Watershed Management : पाणलोट विकासात फादर बाखर यांचे अद्वितीय योगदान

Water Conservation : देशभरात अनेक समाजसेवी व्यक्ती, राजकीय नेते, कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने स्थानिक पातळीपासून ते व्यापक पातळीवर पाणी चळवळीस मोठा हातभार लावलेला आहे.
Father Bakher
Watershed ManagementAgrowon
Published on
Updated on

Water Crisis Management : जलसंकटावर मात करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकास या शाश्‍वत उपायाचे पुरस्कर्ते आहेत फादर हर्मन बाखर. त्यांच्या मार्गदर्शाखाली सुरू झालेले सोशल सेंटर आणि त्यानंतर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) या संस्थेचे पाणलोट क्षेत्र विकास चळवळीत सर्वोच्च स्थान आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पाणीटंचाई निवारणाच्या कोणत्याही चर्चा फादर बाखर आणि वॉटर संस्था यांच्या विचारांविना अपूर्ण आहेत.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचा इतिहास जुना असला, तरी १९७२ च्या दुष्काळाचा संदर्भ पाणी विषयाच्या कोणत्याही चर्चेत घेतला जातो. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यानंतर गेली पन्नास वर्षे काही लोकचळवळी सुरू आहेत, त्या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे पाणी चळवळ !

१९७२ नंतर अनेक समाजसेवी व्यक्ती, विज्ञाननिष्ठ, राजकीय नेते, कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने स्थानिक पातळीपासून ते व्यापक पातळीवर पाणी चळवळीस मोठा हातभार लावलेला आहे. या चळवळीतील काही लोकांनी भरघोस काम करूनही ते प्रसिद्धीपासून पूर्ण दूर राहिले. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशालाही ते फारसे परिचित राहिले नाही. त्यातील प्रमुख नाव आहे फादर बाखर !

Father Bakher
Watershed Management : पाणलोटामध्ये नाला वर्गीकरणाचे महत्त्व

फादर बाखर यांचा जन्म युरोपातील स्वित्सर्लंडमधील. फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यावर आयुष्यभर अविवाहित राहून मानवतेची सेवा करण्याचे व्रत घेऊन ते तिथल्याच एका मिशनरी संस्थेत दाखल झाले. १९४८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षीच संस्थेने त्यांना मानवतेच्या सेवेसाठी भारतात पाठवले. भारतात आल्यावर त्यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवले.

नंतर त्यांनी संगमनेर येथील ज्ञानमाता शाळेत शिकवण्याचे कार्य सुरू केले. पुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानवतेची शिकवण केवळ विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे मन भरत नव्हते. या परिसरातील दारिद्र्य त्यांना अस्वस्थ करत होते. ते सुरवातीला शाळेव्यतिरिक्त मिळालेला वेळ दारिद्र्य निर्मूलनाच्या कामासाठी देत, पण नंतर त्यांनी शाळा सोडून पूर्णवेळ याच कामात आयुष्य वेचले.

ग्राम विकासाला सुरुवात

विनोबांच्या भूदान चळवळीस नगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला भूदानातील जमीन सरकार दफ्तरी जमा होती. ही जमीन कोणकोणत्या भूमिहीनांसाठी दिली आहे, याच्या याद्या तयार होत्या, पण प्रत्यक्षात त्या जमिनी लोक कसत नव्हते. त्याचे कारण भूमीहीनांकडे कोणत्याही प्रकारची साधने नव्हती, थोडासुद्धा पैसा नव्हता आणि शेती करायचे ज्ञानही नव्हते. फादर बाखर यांनी या त्रुटी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला.

पैशासाठी भूविकास बँक आणि नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मदत मागितली, कृषिविषयक ज्ञान, प्रशिक्षण, आधुनिक बियाणे आणि नवनवीन अवजारांसाठी कृषी खात्याला विनंती केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिनीच्या नोंदी बनवून त्यांना त्यांच्या शेतशिवार आणि सीमा दाखवल्या.

यामुळे या सर्व शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. त्यांना शेती करण्यास लावून दारिद्र्य हटविण्याचे काम केले. यासाठी त्यांनी १९६८ मध्ये सोशल सेंटर ही संस्था स्थापन केली. त्याचे कार्यालय आजही नगरमध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ३००० विहिरी, १५ गावातील पाझर तलाव, १५२ लिफ्ट इरिगेशन योजना, शेकडो भूमिगत आणि केटी बंधारे बांधले.

पाणलोट विकासाच्या दिशेने

१९७२ ते ८२ या दहा वर्षांत त्यांनी असंख्य कूपनलिका नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खोदून दिल्या. यातून १७,२६० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले. त्यासाठी एक चांगला प्रशिक्षित गट तयार केला. श्रीरामपूर (जि. नगर) येथे गटाचे प्रशिक्षण केंद्र करून तिथेच एक आयटीआय अभ्यासक्रम सुरू केला. कूपनलिकेच्या कामांसाठी त्यांनी त्या काळात संस्थेत भूजल संशोधन व विकास विभाग सुरू केला होता.

हळूहळू त्यांच्या लक्षात आले, की कूपनलिका आटू लागल्या आहेत. जमिनीत पाणी खोल चालले आहे आणि काही काळात ते संपणार आहे. त्यामुळे त्यांनी कामाचे स्वरूपच पूर्ण उलट करायचे ठरवले. जमिनीतून पाणी काढण्याआधी पावसाचे पाणी जमिनीत जिरवायला हवे, यावर काम व्हायला हवे, असे त्यांनी लोकांना पटवून देण्यास सुरुवात केली. यासाठी वाचन आणि विचाराचा व्यासंग, पूर्व अनुभव आणि पाणी क्षेत्रातील संबंधितांशी असलेला संवाद कामाला आला. त्यातून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा जन्म झाला.

Father Bakher
Watershed Management : पाणलोटातील मातीची खोली, संरचनेनुसार वर्गीकरण

बाखर यांनी पहिल्या टप्यात कासारे (ता. पारनेर) येथे पाणलोटाच्या कामास सुरुवात केली. त्याच काळात जवाहर गांधी आणि विजयअण्णा बोराडे (आडगाव, जि. संभाजीनगर) आणि त्यानंतर अण्णा हजारे (राळेगणसिद्धी, पारनेर) यांनीही पाणलोट विकासाचे प्रयोग सुरू केले.

विविध ठिकाणांहून माहिती घेत, गावातील लोकांना पाणलोटाच्या कामाचे महत्त्व पटवून दिले. टप्प्याटप्प्याने पाणलोट क्षेत्र विकासाचे काम सुरू झाले. सर्वांनाच हा विषय नवीन होता. उपक्रमाचे लक्ष्य होते ‘माती आडवा, पाणी जिरवा’. मातीच्या आणि जलसंधारणाचा अनन्य संबंध असतो हे तेव्हापासून सांगितले जाते आहे. पुढे शासनाने त्याचे रूपांतर ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ असे केले.

पहिली दुष्काळ परिषद

महाराष्ट्रात १९८७ मध्ये मोठा दुष्काळ पडला. दुर्दैवाने या दुष्काळाची चर्चा १९७२ च्या तुलनेत काहीच होत नाही. या दुष्काळात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अन्नधान्याचा तुटवडा नव्हता. या उलट ७२ च्या दुष्काळात पाणी होते, पण अन्नधान्याचा तुटवडा होता. ८७ च्या दुष्काळाने मात्र अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले. पाणी आणायचे कोठून, हाच यक्षप्रश्‍न होता.

या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर डिसेंबर १९८७ मध्ये नगर येथे पहिली दुष्काळी परिषद झाली, त्यामध्ये काही पाणलोट उपाययोजनांचा निर्णय झाला. केलेल्या कामांचा ऊहापोह करण्यासाठी या सेवाभावी संस्थांनी फेब्रुवारी १९८९ मध्ये वाल्मी, छत्रपती संभाजीनगर येथे दुसरी दुष्काळ परिषद घेतली.

त्यामध्ये फादर बाखर आणि विजयआण्णा बोराडे यांनी पाणलोट क्षेत्र विकासाबाबत सविस्तर मांडणी केली. या कामामुळे भूजलात चांगली वाढ होते हेच सप्रमाण मांडले. या कामाचा महाराष्ट्रभर विस्तार झाला. जिरयती आणि दुष्काळी भागांना पाणी प्रश्‍नावर हमखास उत्तर मिळेल, असेही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

जल, मृद्‌ संधारणात रमलेले फादर बाखर

फादर बाखर यांचे इंग्रजी, जर्मन, मराठी, संस्कृतसहित नऊ भाषांवर प्रभुत्व होते. व्याख्यान आणि सादरीकरणात ते अनेकदा गीता, कुराण आणि बायबल तसेच अनेक शास्त्रीय परिभाषेतील संदर्भ सहजपणे देत. सहसा गावकरी आणि त्यांची पहिली भेट त्यांच्याच गावातील डोंगरपट्यात झालेली असे. गाडीमध्ये पहार, टिकाव, फावडे, घमेले आणि भाजी-भाकरी घेऊन सकाळी एखाद्या गावातील डोंगरावर बाखर जात असत.

तेथे माती खोदून चर किंवा दगडी पाळ करताना ते कुणालातरी दिसायचे. गावात निरोप गेला, की गावकरी त्यांना उत्सुकतेने भेटायला येत असत. दुसऱ्या दिवशी गावकरी त्यांचेसोबत श्रमदान करायला लागायचे आणि पाणलोटाचे काम सुरू होई. कामाबाबत त्यांचे हे वाक्य सर्वांच्या मनात घर करून राहिले आहे, की ‘इथं नाही तर कुठं? आत्ता नाही तर कधी? मी नाही तर कोण?’

‘जन्माने स्विस, बुद्धीने जर्मन आणि मनाने भारतीय’ असलेल्या या अवलियाने केलेल्या निरपेक्ष आणि करुणामय सेवेची पावती म्हणजे गावकरी त्यांना प्रेमाने ‘बाखर बाबा’ म्हणत असत, असा ‘बाबा’ जो जातीधर्माच्या भिंतींच्या पलीकडे गेला होता. जवळपास साठ वर्षे फादर बाखर यांनी भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी (त्यातील बहुतांश काम जलसंवर्धनासाठी) सेवा केली. वयाच्या ८५ व्या वर्षी ते मायभूमीला परतले. वयाच्या ९७ वर्षी तेथेच या जगाचा निरोप घेतला. भारतातील त्यांच्या कामाबद्दल जर्मन सरकारने १९९४ मध्ये फादर बाखर यांना ‘द ऑर्डर ऑफ मेरीट ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com