
Pune News : शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसण्यासाठी आणि याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. १९) राज्यभरात अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध मागण्या देखील सरकारकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली.
महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्येची नोंद ३९ वर्षांपूर्वी साहेबराव करपे यांची झाली. ही आत्महत्या १९ मार्च रोजी झाल्याने दरवर्षी १९ मार्चला अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. या आंदोलनादरम्यान लाखो शेतकरी व किसानपुत्र एक दिवस अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सहवेदना प्रकट करणार आहेत. ठिकठिकाणी सामूहिक उपोषणाचे कार्यक्रम व सहवेदना सभा होणार आहेत.
या बाबत हबीब म्हणाले, ‘‘केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून १० ते १५ टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या ५० ते ६० टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून होते. याचा अर्थ असा, की केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. महाराष्ट्रात दररोज ७ ते ८ आत्महत्या होत आहेत. म्हणून या वर्षी किसानपुत्रांनी १९ मार्चला अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
प्रति कुटुंब १८ हजार रुपये द्या
ज्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत, असे दिसून येते. राहिलेल्या १०-१५ टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी १८ हजार रुपये महिना ठरवले आहे. तसे १८ हजार रुपये महिन्याला या कुटुंबांना पोहोचविण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदाने बंद करावी लागली तर ती बंद करावीत, अशी मागणी देखील हबीब यांनी केली आहे.
विशेष अधिवेशन बोलवा
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला १९ मार्च रोजी ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधानसभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा साधा ठराव देखील करण्यात आला नाही.
राज्यकर्ते शेतकऱ्यांप्रति संवेदनाशून्य झाले आहेत. १९ मार्च हा शेतकरी सहवेदना दिवस आहे, या दिवशी लोकसभा-विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन हबीब यांनी केले.
ग्रामपंचायतीचे ठराव
लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही, हे आज सांगता येत नाही, तरी आज गावो गावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी ‘आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली’ अर्पण करणारा ठराव करून विधानसभेच्या सभापतींना पाठवावा, असे आवाहन देखील हबीब यांनी केले आहे.
उमरा येथे अन्नत्याग
नांदेड जिल्ह्यातील उमरा (ता. लोहा) या गावात मी आणि सहकारी एकदिवस अन्नत्याग करणार आहेत. या गावातील भीमराव सिरसाट या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्याप्रति श्रद्धांजली अर्पण करून, दुपारनंतर सहवेदना सभा होणार असल्याची माहिती हबीब यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.