Farmer Death : पाण्यासाठी संघर्ष उभा करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या

Kailash Nagare Farmer : सन २०२० चा शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळवणारे, शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करणारे कैलास नागरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.
Kailash Nagare
Farmer Suicide Agrowon
Published on
Updated on

Buldana News : खडकपूर्णा प्रकल्पातून शिवणी आरमाळ परिसरातील छोट्या धरणांमध्ये पाणी सोडले जावे, कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून असंख्य निवेदने, साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधणारे युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे (वय ४४) यांनी होळीच्या दिवशी गुरुवारी (ता.१३) स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून प्रशासन आता तरी त्यांच्या हौतात्म्यास न्याय देईल का नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नागरे यांनी आत्महत्येपूर्वी एका चिठ्ठीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या असून, यातून शेतकऱ्यांची हतबलता त्यांनी मांडली आहे.

गुरुवारी एकीकडे देशभरात होळी सण सर्वत्र आनंदाने साजरा होत असतानाच शिवणी आरमाळ येथील नागरे कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला. सन २०२० चा शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळवणारे, शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करणारे कैलास नागरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेल्या पत्रात, त्यांनी म्हटले आहे, की या भागात बऱ्याच वर्षांपासून खडकपूर्णा प्रकल्पातून शिवणी आरमाळसह इतर १३ गावांना डाव्या कालव्याच्या माध्यमातून शेती शिवारासाठी पाणी मिळावे यासाठी लढा सुरू होता. मागील काही महिन्यांत कैलास नागरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवेदने दिली. गेल्या काळात त्यांनी धरण परिसरात पाच दिवस साखळी उपोषण केले होते.

Kailash Nagare
Farmers Death Issue : शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा सर्वांगीण अभ्यास करावा

जिल्हा प्रशासनासोबत बैठकाही झाल्या. मात्र, प्रकल्पाचे पाणी काही या भागात पोहोचले नव्हते. हा लढा सुरू असतानाच त्यांनी गुरुवारी आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त गावकऱ्यांनी कैलास नागरे यांचे पार्थिव उचलण्यास नकार दिला. अखेरीस या भागाचे आमदार मनोज कायंदे यांनी पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पार्थिवावर नागरे यांच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास नागरे यांच्यामागे पत्नी, मुलगी, मुलगा, वडील, बहिणी असा परिवार आहे.

Kailash Nagare
Farmer Death Compensation : शेतकरी आत्महत्येची २० प्रकरणे पात्र

ही आत्महत्या शेतकरी अनास्थेचा बळी ः सपकाळ

या आत्महत्येला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘शेतकरी अनास्थेचा बळी’ असा आरोप करीत ही आत्महत्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. भर सणात होळीच्या दिवशी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणे, ही लाजिरवाणी बाब म्हटली पाहिजे. नागरे यांच्या आत्महत्येची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देत कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.

चिठ्ठीमध्ये लिहिलेले मुद्दे

आत्महत्येपूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ‘काही करा पण माझ्या पंचक्रोशीतील शेतीला पाणी हमी द्या. आमचे धरण तुडुंब भरा. जर शेतीला पाणी आले तर शेतकरी मरणार नाही. खूप कष्ट घेतील. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये व माझ्यावर कलम ३०२ दाखल करा.

गट क्रमांक ६० मध्ये पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. शेतीत अजून खूप प्रयोग करायचे होते, खूप आदर्श निर्माण करायचे होते पण.... माझ्याकडे शेती असून नसल्यासारखीच होती. पिढ्यान पिढ्यांचा वारस हक्कांचा वाद तसेच १८ वर्षांच्या शेतीत अनेकदा वादळे, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांना सामोरे गेलो. माझ्यानंतर मुलांचे पालकत्व शासनाने घ्यावे, पाठबळ द्यावे, यांसह अनेक मुद्दे मांडून त्यांनी हतबलता व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com