Onion Procurement Department : कांदा खरेदीतील महासंघ, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

Scams in Onion Purchase : कांदा खरेदी विभागाची नव्याने जबाबदारी घेतलेल्या कामना शर्मा राज्यातील खरेदी केंद्रांवर जाऊन तपासणी करत आहेत. त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या शेतकरी उत्पादक महासंघ व खरेदी केंद्रांवरील संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
Onion Procurement
Onion ProcurementAgrowon

Nashik News : कांदा खरेदी विभागाची नव्याने जबाबदारी घेतलेल्या कामना शर्मा राज्यातील खरेदी केंद्रांवर जाऊन तपासणी करत आहेत. त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या शेतकरी उत्पादक महासंघ व खरेदी केंद्रांवरील संचालकांचे धाबे दणाणले आहेत. यातून पुन्हा नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत होणाऱ्या ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत गैरव्यवहार असल्याचे खुद्द ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी उघडकीस आणले. त्यानंतर कांदा खरेदी विभागात दिल्लीत मोठे फेरबदल झाले असून आता शर्मा यांच्याकडून खरेदी केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे.

Onion Procurement
Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

‘नाफेड’कडून यापूर्वी कांदा खरेदी ठराविक सहकारी संस्था व महासंघ यांच्यामार्फत होत होती. मात्र महासंघांच्या खरेदीची व्याप्ती वाढल्यानंतर यात भ्रष्टाचार बोकाळला. त्याचा फायदा राजकीय नेते, व्यापारी व अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसला. याप्रश्नी केंद्र सरकारला उशिरा का होईना जाग आली. त्यावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मर्जीतील जेठाभाई अहीर यांनी नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी केंद्रांवर धाडी टाकत बोगस खरेदी प्रकारांची चिरफाड करून ते दिल्लीला परतले.

Onion Procurement
Onion Market : कांदाप्रश्‍नी केंद्र सरकारचे वरातीमागून घोडे

समोर आलेले गंभीर प्रकार व ‘नाफेड’चे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार सिंग यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांचीही सध्या चौकशी सुरू असल्याचे समजते. त्यानंतर तत्काळ ही जबाबदारी सहकार विकास व जनसंपर्क विभागाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक कामना शर्मा यांच्याकडे देण्यात आली.

एकीकडे गेल्या पाच दिवसांपासून केंद्राचे पथक कांदा उत्पादक पट्ट्यात गैरव्यवहाराची माहिती घेत होते. अशातच शर्मा याही राज्य दौऱ्यावर येऊन कांदा खरेदी केंद्रावर तपासणी करत आहेत. त्यामुळे सखोल चौकशीत धागेदोरे हाती लागून काही राजकीय नेते व व्यापाऱ्यांशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ, खरेदी केंद्र व ‘नाफेड’चे स्थानिक अधिकारी सापडण्याची दाट शक्यता सूत्र व्यक्त करीत आहेत.

यापूर्वी सिंग यांच्यावर कांदा खरेदीत टेंडर ‘मॅनेज’ करणे, आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या महासंघांना काम देणे व पात्र महासंघांना डावलणे आदी गंभीर आरोप होते.

मोठे मासे अडकण्याची शक्यता

केंद्राच्या कांदा खरेदीतून पैसा कमवण्यासाठी काही राजकीय मंडळींनी २०२१ नंतर महासंघाची स्थापना करून कांदा खरेदी कामकाज मिळविले. गेल्या तीन वर्षांत यात मोठे गैरव्यवहार झाले. त्याची कुणकूण श्री. अहीर यांना लागताच त्यांनी धाड टाकून शहानिशा केली. खरेदी नोंदणीपेक्षा दुप्पटसाठा, आधार कार्ड झेरॉक्सवर स्टॅम्प मारून ऑनलाइन खरेदी, कामकाजातील अनियमितता याशिवाय शेतकऱ्यांच्या नावाखाली पैसे कमावण्याचा प्रकार समोर आला.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील खरेदी केंद्रापासून तपासणीची सुरवात झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, खरेदी प्रक्रिया, रजिस्टरमध्ये झालेल्या नोंदी, खरेदीसाठा तपासला आहे. यासह थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून मिळणारा दर, खरेदी प्रक्रियेतील त्रुटी, कांदा विक्रीपश्चात मिळणारे पेमेंट मिळते का ? याची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गैरव्यवहार समोर आलेल्या केंद्रांची सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे यात अडकण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com