Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Kharif Season : भरमसाठ वाढलेला उत्पादन खर्च आणि त्याउलट कमी झालेले भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : चार-पाच वर्षांपासून सोयाबीनला कमी दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनचे क्षेत्र कमी करून कांदा लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यासाठी सध्या कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार करण्याच्या कामांना शेतशिवारात वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा बियाणांची पेरणीही केली आहे.

काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन परवडेनासे झाले आहे. भरमसाठ वाढलेला उत्पादन खर्च आणि त्याउलट कमी झालेले भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. पर्यायी पीक उपलब्ध नसल्याने जमीन पडीक ठेवण्यापेक्षा नाइलाजाने सोयाबीन पेरावे लागत आहे. तुरीला चांगला भाव मिळत असला, तरी उत्पादन आणि पीक कालावधी हे गणित जुळत नसल्याने बहुसंख्य शेतकरी हे पीक घेणे टाळतात.

Kharif Sowing
Kharif Season 2025 : पिकांची वाढ खुंटली

उडीद, मूग कमी कालावधीत निघत असले, तरी त्यातूनही फारसे उत्पादन आणि उत्पन्न निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आता उडीद पेरून ते पीक निघाल्यानंतर कांदा पीक घेण्याचे नियोजन करू लागले आहेत; तसेच अनेकांनी कोणतीच पेरणी न करता एकर-दोन एकर रान कांद्यासाठी राखून ठेवले आहे. त्यासाठी एक जुलैपासून कांदा रोपे तयार करण्यास सुरवात झालेली आहे. दीड महिन्यात रोपे लागवडीयोग्य होतात. त्यामुळे एक ऑगस्टपासून जिल्ह्यात कांदा लागवडीस वेग येणार आहे. महिनाभर हा लागवडीचा हंगाम चालेल.

कांदा बियाणांची मागणी वाढली

बाजारात सध्या विविध वाणांचे कांदा बियाणे उपलब्ध आहे. त्यांना शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. साधारण २५०० ते २६०० रुपये प्रतिकिलोने हे बियाणे मिळत आहे. एकरभर कांदा लागवडीसाठी साधारण दोन किलो बियाणांपासून वाफ्यामध्ये रोपे तयार केली जात आहेत. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वाफ्यातील या रोपांना दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी देत आहेत. सध्या ही रोपे वाढीच्या अवस्थेत आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

उडीद, मुगाचे क्षेत्र १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता

यंदा उडीद आणि मुगाची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. आठ जुलैअखेर सर्वसाधारण ४० हजार ३६५ हेक्टर क्षेत्रापैकी ३७ हजार २९२ हेक्टरवर म्हणजेच ९२.३० टक्के क्षेत्रावर उडदाची लागवड झाली आहे, तर मुगाची सर्वसाधारण १४ हजार ६५९ हेक्टरपैकी ११ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी सुरूच असल्याने या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

सोयाबीनला भाव मिळत नाही. दुसरं काय पेरणार? पर्याय नाही म्हणून पेरावं लागतं. त्यामुळं यंदा सगळंच रान सोयाबीनमध्ये न गुंतविता दोन एकरात कांदा लावण्याचा निर्णय घेतलाय. २० दिवसांपूर्वीच वाफे तयार करून चार किलो बियाणं टाकलंय. एक ऑगस्टपासून लागवड करणार हाय. गावातील ५० शेतकऱ्यांनी रानं राखून ठेवलीत. ते पण कांदाच लावतील.
- शहाजी जाधव, शेतकरी, आंबेजवळगे =
यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी करून उडीद, मूग लागवड केली. कारण, हे पीक काढून ते रान कांद्यासाठी सापडते. ज्या गावात नेहमी कांदा लागवड होते, तेथील लागवड तर होणारच आहे. पण, यंदा इतर गावांतही कांदा लागवड वाढणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी माझ्या एकट्याकडून महिनाभरात ५०० किलो कांदा बियाणे खरेदी केले आहे. त्यातून साधारण १५० एकरांत कांदा लागवड होईल. यशिवाय प्रत्येक दुकानातून बियाणे विक्री झाली आहे.
- शिवाजी गायकवाड, कृषी सेवा केंद्रचालक, पाडोळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com