Fertilizer Shortage : मंजूर आवंटना इतका पुरवठा नसल्याने डीएपी खतांचा तुटवडा
Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामासाठी परभणी जिल्ह्याला २१ हजार ६६२ टन डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खते मंजूर आहेत. मे महिनाअखेर ५ हजार ६९९ टन डीएपी खतांचा पुरवठा होणे अपेक्षित असताना खरीप हंगामासाठी यंदा १ एप्रिलपासून सोमवार (ता. २६)पर्यंत केवळ २ हजार ३० टन डीएपीचा पुरवठा झाला आहे.
शिल्ल्क ३ हजार ३४६ टन पैकी २ हजार ५७३ टन डीएपीची विक्री झाली. सध्या जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. साठेबाजी करून जास्त दराने डीएपी तसेच इतर ग्रेडच्या खतांची विक्री केली जात असल्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येते आहेत. खरिपासाठी पुरेशी खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परभणी जिल्ह्यात खतांचा वापर सरासरी १ लाख ९६८ हजार टन असून, खरीप हंगाम २०२५ (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) विविध ग्रेडच्या १ लाख ५९ हजार ७०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडची १ लाख ४५ हजार ११४ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.
मागणीपेक्षा १४ हजार ५८६ टन कमी, परंतु गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत २१ हजार ८१४ टन अधिक खते मंजूर आहेत. एप्रिल महिन्यासाठी १० हजार ५९० टन खते मंजूर आहेत. मे महिन्यात विविध ग्रेडच्या २८ हजार २६३ खते मंजूर आहेत. १ एप्रिलपासून सोमवार (ता. २६) पर्यंत ३७ हजार १०० टन खतांचा पुरवठा झाला.
यंदाचा पुरवठा व मार्चअखेरची शिल्लक मिळून एकूण ८५ हजार २ टन खते उपलब्ध होती. त्यातून २४ हजार ४७२ टन खतांची विक्री झाली. जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. अनेक भागांत हळद लागवड सुरू झाली आहे. खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे खतांची मागणी वाढली आहे. इतर ग्रेडच्या तुलनेत डीएपी खतांची किंमत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.