Kolhapur News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप भात काढणीला उशीर झाला. दरम्यान, निवडणुकीची सुगी सुरू झाली असली तरी भाताच्या सुगीत शेतकरी व शेतमजूर अडकले आहेत. नेत्यांसह कार्यकर्ते मतांच्या ‘रास’ला राजकीय खळ्यावर, तर बळीराजा धान्याच्या ‘रास’साठी भाताच्या खळ्यावर आहे. दोन्ही सुगी एकाचवेळी आल्या असल्या तरी कार्यकर्ते व शेतकरी आपापल्या कामात व्यग्र आहेत.
दरवेळी ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक यावेळी नोव्हेंबरमध्ये होत आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भात कापणीची धांदल उडालेली असते; परंतु यंदा मॉन्सूनोत्तर पाऊस जोराचा झाल्याने भात कापणीही लांबणीवर पडली आहे. विधानसभा निवडणूक आणि सुगी याचे समीकरण ठरलेलेच आहे.
निवडणुकीत आता प्रत्यक्ष प्रचाराची रान उठणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. ते राजकीय आखाड्यात आता उतरले आहेत; पण मतदार असलेला शेतकरी मात्र अजून खरीप भात कापणीसाठी शिवारात व्यग्र आहेत.
आपला नेता निवडून आला पाहिजे, यासाठी कार्यकर्ते एकेका मतासाठी झुंजत आहेत. हळूहळू ही झुंज ईर्ष्येला पेटणारी आहे. यामुळे आतापासूनच हे कार्यकर्ते मतांची रास आपल्या नेत्याच्या बाजूने पडावी, यासाठीची धडपड सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने निवडणूक म्हणजे एकप्रकारची सुगीच असते; परंतु ही सुगी पाच वर्षांतून एकदा येते. १५ ते २० दिवसांच्या या सुगीत अधिकाधिक पद्धतीची मतांची रास साधण्यासाठी कार्यकर्ते भान हरपून नेत्यामागे हिंडत असतात.
जयघोष करीत असतात. मात्र, शेतकऱ्याला काळ्या आईच्या पोटातून मिळणाऱ्या धान्याची सुगी ही शाश्वत असते. त्यासाठी ते धडपडून धान्याची रास पदरात पाडून घेतात. मिळेत तेवढ्या धान्यात शेतकरी समाधान मानून पुन्हा पुढच्या पिकाकडे वळतो. त्याला पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या सुगीचे देणे-घेणे नसते.
मात्र, या सुगीत मिळणाऱ्या धान्याला योग्य भाव मिळायला पाहिजे, इतकी माफक अपेक्षा त्याची असते; परंतु कोणत्याही सरकारने शेतकरी समाधान होईल, अशा पद्धतीची हमी दिलेली नाही. निवडणुकीत उतरणारे मात्र शेतीमालाला योग्य भावाची हमी देऊन मतांची सुगी करून घेतात, या प्रत्येकवेळच्या चित्राला यंदाही अपवाद नाही.
मजूरटंचाईने शेतकरी त्रस्त
मुळात अवकाळी पावसामुळे भात कापणी लांबली आहे. चंदगड तालुक्यात अद्यापी मोठ्या प्रमाणात भात शेतातच उभे आहे. मजूर मिळत नसल्याचे मुख्य कारण यामागे असल्याचे शेतकरी सांगताहेत. निवडणुकीमुळे गावागावांतील मजूर आता कार्यकर्त्याच्या रूपात आल्याचे चित्र आहे. नाष्टा, जेवणासह प्रचारासाठी फिरायला गाडीची सुविधा असल्याने भात कापणीला मनुष्यबळ उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.