Farmer Protest In Solapur : ‘एमआयडीसी’साठी आरक्षित शेरा कमी होईना, शेतकरी मोर्चा नेणार
Solapur News : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर नियोजित ‘एमआयडीसी’साठी (MIDC) आरक्षित असा असलेला शेरा कमी करण्याचे आदेश होऊनही तो कमी न झाल्याने शेतकऱ्यांनी आता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर शुक्रवारी (ता. ७) बैलगाडी मोर्चा नेण्याचे ठरवले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. पण प्रशासन तेवढ्या गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचे दिसते. गेल्या महिन्यात १४ मार्चलाच शेतकऱ्यांनी हा इशारा दिला. तेव्हा प्रत्यक्षात शेतकरी पाच बैलगाड्यांसह मुंबईकडे निघाले.
पण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्याशी बोलून, समजूत काढून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पण तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनाला बसण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.
गेल्या महिनाभरापासून शेतकरी इथे बसून आहेत. पण त्यानंतर उद्योग आणि कामगार विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी या एमआयडीसीसाठी प्रस्तावित असलेले ५२९ हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित करत असल्याचे जाहीर केले. तसे पत्रही शेतकऱ्यांना दिले.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील नोंद कमी होणार आहे. पण या बाबतच्या गॅझेटशिवाय ही नोंद कमी होणार नसल्याने पुन्हा हा प्रश्न अडकला.
पण आता शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात नोंद कमी होत नाही, तोपर्यंत इथून उठणार नाहीच, पण आता थेट मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख प्रवीण कुंभार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.
एमआयडीसीला विरोध नाही, निवडलेल्या जागेला विरोध
मंद्रूपच्या या एमआयडीसीसाठी गेल्या चार वर्षांपासून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ५२९ हेक्टरचे भूसंपादन होत आहे. त्यातील १४९ शेतकऱ्यांनी ७५० एकर जमिनीसाठी हरकती नोंदवल्या आहेत.
कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला, तरी आमच्या सुपीक जमिनी एमआयडीसीकरिता देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. मूळात एमआयडीसीला आमचा विरोध नाही, तर निवडलेल्या जागेला आहे, असेही या आंदोलनाचे प्रमुख कुंभार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.