Food Processing : ‘गीताई’मुळे शेतकऱ्यांची वाटचाल आर्थिक सक्षमतेकडे

Farmer Success Story : पाच वर्षांपूर्वी पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा) या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गीताई शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. टप्प्याटप्प्याने कृषी विभाग, बॅंकेच्या मदतीने शीतगृह, प्रतवारी प्रकल्प सुरू केला. पुढे शेतीमाल खरेदी व थेट विक्रीमध्येही कंपनीने विस्तार केला. ५५ हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या ‘गीताई’ आर्थिक उलाढाल आता १४ कोटींच्या पुढे गेली आहे.
Gitai FPO
Gitai FPOAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात लिंबू (सुमारे ८ हजार ५०० हेक्टर), द्राक्षांचे (एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर) सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यासोबतच साडेतीनशे हेक्टर डाळिंब, शंभर हेक्टर संत्रा लागवड आहे. त्याच प्रमाणे पारगाव सुद्रीक गावाच्या वीस किलोमीटर परिसरात ५०० हेक्टरपेक्षा क्षेत्रावर भाजीपाला आहे. पारगाव सुद्रीक गावातील डॉ. बाळासाहेब काळे, नंदकुमार लाडाणे, भगवान सोनवणे, संजय काळाने, प्रशांत उदमले, नानासाहेब खेतमाळीस, रवींद्र काळे, तात्यासाहेब खेतमाळीस, स्मिता सोनवणे, सुनीता काळे, स्वाती काळाने व कार्यकारी संचालक चंद्रकांत शिकारे यांनी एकत्र येऊन २०१७ मध्ये ‘गीताई’ शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. यामध्ये तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, ‘आत्मा’चे तालुका समन्वयक नंदकुमार घोडके यांची मदत झाली. सुरुवातीला त्यात २५० सभासद झाले. त्यात वाढ होत आता ५६५ शेतकरी सभासद, त्यापैकी ३०० महिला शेतकरी सभासद झाले आहेत.

Gitai FPO
Self Help Group Success Story : महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा

शीतसाखळी प्रकल्पाची उभारणी

कंपनी स्थापन झाल्यानंतर शीतसाखळी प्रकल्पाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या संचालकांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एसआयआयएलसी’मधून शीतसाखळीसंदर्भातील १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. तसेच कृषी विभागाच्या वतीने तीन दिवसांची काही प्रशिक्षणेही घेतली. या शीतसाखळी प्रकल्पासाठी जागा, शीतगृह, प्रीकूलिंग युनिट उभारणी यासाठी साडेसात कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला. मात्र श्रीगोंदा, नगर जिल्ह्यातील अनेक बॅंकाकडे कर्जासाठी हेलपाटे मारूनही कर्ज मंजुरीबाबत काहीच चिन्हे दिसेनात. तेव्हा एका परराज्यांच्या पुणे येथील शाखेकडे प्रस्ताव सादर केला. त्यांनी फार वेळ न घालवता साडेपाच कोटींचे कर्ज उपलब्ध केले. त्यातून ६० गुंठे जागाही खरेदी केली. त्याच प्रमाणे १३०० टन साठवण क्षमतेचे तीन शीतगृहे, २ प्रीकूलिंग युनिट, अकरा हजार स्क्वेअर फुटांचे पॅकहाउस यांची उभारणी केली. प्रति दिन ४० टनांपेक्षा अधिक शेतीमालावर प्रतवारी, प्रक्रिया व शीतकरण सुरू झाले. दर दिवसाला ६० टन शेतीमालावर प्रीकूलिंग करण्याची क्षमता आहे. प्रीकूलिंगमुळे शेतीमालातील बाह्य उष्णता कमी केली जाते. फळांच्या पिकवणीमध्ये तयार होणारा इथिलीन वायू बाहेर काढून टाकला जातो. तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशिष्ट मशिन बसवले आहे. परिणामी, द्राक्ष तीन महिने, डाळिंब, लिंबू, संत्रा व मोसंबी २ महिने टिकवणक्षमता मिळते. अशी संपूर्ण सुविधा असलेला नगर जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा कंपनीच्या वतीने केला आहे. ‘गीताई’ने उभारलेल्या शीतसाखळी प्रकल्पाला या वर्षी (म्हणजे तीन वर्षानंतर) कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) ५६ लाखांचे अनुदान उपलब्ध झाले आहे.

Gitai FPO
Agriculture Success story : महिलांनी शेती पूरक व्यवसायातून उभारले लाखो रुपये | ॲग्रोवन

आर्थिक झाला फायदा

२००० मध्ये फळे, भाजीपाला व इतर शेतीमालाला प्रति किलो १० ते १२ रुपयांच्या वर दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीमालाच्या साठवणुकीसंदर्भात मागणी कंपनीकडे करण्यात आली. नुकतीच कंपनी सुरू झाली होती. पंचवीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची सुमारे दीड महिने शीतगृहात साठवण केली. दीड महिन्यानंतर त्यांना प्रति किलोला ४६ रुपये दर मिळाला. साठवणीच्या प्रक्रियेत प्रति किलो प्रीकूलिंगसाठी ४.५ रुपये, शीतगृह
साठवणीसाठी दीड रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाताही शेतकऱ्यांना २८ ते ३० रुपये प्रति किलो अधिक मिळाल्याने उत्साह वाढला.
- कंपनीच्या सभासदासोबत परिसरातील शेतकरी, व्यापाऱ्यासाठीही शीतगृह, प्रीकूलिंग सेवा उपलब्ध आहे. यंदाही मार्च महिन्यात राज्यात द्राक्षांचे दर पडल्याने २५ रुपयांपेक्षा अधिक दर मिळत नव्हता. त्या वेळी कंपनीच्या सुविधेचा उपयोग करून काही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी द्राक्ष साठवणूक केली. दोन महिन्यांनंतर ८० ते ९० रुपये प्रति किलो दर मिळाला. खर्च जाऊनही शेतकऱ्यांना प्रति किलो ५० रुपयांपर्यंत फायदा झाला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी दर नसल्याने शेतीमाल साठवण केली. दोन महिन्यांनंतर त्यांना प्रति किलोमागे २० ते ४० रुपयांपर्यंत फायदा झाला.
- द्राक्ष हंगाम काळात चारशे मजुरांना रोजगार.
- गीताई शेतकरी उत्पादक कंपनीचा शेतीमाल खरेदी, प्रीकूलिंग, शीतगृहाच्या वापरातून पहिल्या वर्षी पाच कोटी, दुसऱ्या वर्षी ९ कोटी व यंदा (तिसऱ्या वर्षी) १४ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे.

जैविक निविष्ठा उपलब्धतेसाठी प्रयत्न

पीक उत्पादनामध्ये रासायनिक घटकांचा वापर मर्यादित ठेवताना जैविक, सेंद्रिय खतांचा वापर केल्यास साठवणीसाठी चांगले परिणाम मिळतात. मात्र या जैविक घटकांची उपलब्धता ही समस्या लक्षात आली. त्यामुळे कंपनीतर्फे जैविक निविष्ठा विक्री केंद्र सुरू केले. कंपनीच्या सभासदांसह अन्य सुमारे एक हजारापेक्षा अधिक शेतकरी येथून जैविक निविष्ठांची खरेदी करतात. त्यामुळे त्यांना हे घटक उत्तम दर्जाचे व बाजारातील दरापेक्षा दहा टक्के सवलतीत उपलब्ध होतात. या विक्री केंद्राची ३ कोटींपर्यंत उलाढाल झाली आहे. पिकांची निवड, खते, कीडनाशकांचा वापर, फवारणी, तंत्रज्ञान वापर, काढणी आदींबाबत सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीने दोन कृषी तज्ज्ञांची मानधनावर नियुक्ती केली आहे. कृषी विभागामार्फतही गरजेनुसार कार्यशाळा घेतल्या जातात.

Gitai FPO
Success Story : कोल्हापुरच्या कृष्णात पाटील यांनी ऊसपट्ट्यात कारले पिकाची गवसली वेगळी वाट

फळप्रक्रिया उद्योग उभारणी सुरू

गीताई शेतकरी उत्पादक कंपनीचा आता एकूण ६३ गुंठ्यांवर विस्तार झाला आहे. शीतसाखळी प्रकल्प उभारणीनंतर पणन व व महाराष्ट्र कृषी व पणन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्फत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) अंतर्गत साडेदहा कोटींचा ९० टन क्षमता प्रक्रिया उद्योग मंजूर झाला असून, उभारणी सुरू आहे. यात विविध फळाचा गर व रस काढण्याचे नियोजन आहे. तसेच ९० टन क्षमतेचा भाजीपाला गोठवण प्रकल्प, शीतगृह (९०० टन), पिकवण गृह (९० टन) उभारले जातील. या संभाव्य प्रकल्पामुळे दोनशेपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

कोरोनात आर्थिक नुकसान टाळले

कोविड ९९ च्या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात. बाजार बंद व मर्यादित सुरू राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीची समस्या उभी राहिली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने ‘गीताई’ कंपनीने पुढाकार घेतला. ४०० शेतकऱ्यांकडून प्रति दिन सुमारे १५ टन भाजीपाला खरेदी केली. पुढे पुणे, मुंबई येथील ग्राहकांकडून आगाऊ नोंदणी केल्यानंतर घरपोच पुरवठा केला. सभासद शेतकऱ्यांचे नुकसान टाळतानाच कंपनीची सुमारे तीन कोटींची यातून उलाढाल झाली.
- पूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष, लिंबू उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून अनेक वेळा फसवणूक झाली आहे. मात्र जेव्हापासून ‘गीताई’ समन्वयक म्हणून काम करत आहे, तेव्हापासून दर व आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता आली आहे.

शेतीमाल खरेदी


शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणूक व प्रीकूलिंगची सुविधा पुरविण्यासोबतच कंपनी शेतीमाल खरेदीतही उतरली आहे. यंदाच्या वर्षभरात ४०० टन लिंबू, ४ हजार टन द्राक्ष, ३ हजार कांदा, ७०० टन डाळिंबासह, भाजीपाल्याची एक हजार टनापर्यंत खरेदी करून देशभरातील व्यापाऱ्यांना विक्री केली आहे. यात शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट खरेदी होत असल्याने वाहतूक व अन्य खर्च रु. दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल बचत होते.


गीतेची भेट

‘गीताई’चे संचालक सभासद यांची भगवान श्रीकृष्ण, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम करत आहेत. त्यामुळे कंपनीच्या परिसरात भगवान श्रीकृष्णाचे मंदिर उभारले आहे. आजपर्यंत सातशेपेक्षा अधिक लोकांना श्रीभगवद्‍गीता ग्रंथ भेट दिला आहे.

संपर्क ः
डॉ. बाळासाहेब काळे (अध्यक्ष) ः ९४२३४६२७९४
चंद्रकांत शिकारे (कार्यकारी संचालक) ः ९०९६०८१४२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com