
Nanded News : हदगाव येथील खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलेल्या नाफेड खरेदी केंद्रात अजुनही बारदाणा उपलब्ध होत नसल्याने शेतमाल वाहनांमध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहनातील शेतमालाची ऐन थंडीतच राखण करावी लागत आहे. शेतमालाचे माप होत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे.
या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी रोज हजारो क्विंटल माल वाहनातून विक्रीसाठी घेऊन येत असताना याठिकाणी केवळ बारदाण्याअभावी त्यांचा माल खरेदी केला जात नाही. त्यामुळे नाफेडचे हे खरेदी केंद्र केवळ नावालाच असून शेतकरी थंडीत प्रशासन मात्र आरामात असाच काहीसा प्रकार याठिकाणी बघावयास मिळत आहे.
अगोदरच अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातची गेली. त्यातच शासनाने सोयाबीनला खरेदी भाव तुटपुंजा जाहीर केल्याने या जाहीर केलेल्या भावामुळे चार महिने शेतात राब राब राबूनही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. अशी परिस्थिती आहे की जो खर्च केला तोही निघेना.
व्यापारी ज्या भावाने सोयाबीन खरेदी करीत आहेत त्यापेक्षा नाफेड खरेदी केंद्रावर प्रतीक्विंटल ७०० ते ९०० रुपयांचा भाव फरक असल्याने शेतकऱ्यांना या अधिकच्या भावाची अपेक्षा लागली आहे. त्यामुळे ते नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन येत आहे.
परंतु थंडीच्या कडाक्यात केवळ बारदाण्याअभावी वजन होत नसल्याने या केंद्रावर मुक्काम ठोकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याकडे डीएमओ कार्यालय, जनरल मॅनेजर मुंबई कार्यालय, एमडी कार्यालय कोणीच लक्ष देत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
नाफेडने हलगर्जी केल्यानेच आजघडीस शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत असल्याने यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पाटील वाटेगावकर यांनी केली आहे. नाफेड केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने माल केंद्रावर खरेदी केला जात नाही, अशी परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बाजारातून पदरच्या पैशाने बारदाना विकत आणून दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन नाफेडने वजन करून घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.