाणिवा व संवेदना जागृत करणे.
भंडारदरा परिसरातील आदिवासी कवी पांडुरंग खडके यांनी छान गीत रचले आहे. वनराईला वणवा लावायचा नाही रे...! वणव्याविषयीचे हे गीत यू-ट्यूबवर गाजत आहे. त्याचा लोक प्रबोधनासाठी चांगला उपयोग होईल.
यातील शक्य तेवढ्या उपाययोजना अमलात आणल्या तरच वणव्याच्या आडदांड गतीला आपण अडसर निर्माण करू शकू.
vijaysambare@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.