Indian Agriculture : ‘बर्मुडा ट्रॅंगल’मध्ये फसलेले शेतकरी

Bogus Fertilizers and Pesticides Manufacturing Companies : दिशाहीन शासकीय यंत्रणा, नफेखोर बोगस खते कीटकनाशके उत्पादक कंपन्या आणि विक्रेते, शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित बाजारभाव न देता पुढे जास्त दराने जनतेला विकणारे नफेखोर आडतदार-व्यापारी अशा बर्मुडा ट्रँगल पेक्षाही भयानक चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on: 
Updated on: 

अतिश साळुंके

Seed, Fertilizer Update : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी बियाणे, खते याबरोबरच कीटकनाशकेही तितकीच महत्त्वाची आहेत. कीटकनाशकांमुळे विविध कीड-रोगांपासून संरक्षण होऊन उत्पादकता सुरक्षित ठेवण्यास मदत होते. निविष्ठांच्या उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक व वाहतूक आदी गुणवत्ता नियंत्रणासाठी विविध कायदे आहेत.

या कायद्यांचा वापर करून शेतकऱ्यांसाठी माफक दरात उच्च प्रतीची बियाणे, खते, कीडनाशके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारमधील कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण विभागाची आहे. अढे असताना बाजारात अप्रमाणित, बनावट व भेसळयुक्त बियाणे, खते व कीडनाशके यांची विक्री होत आहे.

दिशाहीन गुण नियंत्रण

सर्रास छापील वजनापेक्षा कमी वजनाची पाकिटे आणि छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री सोबत ठरावीक कंपनीच्या खते, बियाणे यांची साठेबाजी करून आभासी कमतरता दाखवून जास्त दराने त्याच्यासोबत दुसरे बनावट पाकीट घेण्यास भाग पाडणे, असे प्रकार घडत आहेत.

मात्र गतिमान निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील मोहीम अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अधिकारी केवळ दाखविण्यापुरत्या छोट्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आणि कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत. या क्षेत्रातील मोठे उद्योजक, व्यापारी आणि उत्पादक कंपन्या राजरोसपणे विद्राव्य व मिश्र खते बनवण्यासाठी अनुदानित युरिया, डीएपी व एमओपी यांचा वापर करतात, याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Indian Agriculture
Soybean Seed Distribution : पोखर्णी येथे तेलताड अभियानांतर्गत निविष्ठाचे वाटप

सरकारकडून ही खते शेतकऱ्यांना कमी दरामध्ये बाजारात उपलब्ध व्हावीत, या हेतूने परदेशातून आयात केली जातात. परंतु उत्पादक कंपन्या या खतांचा वापर विद्राव्य खते बनवून नंतर शेतकऱ्यांनाच मोठ्या किमतीने विक्री करतात.

विद्राव्य आणि मिश्र खते उत्पादक कंपन्यांनी खते बनविण्यासाठी विनाअनुदानित युरिया वापरणे याचे बंधन असून सुद्धा या कंपन्या कच्चामाल म्हणून वापरण्यात येणारी ही खते कागदोपत्री आयात केले असे भासवून सरकारची दिशाभूल करीत आहेत. अशा कंपन्यांमध्ये राजकीय व्यक्तींचे अथवा अधिकाऱ्यांचे हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बनावट कंपन्या

राज्यामध्ये बनावट कारखाने असल्याचे यापूर्वीसुद्धा निदर्शनास आले होते. एका खत कंपनीने अस्तित्वात नसलेल्या कारखान्यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन संचालकांच्या स्वाक्षरीमध्ये विशेष बाब म्हणून उत्पादन करण्यासाठीचा परवाना याच निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाकडून घेतला.

विशेष म्हणजे कारखान्याच्या जागेची स्थळ पाहणी आणि मशीनरि तपासणीचा अहवाल आयुक्तालयातीलच अधिकाऱ्याकडून बनवला. नियमानुसार कारखाना जेथे आहे त्या क्षेत्रातील विभागीय खत निरीक्षक यांना या तपासणीचे अधिकार होते, अशा बोगस कंपन्यांचे उद्दिष्ट हे केवळ लाखो रुपये मोजून शासनाकडून उत्पादक परवाना घ्यायचा. या परवान्याच्या आधारे कच्चा माल म्हणजेच अनुदानित खते स्वस्तात

खरेदी करून या खतांचे री-पॅकिंग करून दुप्पट-तिप्पट दराने हीच खते परदेशात जसे श्रीलंका, बांगला देश, म्यानमार, पाकिस्तान, इंडोनेशिया, बर्मामध्ये निर्यात करायची. त्यातून हजारो करोडोमध्ये वार्षिक कमाई करायची, यासाठी मशिनरी आणि कारखाना उभारण्याची गरज नसून केवळ पत्र्याचे एक शेड आणि अधिकाऱ्यांची थैली एवढेच पुरेसे असते.

भरारी पथकांच्या कारवाया

अकोला जिल्ह्यात जून महिन्यातच मंत्री कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त भरारी पथकाने एका उत्पादक कंपनीवर केलेल्या कारवाईच्या माध्यमातून भरारी पथकांची कार्यपद्धती समाज माध्यमांमार्फत जनतेसमोर आली. या पोलखोलीमुळे कारवाया करताना दंड अथवा जप्तीचे आदेश देऊ नये म्हणून कशा पद्धतीने पैशाचा व्यवहार होतो, हे सुद्धा उघड झाले.

परंतु या कारवाईमध्ये एकसुद्धा अधिकारी हा निविष्ठा व गुण नियंत्रक विभागातील नसल्याचे निष्पन्न झाले. सद्यपरिस्थितीत या विभागातील काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कारवाई करताना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय हितसंबंध आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी असलेले उद्योजक व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर कारवाई करताना मर्यादा येत आहेत, असे विभागातील कर्मचारी खासगीमध्ये बोलून दाखवतात.

तसेच अकोला जिल्ह्यातील घडलेल्या घटना याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गुण नियंत्रक विभागातील कर्मचारी वर्ग जसे मोहीम अधिकारी, विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, तंत्र अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अधिकारी यांना शासकीय गणवेश (ड्रेस कोड) याचे निर्बंध घालण्यात यावेत जेणेकरून कारवाई करत असलेला अधिकारी याच विभागातील आहे हे निष्पन्न होईल.

त्यामुळे खंडणीच्या प्रकारांना आळा बसेल. यासोबतच शासनाने या अधिकाऱ्यांना व्यापारी आणि उद्योजक यांच्याकडून नमुने घेताना होत असलेली दडपशाहीवर आळा घालण्यासाठी यांच्या अधिकारात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये असलेले कारखाने उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि दुकानदार यांच्या तुलनेत भरारी पथकातील अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मनुष्यबळामध्ये वाढ करणे ही गरजेचे आहे.

Indian Agriculture
Fertilizer Stock : हिंगोली जिल्ह्यात ५१ हजार टन रासायनिक खते शिल्लक

अपुरे कायदे

कृषी खात्यामध्ये ‘खते (अकार्बनिक सेंद्रिय किंवा मिश्रित) (नियंत्रण) आदेश १९८५, उर्वरक (खते) संचलन नियंत्रण आदेश १९७३, बीज अधिनियम १९६६, कीटकनाशक अधिनियम १९६८, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’ या कायद्यांनुसार कारवाई करून कोर्टात केसेस दाखल केल्या जातात. परंतु तज्ज्ञ वकिलांचे मार्गदर्शन न भेटल्यामुळे कित्येक केसेस मध्ये मोघम दंड होऊन केस निकाली निघते.

जसे बोगस बियाणे यासाठी कारवाई केल्यानंतर कायद्यानुसार केवळ ५०० रुपये दंडाची मर्यादा असल्यामुळे आरोपींना फक्त पाचशे रुपयाचीच शिक्षा होते. मात्र अधिकाऱ्याला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी स्वतःच्या खिशातून हजारो रुपये एका सुनावणीसाठी खर्च येतो.

तसेच अशा बोगस बियाण्यांची लागवड शेतकऱ्यांकडून झाल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा हजारो रुपयांच्या भुर्दंडासोबत दुबार पेरणी आणि हंगामाचा फटकाही बसतो.

अशा कायद्यांमुळे आणि यंत्रणेमुळे कागदोपत्री जरी दंड आरोपीला झालेला दिसत असला तरी वास्तवात त्याच्यापेक्षाही जास्तीचा भुर्दंड हा शेतकऱ्यांना होतो, यामुळे अशा न्यायातून नक्की दंड कोणाला, हा प्रश्‍न पडतो.

यासाठी शासनाने कायदे अधिक प्रभावशाली करून अशा केसेससाठी तज्ञ वकिलांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करून केसेस चा निकाल लवकरात लवकर लावायला हवा आणि नफेखोर बोगस व्यक्तींना कठोर शासन केले पाहिजे.

शेवटी ‘दिशाहीन शासकीय यंत्रणा, नफेखोर बोगस खते कीटकनाशके उत्पादक कंपन्या आणि विक्रेते, शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित बाजार भाव न देता पुढे जास्त दराने जनतेला विकणारे नफेखोर आडतदार-व्यापारी अशा बर्मुडा ट्रँगलपेक्षाही भयानक चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे,’ असे म्हणावे लागेल.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.