HSRP Number Plate: शेतकऱ्यांनो, वाहनांना बसवून घ्या एचएसआरपी नंबर प्लेट

Vehicle Security: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे अत्यावश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. आपल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी नेमकी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, हे समजून घेऊयात.
High Security Registration Plate
High Security Registration PlateAgrowon
Published on
Updated on

संदीप नवले

Maharashtra Transport Rules: नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ता. १.४.२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासह सर्वांनी ही नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे.

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी ही अत्याधुनिक नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट वाहनांच्या ओळखीला अधिक सुरक्षित बनवते. फसवणुकीच्या शक्यता कमी करते. या प्लेटमध्ये होलोग्राम, लेझर-चिन्हांकित ओळख क्रमांक आणि नॉन-रियुजेबल लॉक उपलब्ध आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या जी.एस.आर ११६२ (ई), ता. ४.१२.२०१८ व s.o.६०५२ (ई), ता. ६.१२.२०१८ नुसार ता. १.४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमूद सेवा पुरवठादार यांची नेमणूक करण्यात आलेली असून, त्यासमोर दिलेल्या संकेतस्थळावरून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता शुल्क भरणे, पूर्वनियोजित वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत फिटमेंट सेंटरची माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच सोबत अर्ज करण्याची पद्धत जोडली आहे.

High Security Registration Plate
Agriculture Technology: संत्रा बागायतदारांना उपलब्ध होणार स्पेनचे वाण

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट आवश्यक का?

वाहनांची सुरक्षा आणि सोयीसाठी एचएसआरपी नंबर प्लेट्‌स तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो. हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो. नंबर प्लेटचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही. ही प्लेट वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कुणीही कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. तिची चोरी आणि गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला, तर गाडीला लावलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन मालकासह सर्व माहिती मिळते.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट म्हणजे एक उच्च-गुणवत्ता आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे. वाहनांच्या नोंदणीमध्ये खोटी प्लेट आणि फसवणूक टाळणे हा मुख्य उद्देश आहे. या प्लेटवर सुरक्षा फीचर्स असतात. ज्यामुळे त्या प्लेटची ओळख पटकन केली जाऊ शकते, वाहन चोरीचा तपशील लगेच मिळतो. महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचा उपयोग अनिवार्य केला आहे.

महाराष्ट्रात तीन विभाग :

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्याचे कामकाज सुलभ आणि वेगवान होण्यासाठी परिवहन विभागाकडून राज्यात तीन विभाग (झोन) तयार करण्यात आले आहेत. या विभागामध्ये राज्यातील आरटीओ कार्यालयांची विभागणी करण्यात आली आहे. विभाग एक अंतर्गत बारा, विभाग दोन अंतर्गत १८, तर विभाग तीन अंतर्गत २० आरटीओ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरात असलेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्याचे कामकाज सुलभ पद्धतीने व वेगाने होणार आहे. ३१ मार्च २०२५ पूर्वी राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. त्यानुसार ही कार्यवाही परिवहन विभागाकडून वेगाने सुरू आहे.

...हे आहेत तीन विभाग

विभाग १ मधील आरटीओ कार्यालये : बोरिवली, ठाणे, पनवेल, कोल्हापूर, पुणे, नांदेड, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर (पूर्व), नागपूर (उत्तर), इचलकरंजी.

विभाग २ मधील आरटीओ कार्यालये : मुंबई सेंट्रल, मुंबई (पूर्व), वसई, कल्याण, पेण (रायगड), रत्नागिरी, मालेगाव, नंदुरबार, सातारा, फलटण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, वर्धा, नागपूर (ग्रामीण) गोंदिया, गडचिरोली.

विभाग ३ मधील आरटीओ कार्यालये : मुंबई (पश्‍चिम), वाशी (नवी मुंबई), सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, श्रीरामपूर, धुळे, जळगाव, भडगाव, चाळीसगाव, सांगली, कराड, अकलूज, बारामती, बीड, जालना, अंबाजोगाई, लातूर, उदगीर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, बुलडाणा, खामगाव, भंडारा, चंद्रपूर.

High Security Registration Plate
Agriculture Technology: पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्याधुनिक स्मार्ट तणनियंत्रण यंत्र!

नागरिकांनी येथे संपर्क करावा :

विभाग --- एजन्सीचे नाव -- एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक

विभाग १ -- Rosmerta Safety Systems Ltd ---- http://mhshrp.com

विभाग २ -- Real Mazon India Ltd --- http://mhshrpzone२.com

विभाग ३ -- FTA HSRP Solutions Pvt.Ltd --- http://maharashtrahsrp.com

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया :

महाराष्ट्रात ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट मिळविण्यासाठी सोपी आणि सुलभ ऑनलाइन प्रक्रिया आहे. खालील टप्प्यांचा अवलंब करत अर्ज भरावा.

१) पहिला टप्पा : अधिकृत वेबसाइटवर जा.

सर्वप्रथम, बुक माय एचएसआरपी या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावे. ही वेबसाइट महाराष्ट्र सरकारने अधिकृत केली आहे.

२) दुसरा टप्पा : ऑर्डर नाऊ (‘Order Now’) पर्यायावर क्लिक करावे.

वेबसाइटवरून तुम्ही ऑर्डर नाऊ (‘Order Now’ बटणावर क्लिक करा, जे तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी पुढे जाईल.

३) तिसरा टप्पा : आवश्यक तपशील भरावा.

तुमच्या वाहनाचा ‘नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर, इंजिन नंबर’ आणि इतर आवश्यक माहिती भरून ‘Buy Now’ क्लिक करा.

४) चौथा टप्पा : आवश्यक तपशील भरल्यानंतर, कॅप्चा (CAPTCHA) भरा.

तुमचा ऑर्डर क्रमांक आणि कॅप्चा (CAPTCHA) भरून पुढे जाऊन सर्च (Search) बटणावर क्लिक करा.

५) पाचवा टप्पा : अर्ज पूर्ण करा.

तुम्हाला तुमच्या एचएसआरपी नंबर प्लेटचे तपशील दिसतील. त्यानंतर आवश्यक फी भरून अर्ज प्रक्रियेस पूर्ण करा. अर्ज नोंदणीसाठी तारीख आणि स्लॉट निवडा.

(फोटो ः एन६)

६) सहावा टप्पा : अर्जाची स्थिती तपासा.

तुम्हाला अर्ज केलेल्या नंबर प्लेटची स्थिती तपासण्यासाठी ट्रॅक युवर ऑर्डर (‘Track your order’) पर्यायावर क्लिक करा.

High Security Registration Plate
Agriculture Technology : तंत्रज्ञान थेट शेतात: शेतकऱ्यांसाठी प्रायोगिक शेतीचा नवा मार्ग

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी आवश्यक कागदपत्रे :

- वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)

- ओळख पुरावा (आधार कार्ड किंवा पासपोर्ट)

- पत्ता पुरावा (लाइट बिल किंवा भाडे करार)

- वाहन विमा दस्तऐवज

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट फी :

एचएसआरपी नंबर प्लेट बसविताना, वाहनाच्या प्रकारानुसार फी भरावी लागेल. महाराष्ट्रात एचएसआरपी नंबर प्लेटची फी जीएसटीसह खालीलप्रमाणे आहे:

वाहन श्रेणी --- फी (रुपये)

दुचाकी --- ८५०

तीनचाकी आणि व्यावसायिक वाहन, ट्रॅक्टर --- १३५०

रंग कोडित स्टिकर (सर्व वाहने) --- १००

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटची स्थिती तपासणी प्रक्रिया :

१) बुक माय एचएसआरपी (Book My HSRP) वेबसाइटवर जा.

२) ट्रॅक युवर ऑर्डर (Track your order) पर्यायावर क्लिक करा.

३) ऑर्डर क्रमांक, वाहन नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा (CAPTCHA) भरून सर्च (Search) क्लिक करावे.

४) तुमच्या ऑर्डरचे तपशील दिसतील, ज्यावरून तुम्ही स्थिती तपासू शकता.

डुप्लिकेट नंबर प्लेटसाठी असा करा अर्ज :

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट हरवल्यास किंवा खराब झाल्यास, डुप्लिकेट नंबर प्लेटसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

१) टप्पा पहिला : सर्वप्रथम, बुक माय एचएसआरपी (Book My HSRP) वेबसाइटवर लॉगिन करा.

२) टप्पा दुसरा : रिप्लेसमेंट/ रिटेन/ ट्रान्स्फर (Replacement/Retain/Transfer) पर्यायावर क्लिक करा.

३) टप्पा तिसरा : गाडीचा वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.

४) टप्पा चौथा : डुप्लिकेट नंबर प्लेटसाठी अर्ज पूर्ण करा आणि पेमेंट करा.

‘एचएसआरपी’ कॅन्सलेशन आणि रिफंड प्रक्रिया :

अर्ज केलेल्या ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी कॅन्सलेशन किंवा रिफंड करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

१) टप्पा पहिला : बुक माय एचएसआरपी (Book My HSRP) वेबसाइटवर लॉगिन करा.

२) टप्पा दुसरा : कॅन्सलेशन ऑफ ऑर्डर्स (Cancellation of Orders) पर्यायावर क्लिक करा.

३) टप्पा तिसरा : ऑर्डर क्रमांक आणि वाहन नोंदणी क्रमांक भरून सर्च (Search) बटणावर क्लिक करा.

४) टप्पा चौथा : कॅन्सलेशन अर्ज सबमिट करा. त्यानंतर रिफंड ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांमध्ये मिळेल.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट न बसविल्यास होणार कारवाई :

१.४.२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवावी. या अधिकृत केंद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणांवरून ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटप्रमाणे दिसणारी नंबर प्लेट बसविल्यास त्याच्या पीन नंबरची नोंद वाहन प्रणालीमध्ये होणार नाही. वाहनास ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविणे प्रलंबित असल्याचे दर्शविले जाणार आहे. जे वाहनधारक त्यांच्या वाहनास विहित मुदतीत ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविणार नाहीत, त्या वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ व नियमास अनुसरून कारवाई करण्यात येणार आहे.

एकाच ठिकाणी सर्व सेवा :

महाराष्ट्रात ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचा वापर हा वाहनांची सुरक्षा आणि ओळख निर्माण करण्यासाठी एक अत्याधुनिक आणि अनिवार्य उपाय आहे. तुम्ही ‘एचएसआरपी’ वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करून सोप्या पद्धतीने तुमच्या वाहनासाठी ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट मिळवू शकता. अर्ज प्रक्रिया, कॅन्सलेशन, डुप्लिकेट अर्ज, आणि स्थिती तपासणी यासाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी अधिक माहितीसाठी Book My HSRP या वेबसाइटला भेट देऊन वाहनांची सुरक्षितता निश्‍चित करावी.

माहितीसाठी संपर्क :

email id : customer.support@mhhsrp.com

email id : grievance@mhhsrp.com

संपर्क क्र : ७८३६८८८८२२

महत्त्वाची सूचना :

१) नंबर प्लेटची पावती ही पहिल्या दिवसाच्या अपॉइंटमेंटच्या तारखेपासून ते ९० दिवसांसाठी वैध असेल.

२) वाहनमालक, अर्जदार तिसरी अपॉइंटमेंट किंवा पहिल्या अपॉइंटमेंटपासून ९० दिवसांच्या आत नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी उपस्थित राहिला नाही, तर फिक्स न केलेली सदर नंबर प्लेट रद्द केली जाईल आणि भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

३) एचएसआरपी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवले जातात.

त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहते आणि ग्राहकामध्ये विश्‍वासार्हता वाढविण्यास मदत होते.

‘‘राज्य शासनाने एचएसआरपीचे काम वेगाने व्हावे, याकरिता राज्यात तीन विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्या विभागांच्या अंतर्गत एचएसआरपी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा विभाग एकमध्ये येत असून, याकरिता रोझ मार्टी सेफ्टी सिस्टीम म्हणून एजन्सी कार्यरत आहे. त्याची सर्व माहिती आणि एचएसआरपीसाठीची अर्ज प्रक्रिया https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून पूर्ण करता येते.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com