
Pune News : नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी नोयडामधील आंदोलक शेतकरी आज (ता.२) दिल्लीकडे कूच करणार आहेत. भारतीय किसान परिषद (BKP), किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) सह इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलक शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. तर संसदेला घेराव घालण्याची रणनीती शेतकऱ्यांची आहे. यामुळे चिल्ला सीमेवर महाजाम लागला असून नोएडा आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून सीमेवर अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
शेतकरी संसदेला घेराव घालणार
भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० विकसित भूखंड आणि नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलक शेतकरी संघटनांची आहे. यामागणीसाठी आता शेतकरी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत. पण यावर प्रशासनाकडून तोडगा निघालेला नाही. याचप्रश्नावर रविवारी (ता.१) शेतकरी आणि प्रशासन यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. मात्र यावर कोणताच मार्ग निघाला नाही. यामुळे आता शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून ते दिल्लीकडे जाण्यावर ठाम आहेत.
चिल्ला सीमेवर वाहतूक कोंडी
शेतकरी नेत्यांनी दिल्लीकडे जाण्याचे आवाहन केल्यानंतर हजारो शेतकरी निघाले आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. चिल्ला सीमेवर महाजाम लागला आहे. तर दिल्ली-नोएडा आणि चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने देखील वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांनी दिल्लीसह नोयडातील नागरीकांना मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकरी नेते नजरकैदेत
दरम्यान आंदोलन चिरडण्यासाठी अनेक शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. रविवारी युनायटेड किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि नोएडा प्राधिकरण, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यमुना प्राधिकरणाच्या सभागृहात ही बैठक सुमारे ३ तास चालली. मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने ती चर्चा निष्फळ ठरली.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
नवीन भूसंपादन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला मिळायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षांपासून गौतम बुद्ध नगरमध्ये सर्कलचे दर देखील वाढलेले नाहीत. नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू झाला पाहिजे. भूसंपादनाच्या बदल्यात १० टक्के विकसित जमीन द्यावी आणि ६४.७ टक्के दराने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. तर सर्व निर्णय शासनस्तरावर घेतले जावेत, अशी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी
शेतकऱ्यांच्या ठाम भूमीकेनंतर पोलिसांनी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. जिल्ह्यातील विविध चौकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नोएडा-दिल्ली सीमेवरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर बॅरिअर्स लावण्यात आले असून तपासणी केली जात आहे. अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत.
दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी वाहतूक इतर रस्त्यांनी वळवली आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे मार्गे यमुना एक्सप्रेसवे ते दिल्ली आणि सिरसा ते परी चौक मार्गे सुरजपूर या मार्गावर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.