Maize Cultivation : देशातील शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती

Maize Production : गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख हेक्‍टरने लागवड वाढली
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर ः इथेनॉल निर्मिती प्रकल्पांबरोबरच पोल्ट्री उद्योगातूनही मक्याला सातत्याने मागणी वाढत आहे. यामुळे मका उत्पादकाला दरही समाधानकारक मिळत आहे. याचा सकारात्मक परिणाम मक्याच्या लागवडीवर दिसून येत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मक्याची लागवड तब्बल दहा लाख हेक्टरने वाढली आहे.

जुलैच्या पहिल्या सप्‍ताहाअखेर ४० लाख हेक्‍टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही लागवड ३० लाख हेक्टरपर्यंत होती. गेल्या वर्षी मक्याचे भाव सातत्याने वाढलेले राहिले. यामुळे निर्यातीतही घट झाली. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारातच जादा दर मिळाल्याने बहुतांश मका स्‍थानिक बाजारात विकला गेला. केंद्रानेही इथेनॉल निर्मितीवरील उसाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मका उत्पादनाला चालना दिली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम मक्याची लागवड वाढण्यावर झाला आहे.

Maize Market
Maize Fodder : राधानगरी तालुक्यात वैरणीसाठी मका पिकाला पसंती

देशात मक्याचे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात तब्बल ८३ टक्के मका घेतला जातो. तर १३ टक्के मका हा रब्बी हंगामात घेतला जातो. देशामध्‍ये मक्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यात घेतले जाते. एकूण मका उत्पादनापैकी ४० टक्क्यांहून अधिक मका हा तिन्ही राज्यात घेतला जातो. मका उत्पादन घेणाऱ्या पहिल्या दहा राज्यात महाराष्‍ट्राचा नववा क्रमांक आहे.
गेल्या वर्षी केंद्राने इथेनॉल निर्मितीचा जादा भार असणाऱ्या साखर उद्योगावर बंधने आणली. यामुळे अपेक्षित साखर उद्योगातून अपेक्षित इथेनॉल निर्मिती होऊ शकली नाही. यामुळे मागणीचा ताण मक्या सारख्या धान्‍यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर आला. गेल्या वर्षी दुष्‍काळी परिस्‍थिती असल्याने मक्याची पेरणी कमी झाली होती. यामुळे उत्पादनातही घट झाली. परिणामी मक्याच्या दरात वाढ झाली. चांगला दर मिळत असल्याने यंदा उत्पादक राज्यांमध्ये मक्‍याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंजाबसारख्या राज्‍यात मका बियाण्यासाठी किलोला शंभर रुपयापर्यंतचे अनुदान देऊन शेतकऱ्याला मका लागवडीला प्रोत्साहित केले जात आहे.

लागवडीसाठी देशभरात प्रयत्न
केंद्राने मका संशोधन प्रकल्पांना मक्याच्या संशोधनावर गांभिर्याने काम करण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. अनेक ठिकाणी नवीन, जादा उत्पादन देणाऱ्या मका वाणांवर काम करण्यासाठी केंद्राकडून जादा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत मका लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या, असे केंद्रीय पातळीवरून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा मका आद्यरेखा प्रात्यक्षिकांची संख्या दुप्पट केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर आदी जिल्ह्यांत यंदा सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर मक्याची प्रात्यक्षिके घेतली आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद भारतीय मका संशोधन संस्था, लुधियाना यांच्या शंभर टक्के अनुदानातून प्रात्यक्षिके घेतली आहेत.
- डॉ. सुनील कराड, मका पैदासकार

शेतकऱ्यांना बियाणे पुरवणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून मक्याचे उत्पादन वाढविण्यास मक्यातून चांगला नफा मिळू शकतो हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी शेतकरी मेळाव्यासह वैयक्तिक संपर्कातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.
- डॉ. सुहास भिंगारदिवे, सहाय्यक मका कृषी विद्यावेत्ता,
मका संशोधन केंद्र, कसबा बावडा, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com