Amaravati News : नवीन सोयाबीनचे दर बाजारात हमीदराच्या तुलनेत पाचशे रुपयांनी पडले आहेत. जुन्या सोयाबीनलाही हमीदर मिळेनासा असताना शासनाने जाहीर केलेल्या हमीदराने शासकीय खरेदीत एफएक्यू दर्जाची अट घातल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सततच्या पावसाने सोयाबीनचा उतारा व प्रत घसरली असल्याने खुल्या व शासकीय बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीदर मिळेल, ही शाश्वती कमी असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागला आहे. मात्र बाजारात हमीदरापेक्षा सुमारे पाचशे रुपये दर कमी असून ४ हजार ते ४,३०० रुपये दर आहे. तर जुन्या सोयाबीनला खुल्या बाजारात ४,३५० ते ४,४५० रुपये दर मिळत असून तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी ते कमी आहेत. शासनाने हमीदराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासकीय नोंदणी सुरू केली असताना खुल्या बाजारात हंगामाच्या प्रारंभीच मात्र दर पडले आहेत.
केंद्राने सोयाबीनला वर्ष २०२४-२५ साठी ४,८९२ रुपये दर प्रति क्विंटलला जाहीर केले आहेत. अद्याप हा दर एकाही शेतकऱ्याच्या पदरी पडलेला नाही. गत हंगामातही त्यावेळचे हमीदर मिळालेले नाहीत. सोयाबीन हे खरीप हंगामातील पहिले नगदी पीक असून त्यावर शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी अवलंबली आहे.
यंदा जुलै व ऑगस्टमधील सततच्या पावसाने सोयाबीनला काही प्रमाणात फटका बसला असून उतारा घटला आहे. यामुळे उत्पादनाची सरासरी घसरली असून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन सरासरी येऊ शकेल, अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा सहा ते साडेसहा क्विंटल उत्पादन होणार आहे. यामध्ये एफएक्यू दर्जाचा सोयाबीन किती राहील, असा प्रश्न कायमच आहे.
गत हंगामात नव्हते मिळाले सोयाबीन
गत हंगामात शासनाने हमीदराने खरेदी प्रारंभ केली होती. मात्र खुल्या बाजाराला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने शासनाला सोयाबीन मिळू शकलेला नाही. अमरावती जिल्ह्यात संपूर्ण हंगामात केवळ १२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. यंदा पुन्हा हमीदराने खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.